शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आता ॥ धृ ॥
तू केवळ माता जनिता सर्वथा तू हितकर्ता ।
तू आप्तस्वजन भ्राता सर्वथा तूची त्राता ।
भयकर्ता तू भयहर्ता, दंडधर्ता तू परिपाता ।
तुजवाचुनी न दुजी वार्ता तू आर्ता आश्रय दत्ता ॥ १ ॥
अपराधास्तव गुरुनाथा जरी दंडा धरिसी यथार्था ।
तरि आम्ही गाऊनी गाथा तव चरणी नमवू माथा ।
तू तथापि दंडिसी देवा कोणाचा मग करू धावा ।
सोडवीता दुसरा तेव्हा कोण दत्ता आम्हा त्राता ॥ २ ॥
तू नटसा होऊनि कोपी दंडीताही आम्ही पापी ।
पुनरपिही चुकत तथापि आंम्हावरी नच संतापी ।
गच्छतः स्खलनं क्वापि, असे मानुनी नच हो कोपी ।
निजकृपालेशा ओपी आंम्हावरी तू भगवंता ॥ ३ ॥
तव पदरी असता ताता, आडमार्गी पाऊल पडता ।
सांभाळूनी मार्गावरता आणिता न दुजा त्राता ।
निज बिरुदा आणूनी चित्ता तू पतितपावन दत्ता ।
वळे आता आंम्हावरता करुणाघन तू गुरुनाथा ॥ ४ ॥
सहकुटुंब सहपरिवार दास आम्ही हे घरदार ।
तव पदी अर्पू असार संसाराहित हा भार ।
परहरिसी करुणासिंधो तू दीनानाथ सुबंधो ।
आंम्हा अघ लेश न बाधो वासुदेव प्रार्थित दत्ता ॥ ५ ॥
टिप्पणी पोस्ट करा
आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .