श्री गजानन विजय ग्रंथ
अध्याय एकोणिसावा प्रारंभ
श्रीगणेशायनमः ॥
जयजयाजी आनंदकंदा । जयजयाजी अभेदा ।
माझें नमन तुझ्या पदा । असो सर्वदा अनन्यभावें ॥ १ ॥
हे राघवा रघुपती । पाव आतां शीघ्र गती ।
माझा अंत पहाशी किती ? । हें कांहीं कळेना ॥ २ ॥
खऱ्या थोराशीं कठोरता । नाहीं शोभत अनंता ।
याचा विचार कांहीं चित्ता । करा आपुल्या ये काळीं ॥ ३ ॥
मी दीनवाणें मारितों हांका । मला दगा देऊं नका ।
हे जगदीशा जगन्नायका । पावा दासगणूस ॥ ४ ॥
महाराज असतां शेगांवांत । विप्र एक काशिनाथ ।
जो खंडेरावाचा होय सुत । गर्दै उपनांव जयाचें ॥ ५ ॥
तो आला दर्शना । समर्थांच्या वंदिले चरणां ।
मूर्ति पाहून त्याच्या मना । आनंद झाला अतिशय ॥ ६ ॥
माझ्या सन्माननीय वडिलानें । जीं जीवन्मुक्ताचीं लक्षणें ।
लिहिलीं अनुभवानें । त्याची प्रत्यक्ष मूर्ति ही ॥ ७ ॥
माझें भाग्य धन्य धन्य । म्हणून हें पाहण्या चरण ।
आलों खामगांवाहून । त्याचें सार्थक झालें कीं ॥ ८ ॥
तो समर्थांनीं लीला केली । कोपरखिळी मारली ।
काशिनाथाच्या पाठीस भली । आपुल्या परमकृपेनें ॥ ९ ॥
जा तुझा हेत पुरला । वाट पाहे तारवाला ।
या भाषणें घोंटाळला । काशिनाथ मानसी ॥ १० ॥
म्हणे काम ना माझें ये ठाईं । मी न आलों मागण्या कांहीं ।
तारवाला शिपाई । वाट पहातो काय हैं ? ॥ ११ ॥
त्याचें गूढ कळेना । पुसण्या छाती होईना ।
निमुटपणें वंदून चरणा । गेला निघून खामगांवीं ॥ १२ ॥
तों तारवाला शिपाई । उभा दारांत होता पाही ।
तार घेतली घाई घाई । कशाची ती बघण्यास ॥ १३ ॥
तारेंत हा मजकूर । तुमचा केला तक्रूर ।
मुनसफीच्या हुद्द्यावर । मोर्शी तालुक्याकारणें ॥ १४ ॥
तें पाहतां आनंदला । कोपरखिळीचा अर्थ कळला ।
त्या काशिनाथपंताला । पहा संतांचें ज्ञान कैसें ? ॥ १५ ॥
असो एकदा नागपुरीं । समर्थांची गेली स्वारी ।
गोपाळ बुटीचिया घरीं । त्याच्या अति आग्रहानें ॥ १६ ॥
ही भोसल्याची राजधानी । पूर्वकालीं होती जाणी ।
त्या शहराची आज दिनीं । दैना झाली विबुध हो ॥ १७ ॥
स्वातंत्र्यरूपी प्राण गेला । खरा धनी याचक ठरला ।
परक्यांचा बोलबाला । झाला जया शहरांत ॥ १८ ॥
गज घोडे पालख्या अपार । नाहींशा झाल्या साचार ।
रस्त्यानें फिरे मोटार । अति जोराने विबुध हो ॥ १९ ॥
असो हा महिमा काळाचा । नाहीं दोष कवणाचा ।
वाडा गोपाळ बुटीचा । होता सीताबर्डीवर ॥ २० ॥
त्या भव्य सदनांत । नेऊन ठेविले सद्गुरुनाथ ।
जैसा वाघ किल्ल्यांत । कोंडोनिया टाकावा ॥ २१ ॥
बुटीचा ऐसा विचार । या सीताबर्डीवर ।
महाराज ठेवावे निरंतर । जाऊं न द्यावें शेगांवा ॥ २२ ॥
अक्रुरानें कृष्णाला । जैसा मथुरेमाजीं नेला ।
तोच प्रकार येथें झाला । काय वर्णन करावें ? ॥ २३ ॥
शेगांव पडलें भणभणीत । अवघे लोक दुःखित ।
विनविती हरी पाटलाप्रत । महाराज येथे आणा हो ॥ २४ ॥
कुडीमधून गेला प्राण । कोण पुसे तिजलागुन ? ।
तैसें समर्थांवांचून । शेगांव हें प्रेत पाहा ॥ २५ ॥
तुम्हीं गांवचे जमेदार । करा याचा विचार ।
बुटी मोठा सावकार । तेथें न आमुचा लाग लागे ॥ २६ ॥
टक्कर हत्तीहत्तींची । होणें आहे योग्य साची ।
येथें आम्हांसम कोल्ह्यांची । नाहीं मुळीं किंमत ॥ २७ ॥
जंबुमाळीसी लढायाला । मारुती हाच योग्य ठरला ।
जिंकावया कर्णाला । झाली योजना अर्जुनाची ॥ २८ ॥
तुम्हीं नागपुराप्रती जावें । समर्थांसी घेऊन यावें ।
आम्हां अवघ्यांस सुखवावें । हीच आहे विनंति ॥ २९ ॥
इकडे बुटीच्या घरांत । आजुर्दे राहिलें संत ।
जेवीं हस्तिनापुरांत । कृष्ण नाहीं आनंदला ॥ ३० ॥
महाराज म्हणती बुटीसी । जाऊं दे मज शेगांवासी ।
या आपुल्या भव्य सदनासी । ठेवून आम्हां घेऊं नको ॥ ३१ ॥
तें बुटी मुळींच मानीना । समर्था जाऊं देईना ।
अनागोंदीचा रामराणा । बुटी वाटे निःसंशय ॥ ३२ ॥
बुटी भाविक होता जरी । अहंता नव्हती गेली खरी ।
श्रीमंतीचा गर्व भारी । त्याच्या ठाईं वसतसें ॥ ३३ ॥
रोज ब्राह्मणभोजन । समर्थांपुढे सदा भजन ।
परी शेगांवचे येत जन । बंदी त्या तो करीतसे ॥ ३४ ॥
जाऊं न देई दर्शना । शेगांवचे लोकांना ।
बिगरपरवानगी श्रीमंतसदना । जातां नये कवणासी ॥ ३५ ॥
शेगांवचे लोक भले । जरी आणावया गेले ।
परी न कांही उपाय चाले । गेले तसेंच आले परत ॥ ३६ ॥
इकडे भक्त पाटील हरी । कांहीं मंडळीं बरोबरी ।
घेऊन निघाला नागपुरीं । समर्थांसी आणावया ॥ ३७ ॥
बसला अग्निरथांत । त्याच वेळीं वदलें संत ।
त्या गोपाळ बुटीप्रत । येणें रीति तें ऐका ॥ ३८ ॥
अरे गोपाळा ! पाटील हरी । निघाला यावया नागपुरीं ।
तो येण्याच्या आंत परी । मला येथून जाऊं दे ॥ ३९ ॥
तो येथें आल्यावर । शांतता नाहीं राहणार ।
तो पडला जमेदार । याचा विचार करावा ॥ ४० ॥
तुझ्या धनाच्या जोरावरी । उड्या या जाण निर्धारी ।
तो मनगटाच्या बळावरी । नेईल मजला येथून ॥ ४१ ॥
हरी पाटील तेथें आला । शिपायानें अटकाव केला ।
परी तो न त्यानें मानिला । प्रवेश केला सदनांत ॥ ४२ ॥
गोपाळ बुटीचिया घरीं । पंगत होती थोर खरी ।
पाटील आल्याच्या अवसरीं । आले ब्राह्मण भोजना ॥ ४३ ॥
ताटें चांदीचीं अवघ्यांस । शिसमचे पाट बसण्यास ।
होत्या पातळ पदार्थांस । वाट्या जवळ चांदीच्या ॥ ४४ ॥
नानाविध पक्वान्नें । होती भोजनाकारणें ।
मध्यभागा आसन त्यानें । मांडिले समर्थ बसण्यास ॥ ४५ ॥
ऐशी बुटीची श्रीमंती । तिचे वर्णन करूं किती ? ।
ज्याला कुबेर बोलती । लोक नागपूर प्रांतींचा ॥ ४६ ॥
असो हरी पाटील सदनांत । आले समर्था नेण्याप्रत ।
तों महाराज निघाले धांवत । द्वारीं त्यास भेटावया ॥ ४७ ॥
वांसरा गाय पाहून । जैसी येई धांवून ।
तैसे स्वामी गजानन । पाटलासाठीं धांवलें ॥ ४८ ॥
चाल हरी शेगांवासी । येथे मुळी न राहणें मसी ।
तूं आलास न्यावयासी । हें फार बरें झालें ॥ ४९ ॥
समर्थ जाऊं लागले । ते गोपाळाने पाहिले ।
अनन्यभावें चरण धरिले । समर्थांचे येऊन ॥ ५० ॥
