॥ तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥
यतीरूप दत्तात्रया दंडधारी ।
पदीं पादुका शोभती सौख्यकारी ॥
दयासिंधु ज्याची पदें दुःखहारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ १ ॥
पदें पुष्करा लाजवीती जयाची ।
मुखाच्या प्रभे चंद्र मोहनी याची ॥
घडो वास येथें सदा निर्विकारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ २ ॥
सुनीळा असती पोटऱ्या गुल्फ जानू ।
कटिं मौंज कौपीन तें काय वानूं ॥
गळां मालिका ब्रह्मसूत्रासि धारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ ३ ॥
गळां वासुकीभूषणे रुंडमाळा ।
टिळा कस्तुरी केशरी गंध भाळा ॥
जयाची प्रभा कोटिसूर्यासी हारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ ४ ॥
जटाभार माथां प्रभा कुंडलांची ।
षड्भुजा शस्त्र सायुध साची ॥
त्रिशूळ माळादिक छाटीधारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ ५ ॥
कली पातके पातके वाढवाया ।
तयाने जनां मोहिले गाढ वायां ॥
जगीं अवतरे दुःखहारी असुरारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ ६ ॥
अनुसया सत्त्व हरावयासी ।
त्रिमूर्ति जातां करि बाळ त्यांसी ॥
निजे पालखी सर्वदा सौख्यकारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ ७ ॥
प्रसिद्ध असती क्षेत्रतीर्थे तयांचा ।
कली पातल्या जाहला लोप साचा ॥
करी तत्प्रसिद्धी मिषे ब्रह्मचारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ ८ ॥
मुखें वेद नीचाचिया बोलवीले ।
श्रीशैल्या क्षणे तंतुकालागि नेलें ॥
सुदेही करी विप्र कुष्ठा निवारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ ९ ॥
दरिद्री बहु कष्टला विप्र त्यासी ।
क्षणे द्रव्य देऊनि संतोषवीसी ॥
दिला पुत्र वंध्या असुनी वृद्ध नारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ १० ॥
मनी इच्छि विप्रैक व्हाया अन्नदान ।
असें जाणुनी कौतुका दावि पूर्ण ॥
करी तृप्त लेशान्नीं जो वर्ण चारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ ११ ॥
विलोकूनिया शूद्रभक्ती मनी ती ।
कृपें दीधले पीक अत्यंत शेती ॥
करी काशियात्रा कुमारा उद्धारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ १२ ॥
नृपस्थानि रंकासही स्थापियेलें ।
मदें व्यापिले विप्र निर्गर्व केले ॥
कृपादृष्टिनें स्फोटकातें निवारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ १३ ॥
द्विजाच्या घरी घेवडा वेल ज्याने ।
मुळापासुनी तोडिला तो तयाने ॥
दिली संतती संपदा दुःखहारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ १४ ॥
शुष्क त्या काष्ठही वृक्ष केला ।
गतप्राण तो पुत्र सजीव केला ॥
औदुंबरी आवडे वास भारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ १५ ॥
त्रिलोकीं अशी कीर्ति केली अगण्य ।
अगम्यागमा ख्यातिही ज्याची धन्य ॥
स्मरे भक्तिनें तद्भवदुःखहारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ १६ ॥
अनंतावधी जाहले अवतार ।
परी श्रीगुरुदत्त सर्वात थोर ॥
त्वरें कामना कामिकां पूर्णकारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ १७ ॥
जे तीर्थ दाने जपादी करीती ।
स्वहीतार्थ ते दैवताला स्तवीती ॥
परी केलिं कर्मे वृथा होति सारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ १८ ॥
सदा दास मी दत्त सर्वार्थकामा ।
त्वरें भेटसी टाकुनी सर्व कामा ॥
मना माझिया आवरी दैन्यहारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ १९ ॥
अती आवडी गायनाची प्रभुला ।
करी सुस्वरें नित्य जो गायनाला ॥
तयाच्या त्वरें संकटातें निवारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ २० ॥
असे क्षेत्र काशी शिवाची पुरी ती ।
प्रभाती करी स्नान गंगातिरी ती ॥
करी करवीरी अन्हीं भिक्षार्थ फेरी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ २१ ॥
निशी जाय निद्रार्थ मातापुरासी ।
सवें कामधेनू वसे तेजराशी ॥
तसे श्वानरुपी सवें वेद चारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ २२ ॥
जनां मुक्तिचा मार्ग दावावयासी ।
कळाया स्वरूपप्रचीती तयांसी ॥
चरे त्रिलोकी करी जो निमिषार्ध फेरी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ २३ ॥
असें रूप ठावें तुझे असतांना ।
वृथा हिंडलो दैवते तीर्थ नाना ॥
परी शेवटी प्रार्थी आलो भवारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ २४ ॥
जधी जन्मलों नेणुं दुःखा सुखाला ।
आयुर्दाय अज्ञानिं तो व्यर्थ गेला ॥
कळू लागतां खेळलों खेळ भारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ २५ ॥
तृतीयांश आयुष्य ऐसेंचि गेले ।
परी नाहिं त्वन्नाम मी आठवीलें ॥
अतां यौवन प्राप्त झालें अपारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ २६ ॥
परद्रव्य कांता पराची पहातां ।
स्मरादी रिपू ओढिती मानसाऽतां ॥
कसा ध्याउं तूतें मधुकैटभारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ २७ ॥
पुढे वृद्धता प्राप्त होईल वाटे ।
तिच्या यातना देखतां चित्त फाटे ॥
कधी भेटसी केविं हो चक्रधारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ २८ ॥
आयुष्यार्ध निद्रार्णवामाजि गेलें ।
पण तीन शेषांत ते जाण गेले ॥
तयांनी मना गोविलें दुःखभारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ २९ ॥
अशा घोर मायासमुद्रा पहातां ।
भिवोनी पदीं पातलों तुमच्याऽतां ॥
तरी क्लेश चिंतादि दुःखासि हारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ ३० ॥
त्यजा मत्त पाखंड तें सज्जना हो ।
धरा मानसी भक्ति निष्ठा दृढा हो ॥
भवांबूधिच्या नेइ तो पैलतीरीं ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ ३१ ॥
स्वतः घेतला दाखला सद्गुरूंचा ।
तसा घेति ते आणि घेतील साचा ॥
मनःकामना होतसे पूर्ण सारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ ३२ ॥
करी पाठ जो का स्तुती ही त्रिकाळा ।
तयाच्या प्रतापें पडे भीति काळा ॥
गुरु सर्व दारिद्र्य दुःखा निवारी ।
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥ ३३ ॥
टिप्पणी पोस्ट करा
आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .