जय जय जगदंबे । श्री अंबे ।
रेणुक, कल्पकदंबे जय जय जगदंबे ॥ धृ ॥
अनुपम स्वरुपाची, तुझी घाटी । अन्य नसे या सृष्टी ॥
तुजसम रुप दुसरे परमेष्टी । करिता झाला कष्टी ॥
शशीरस रसरसला, वदनपुटी । दिव्य सुलोचन दृष्टी ॥
सुवर्ण रत्नांच्या शिरी मुकुटीं । लोपति रवि शशि कोटी ॥
गजमुखं तुज स्तविले हेरम्बे । मंगल सकळारंभे ॥ १ ॥
जय जय जगदंबे...
कुंकम चिरी शोभे मळवटी । कस्तुरी तिलक लल्लाटी ॥
नासिक अति सरळ हनुवटी । रुचिरामृतरस ओठी ॥
समान जणुं लवल्या धनुकोटी । आकर्ण लोचन भ्रुकुटी ॥
शिरी निट भांग वळी उफराटी । कर्नाटकची धाटी ॥
भुंजग निळरंगापरि शोभे । वेणी पाठीवर लोंबे ॥ २ ॥
जय जय जगदंबे...
कंकणे कनकाची मनगटी । दिव्य मुद्या दश बोटी ॥
बाजूबंद नगे बाहुवटी । चर्चुनी केशर ऊटी ॥
सुगंध पुष्पांचे हार कंठी । बहु मोत्यांची दाटी ॥
अंगी नवी चोळी जरिकाठी । पीत पितांबर तगटी ॥
पैंजण पदकमळी अति शोभे । भ्रमर धावती लोभे ॥ ३ ॥
जय जय जगदंबे..
साक्षप तुं क्षितीच्या तळवटी । तूचि स्वये जगजेठी ॥
ओवाळिन आरती दीपताटी । घेऊनी कर संपुष्टी ॥
करुणामृतहृदये संकष्टी । धावसि भक्तासाठी ॥
विष्णुदास सदा बहुकष्टी । देशिल जरि निज भेटी ॥
तरि मज काय उणे या लाभे । धाव पाव अविलंबे ॥ ४ ॥
जय जय जगदंबे...
टिप्पणी पोस्ट करा
आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .