विसरूं कसा मी गुरुपादुकाला | श्रीगुरुपादुकाष्टक मराठी

ज्या संगतीनेच विराग झाला । 

मनोदरींचा जडभास मेला । 

साक्षात् परात्मा मज भेटवीला । 

विसरूं कसा मी गुरुपादुकाला ॥१ ॥


 सद्योगपंथें घरि आणियेलें । 

अंगेंच मातें परब्रह्म केलें । 

प्रचंड तो बोधारवी उदेला । 

विसरूं कसा मी गुरुपादुकाला ॥२ ॥ 


चराचरी व्यापकता जयाची । 

अखंड भेटी मजला तयाची । 

परं पदी संगम पूर्ण झाला । 

विसरूं कसा मी गुरुपादुकाला ॥३ ॥ 


जो सर्वदा गुप्त जनांत वागे । 

प्रसंगा भक्तां निजबोध सांगे । 

सद्भक्तिभावाकरितां भुकेला । 

विसरू कसा मी गुरुपादुकाला ॥४ ॥ 


अनंत माझे अपराध कोटी ।

 नाणी मी घालुनि सर्व पोटी । 

प्रबोध करितां श्रम फार झाला । 

विसरू कसा मी गुरुपादुकाला ॥५ ॥ 


कांही मला सेवनही न झालें । 

तथापि तेणें मज उद्धरीलें । 

आतां तरी अर्पिन प्राण त्याला । 

विसरु कसा मी गुरुपादुकाला ॥६ ॥ 


माझा अहंभाव वसे शरीरीं । 

तथापि तो सद्गुरु अंगिकारी ।

नाहीमनी अल्पविकार ज्याला । 

विसरु कसा गुरुपादुकाला ॥७ ॥ 


आतां कसा हा उपकार फेडू । 

हा देह ओवाळुनि दूर सांडूं । 

म्यां एकभावे प्रणिपात केला । 

विसंरु कसा मी गुरुपादुकांला ॥८ ॥ 


जया वानितांवानितां वेदवाणी । 

म्हणे नेति नेतीति ' लाजे दुरुनी ॥

 नव्हे अंत ना पार ज्याच्या रूपाला । 

विसंरु कसा मी गुरुपादुकाला॥९ ॥


जो साधुचा अंकित जीव झाला ।

 त्याचा असे भार निरंजनाला । 

नारायणाचा भ्रम दूर केला । 

विसरूं कसा मी गुरुपादुकाला ॥१० ॥



थोडे नवीन जरा जुने