माझी पतिताची, पाप कृति खोटी ।
तुझी पावन करण्याची शक्ती मोठी ।
समजवता मी, काय समजाऊ ।
ऊठ अंबे तू, झोपी नको जाऊ ॥ १ ॥
जरी गेलीस तू मायबाई झोपी ।
तरी बुडतिल भव सागरात पापी ।
ब्रह्मज्ञानी लागतील वाहूं ।
ऊठ अंबे तू, झोपी नको जाऊ ॥ २ ॥
काम क्रोधादिक चोरटे गृहात ।
शिरूनी पडले ते दुष्ट आग्रहात ।
लुटू म्हणती हाणू, मारू जीव घेऊ ।
ऊठ अंबे तू, झोपी नको जाऊ ॥ ३ ॥
काळसर्प मुख वासुनी उशाला ।
टपत बसला तो, भिईना कशाला ।
कितीतरी या निर्वाणी तुला वाहू ।
ऊठ अंबे तू, झोपी नको जाऊ ॥ ४ ॥
कृपा सोडुनि निजलीस यथासांग ।
उपेक्षीसी मज काय अता सांग ।
कृपावंते निष्ठूर नको होऊ ।
ऊठ अंबे तू, झोपी नको जाऊ ॥ ५ ॥
तुझ्याविण मी कोणासी हात जोडू ।
आई म्हणुनी, कोणाचा पदर ओढू ।
तुझे पाय सोडून कुठे जाऊ ।
ऊठ अंबे तू, झोपी नको जाऊ ॥ ६ ॥
जगी त्राता तुजविण कोणि नाही ।
माझी कळकळ जाणित कोणी नाही ।
तूच जननी, तूं जनक बहीण भाऊ ।
ऊठ अंबे तू, झोपी नको जाऊ ॥ ७ ॥
नको सांड करू, माझिया जिवाची ।
तुला एकविरे आण भार्गवाची ।
नको सहसा जगदंबे अंत पाहू ।
ऊठ अंबे तू, झोपी नको जाऊ ॥ ८ ॥
जरी माझी ना, करिसी तू, उपेक्षा ।
तरी वाढेल तुझे नाव याहीपेक्षा ।
विष्णुदास म्हणे गुण तुझे गाऊ ।
ऊठ अंबे तू, झोपी नको जाऊ ॥ ९ ॥
Very nice..very useful and informative content
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा
आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .