आम्ही चुकलो जरी तरी काही ।
तूं चुकू नको अंबाबाई ।।धृ .।
तुझे नांव ' आनंदी ' साजे |
तुझा महिमा त्रिभुवनी गाजे |
तुझे सगुणरूप विराजे |
तुला वंदिती सन्मुनि , राजे ।
गुण गाती वेदशास्त्रेही ।।
आम्ही चुकलो जरी तरी काही ।
आम्ही अनाथ , दीन भिकारी ।
तूं समर्थ , प्रभु अधिकारी ।
आम्ही पतित पातकी भारी ।
तूं पावन भव संसारी ।
तू पर्वत , आम्ही रजराई ।।
आम्ही चुकलो जरी तरी काही ।
आम्ही कुपुत्र म्हणवुन घेऊ ।
तू नको कुमाता होऊ |
आम्ही विषय ढेकळे खाऊ ।
तूं प्रेमामृत दे खाऊ |
आम्ही रांगू तू उभी राही ।।
आम्ही चुकलो जरी तरी काही ।
आम्ही केवळ जडमूढप्राणी |
चैतन्यस्वरूप तू शहाणी ।
फट बोबडी आमुची वाणी ।
तूं वदू नको आमच्या वाणी ।
आम्ही रडू तू गाणे गाई ।।
आम्ही चुकलो जरी तरी काही ।
आम्ही चातक तुजविण कष्टी ।
तू करी कृपामृत वृष्टी ।
म्हणे विष्णुदास धरी पोटी ।
अपराध आमुचे कोटी ।
अशी आठवण असू दे हृदयी ||
आम्ही चुकलो जरी तरी काही ।