आरती दत्तराजयाची धुंडीराजसुपुत्राची ॥ धृ ॥
पुण्यग्रामी तू वससी, भक्तां पावन तू करिसी ।
भजती त्याते उद्धरीसी, न भजती त्यांही कृपा करीसी ।
(चाल) पुरुषोत्तमा तू अवतारा, पुरुषोत्तमा तू अवतारा ।
शरण येऊन, विनीत होऊन, धुळी घेईन ।
श्रीगुरू आपुल्या चरणांची, किमया पावन करण्याची ॥
आरती दत्तराजयाची धुंडीराजसुपुत्राची ॥ १ ॥
भागवतावरी तव प्रीती, स्वकुळी गणेशदत्तभक्ती ।
ज्ञानी विद्यावाचस्पती, अंकित कुंडलिनी शक्ती ।
(चाल) कवीश्वरा तू ईश्वरा, कवीश्वरा तू ईश्वरा ।
जगती प्रगटून, लीला दावून, तरीही लपवून ।
ठेविली ओळख स्वरूपाची, गाईन लीला कीर्तीची ॥
आरती दत्तराजयाची धुंडीराजसुपुत्राची ॥ २ ॥
शुभ्र वस्त्र शुचीचे ल्याले, वात्सल्या मूर्तरूप आले ।
ज्ञाना विनये शोभविले, ब्रह्म साकारुनि आले ।
(चाल) भक्तवत्सला दयाघना, भक्तवत्सला दयाघना ।
दृष्टीने करुण, मजला बघून, जवळी घेऊन ।
वर्षा करी बा ममतेची, मागीन भिक्षा भक्तीची ॥
आरती दत्तराजयाची धुंडीराजसुपुत्राची ॥ ३ ॥