जय जय नदीपतिप्रियतनये ।
भवानी महालक्ष्मी माये ॥ धृ ॥
आदिक्षीरसागर रहिवासी । जय जय कोल्हापूरवासी ।
अंबे भुवनत्रयी भ्रमसी । सदा निज वैकुंठी वससी ॥
दुर्लभ दर्शन अमरांसी । पावशी कशी मग इतरांसी ॥
करुणालये मोक्षदानी ...२ ।
भक्त जे परम, जाणती वर्म सदा पदि नम्र,
कृपेने त्यासि सदा पाहे । संकटी रक्षिसि लवलाहे ॥ १ ॥
जय जय नदीपतिप्रियतनये...
अमरेश्वर विधि-हरि-हर । मिळाले असुरांचे भार ॥
मंदाचल नग रवि थोर, केला वासुकीचा दोर ॥
ढवळिला सागर गरगर । रगडिले जलचर मीन मगर ॥
लाजती कोटी काम पोटी ...२ ।
तुझे सौंदर्य गळाले, धैर्य म्हणति सुर आर्य,
जाळितो रतिपति सोसू न ये । होता जन्म तुझ सुनये ॥ २ ॥
जय जय नदीपतिप्रियतनये...
त्रिभुवनि स्वरुपे तू अगळी । वरिलासी त्वा वनमाळी ।
तुजसम न मिळे वेल्हाळी । शंकर मकरध्वज जाळी ॥
न मिळे स्पर्शहि पदकमळी । पदरज लागो तरि भाळी ॥
पितांबर शोभतसे पिवळा ...२ ।
बहर जरतार, हरी भरतार, तरी मज तार,
स्तवितां तुज जरी गुणग्राहे । दशशतवदनाही भ्रम ये ॥ ३ ॥
जय जय नदीपतिप्रियतनये...
सनकादिक ब्रह्मज्ञानी । ध्याती चरण तुझे ध्यानी ॥
दृढासन घालुनि निर्वाणी । बैसले महामुनी तपि-ध्यानी ।
जरी मी मंदबुद्धि जननी । तुझे गुण वर्णू कसे वदनी ॥
जरी हा विष्णूदास तुझा ...२ ।
बहू अपात्र, करी सुपात्र, कृपा तीळमात्र,
करोनी मोक्षपदी वाहे । अंबे लवकर वर दे ये ॥ ४ ॥
जय जय नदीपतिप्रियतनये...
टिप्पणी पोस्ट करा
आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .