श्री मंगळागौरीची आरती

॥ आरती मंगळागौरीची ॥

जय देवी मंगळागौरी । ओवाळीन सोनियाताटी ।
रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती । हिरेया ज्योती ॥ धृ ॥

मंगळमूर्ती उपजली कार्या । प्रसन्न झाली अल्पायुषी राया ।
तिष्ठली राज्यबाळी । आयोपण द्यावया ॥ जय. ॥ १ ॥

पूजेला ग आणिती जाईजाईच्या कळ्या । सोळा तिकटी सोळा दूर्वा ।
सोळा परींची पत्री । जाई जुई आबुल्या शेवंती नागचाफे ।
पारिजातकें मनोहरें । गोकर्ण महाफुले नंदटे तगरे ।
पूजेला ग आणिली ॥ २ ॥

साळीचे तांदूळ मुगाची डाळ । आळणी खिचडी रांधिती नारी ।
आपुल्या पतीलागी सेवाकरिती फार ॥ जय. ॥ ३ ॥

दुमदुमे दुमदुमे वाजंत्री वाजती । कळावी कांकणे गौरीला शोभती ।
शोभती बाजूबंद । कानी कापांचे गवे ।
ल्यायिली अंबा शोभे ॥ जय ॥ ४ ॥

न्हाउनी माखुनी मौनी बैसली । षाटावाची चोळी क्षीरोपदक नेसली ।
स्वच्छ बहुत होऊनी अंबा पुजू लागली ॥ जय ॥ ५ ॥

सोनिया ताटीं घातिल्या । पंचारती । मध्ये उजळती कापुराच्या वाती ।
करा धूप दीप । आता नैवेद्य षड्रस पक्वान्ने ।
ताटी भरा बोनें ॥ जय ॥ ६ ॥

लवलाहे तिघें काशीसी निघाली । माऊली मंगळागौर भिजवू विसरली ।
मागुती परतुनिया आली । अंबा स्वयंभू देखिली ।
देऊळ सोनियाचे । खांब हिरेयांचे । कळस वरती मोतियांचा ।
जय देवी मंगळागौरी । ओवाळीन सोनियाताटी ॥ ७ ॥

Post a Comment

आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .

थोडे नवीन जरा जुने