पुष्पांजली अर्पितसे तुज दयाघना ।
रिपुदमना भयशमना दुरतिनाशना॥धृ .॥
यज्ञेश्वर यज्ञपती याज्य श्रीपती ।
देवादिक साह्य तुझे नित्य वांछिती ॥
गौरविती सकलहि तुज शास्त्र आणि श्रुति ।
सकला तू सुखदायक सुखवि लोचना ॥१ ॥
भोक्ता तू सम्राट तू जगद्व्यापका ।
स्वानंदी रमत सदा विरतिनायका ॥
राज्य तूचि राजसि बा विश्वपालका ।
तू ब्रह्मा शिव विष्णू निखिल - वंदना ॥२ ॥
ध्याता तू ध्येयचि तू ध्यान तू असे ।
ज्ञाता तू ज्ञेय तूचि ज्ञानही तसे ॥
कर्ता तू करविसि तव पूर्ण कृति दिसे ।
किंचिदपि त्वद्विण जगि नान्य पावना ॥३ ॥
सच्चित्सुख पूर्ण परात्पर ब्रह्म तू ।
मायापति मायाहर ज्ञानदीप तू ॥
विविधत्वे आराध्या ! जगति एक तू ।
तू धर्ता तू हर्ता पतितपावना ॥४ ॥
श्रीशा तव मूर्ति असो हृदयमंदिरी ।
धरूनि भाव अर्पितसे तुलसिमंजिरी ॥
रति मम तव चरणि असो ठेवि कर शिरी ।
अघशमना मनरमणा भव विमोचना ॥५ ॥