जयदेवा जयदेवा जय परशुरामा | परशुरामाची आरती

जमदग्नी कुमार म्हणती भृगवीरा ।
दुष्ट क्षत्रिय मारुनी हरीसी भूमारा ॥
आदी अंत मध्य नाही तुज वीरा ।
भक्ता दर्शन देण्या धरिसी अवतारा ॥ १ ॥

जयदेवा जयदेवा जय परशुरामा ।
आरती ओवाळूं परिपूर्ण कामा ॥ धृ ॥

पीतांबर धर सुंदर वपुः श्रीवदना ।
ब्रह्म-रुद्रादीक वंदिती तव चरणा ॥
सर्वांगी तुळशी शोभती भवहरणा ।
कंठी अक्षमाळा स्वानंद सदना ॥ २ ॥
जयदेवा...

आधी मत्स्य होऊनी मनुला रक्षियला ।
कूर्मरुपे पृष्ठी मंदलाचल धरिला ॥
सूकर रूपे हिरण्याक्ष मारीला ।
प्रल्हादास्तव आपण स्तंभी अवतरला ॥ ३ ॥
जयदेवा...

वामन रूपे बळीला पाताळी नेला ।
चिरंजीव होऊनी महेंद्री राहीला ॥
रघुकुळी येऊनी रावण मारीला ।
कृष्णरूपे यदुकुळी यादव रक्षीला ॥ ४ ॥
जयदेवा...

कलियुग अवतार बौद्धाचा धरिला ।
पंढरपुरी राहूनी पंढरी जाहला ॥
कलिचा अवतार घेसी सुरवरा ।
धर्म रक्षूनीया शोभसी तूं बरा ॥ ५ ॥
जयदेवा...

Post a Comment

आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .

थोडे नवीन जरा जुने