विपुल दयाघन गर्जे | Vipul dayāghan garje tava | देवीची आरती

विपुल दयाघन गर्जे तव हृदयांबर श्रीरेणुके वो । 

पळभर नरमोराची करुणा वाणी ही आईके ।। धृ .।। 


श्रमलीस खेळुनी नाचूनी गोंधळ घालूनि ब्रह्मांगणी वो ।

निजलिस कशी दीनाची चिंता सोडुनी अंतःकरणी वो | 

उठ लवकर जगदंबे त्र्यैलोक्याची तू स्वामिनी वो । 

विधी हरी हर अज्ञानी पूर्ण ज्ञानी तू शहाणी वो । 

समर्थ परमेश्वरी तू अनंत ब्रह्मांड नायिके वो || १ || 

पळभर ।। धृ .।।


शरणागत मी आलो परि बहू चुकलो बहु बोलावया वो | 

तुज जननीचे नाते लाज न वाटे लावावया वो | 

परि तूं दिनांची जननी अनाथांची तुज बहु दया वो । 

हे श्रुति सत्य की असत्य अनुभव आलो मी पहावया वो |

कळेल तैसी करी परि निज ब्रीद रक्षी मम पालिके वो || २ || 

पळभर ।। धृ .।।


भवगदे पिडलो भारी मजला दुःख हे सोसेना वो | 

अजुनी अंबे तुजला माझी करुणा का येईना वो | 

तारी अथवा मारी धरिले चरण मी सोडीना वो | 

कृपा केलियावाचुनी विन्मुख परतुनी मी जाईना वो | 

तुजवीन जगी कोणाचे वद पद प्रार्थावे अंबीके वो || ३ ||

 पळभर ।। धृ .।।


ऐकूनी करुणा वाणी ह्दयी सप्रेम द्रवली हो । 

प्रसनमुख जगदंबा अंबा प्रसन्न जाहली हो । 

अजरामर वर द्याया प्रगटुनी पुढे उभी राहिली हो । 

भक्तांकित अभिमानी विष्णुदासाची माऊली हो । 

जी निज इच्छा मात्रे सुत्रे हालवी कवतुके हो || ४ || 

पळभर ।। धृ .।।




थोडे नवीन जरा जुने