जय जय रेणुके आई जगदंबे ।
ओवाळू आरती मंगलारंभे ।।धृ .।।
शुभ मंगलोत्सव मंगळवारी |
मंगल वाजंत्री वाजती द्वारी ।।
मंगळकृत जागर समारंभे ।
जय जय रेणुके || १ ||
मंगल मंडपी तू राजबाळा |
शोभती मौक्तिक नक्षत्र माळा ||
भरजरी झालर नारळ अंबे |
जय जय रेणुके || २ ||
भडक पीतांबर कंचुकी पिवळी |
नवरत्न माणिक मणी मोती पवळी |
तळपति रवि - शशींची प्रतिबिंबे |
जय जय रेणुके || ३ ||
कुंकुमकड्कणालंकृत वायन |
चंदनचर्चन अर्चन गायन ||
उतरति नरनारी तुज लोणलिंबे |
जय जय रेणुके || ४ ||
आदिमूळ माये तू विश्वाची राणी |
लावण्यरुप सौभाग्याची राणी ।
पाहतां तुज देहभान विसंबे ।
जय जय रेणुके || ५ ||
जाहली दुर्लभ भेट आनंदे |
पाहिली विमल चरणारविन्दे ।।
मन विष्णुदासाचे विरो अंविलंबे ।
जय जय रेणुके || ६ ||