विक्षेप माझा गुरुराया ! । नका करूं या समया ।
दोन घांस घेऊनिया । इच्छित स्थला मग जावें ॥ ५१ ॥
तैसेंच बुटी पाटलासी । बोलूं लागले विनयेसी ।
तुम्ही घेऊन प्रसादासी । जावें हेंच मागणें ॥ ५२ ॥
येथें न रहाती महाराज । हें समजून आलें आज ।
पंक्तित माझी राखा लाज । तुम्हीच पाटील येधवां ॥ ५३ ॥
आत्तांच समर्थ गेले जरी । लोक उपाशी उठतील तरी ।
आणि अवघ्या नागपुरीं । टीका माझी होईल पहा ॥ ५४ ॥
भोजनें होईपर्यंत । महाराज राहिले तेथ ।
शेगांवची समस्त । मंडळी पंक्तीस जेवली ॥ ५५ ॥
भोजनोत्तर तयारी । निघण्याची ती झाली खरी ।
दर्शनाची भीड भारी । झाली बुटीच्या वाड्यांत ॥ ५६ ॥
कुटुंब गोपाळ बुटीचें । जानकाबाई नांवाचें ।
परम भाविक होतें साचें । गृहलक्ष्मीच होती जी ॥ ५७ ॥
तिनें केली विनवणी । महाराजांचे चरणीं ।
माझा हेतु मनींच्या मनीं । बसूं पाहतो गुरुराया ! ॥ ५८ ॥
तईं महाराज बोलले । तुझ्या मना मीं जाणीतलें ।
ऐसें म्हणून लाविलें । कुंकूं तिच्या कपाळास ॥ ५९ ॥
आणखी एक पुत्र तुला । परम सद्गुणी होईल भला ।
अंती जाशील वैकुंठाला । सौभाग्यासह बाळे तूं ! ॥ ६० ॥
ऐसा आशीर्वाद देऊन । निघते झाले दयाघन ।
त्या सीताबर्डीहून । आले रघुजीच्या घरीं ॥ ६१ ॥
हा भोसला राजा रघुजी । उदार मनाचा भक्त गाजी ।
ज्यानें ठेविला राम राजी । आपुल्या शुद्ध वर्तनें ॥ ६२ ॥
त्याचें लौकिकीं राज्य गेलें । जें अशाश्वत होतें भलें ।
शाश्वत स्वरूपाचें आलें । सद्गुरुभक्तीचें राज्य घरा ॥ ६३ ॥
उत्तम प्रकारचा आदर । केला राजानें साचार ।
त्याचा घेऊन पाहुणचार । रामटेकासी गेले पुढें ॥ ६४ ॥
तेथें रामाचें दर्शन । घेऊन आले परतून ।
शेगांवाच्या मठा जाण । हरी पाटलासमवेत ॥ ६५ ॥
धार-कल्याणचे रंगनाथ । जे थोर साधु मोंगलाईत ।
होते ते भेटण्याप्रत । समर्थां आले शेगांवीं ॥ ६६ ॥
अध्यात्माचीं बोलणीं । सांकेतिक केलीं दोघांनी ।
त्याचा भावार्थ जाणण्या कोणी । तेथें नव्हता समर्थ ॥ ६७ ॥
श्रीवासुदेवानंदसरस्वती । कर्ममार्गों ज्याची प्रीति ।
कृष्णातटाका ज्यांची महती । माणगांवी जन्म ज्यांचा ॥ ६८ ॥
ते येण्याचे अगोदर । बाळाभाऊस साचार ।
बोलते झाले गुरुवर । स्वामी गजानन सिद्धयोगी ॥ ६९ ॥
अरे बाळा उदयिक । माझा बंधु येतो एक ।
मजलागीं भेटण्या देख । त्याचा आदर करावा ॥ ७० ॥
तो आहे कर्मठ भारी । म्हणून उद्यां पथांतरीं ।
चिंध्या न पडूं द्या निर्धारी । अंगण स्वच्छ ठेवा रे ॥ ७१ ॥
चिंधी कोठें पडेल जरी । तो कोपेल निर्धारी ।
जमदग्नीची आहे दुसरी । प्रतिमा त्या स्वामीची ॥ ७२ ॥
तो कऱ्हाडा ब्राह्मण । शूचिर्भूत ज्ञानसंपन्न ।
हें त्याचें कर्मठपण । कवचापरी समजावें ॥ ७३ ॥
ऐसें बाळास आदले दिवशीं । सांगते झाले पुण्यराशी ।
तों एक प्रहर दिवसासी । स्वामी पातले तें ठायां ॥ ७४ ॥
एकमेकांसी पाहतां । दोघे हंसले तत्त्वतां ।
हर्ष उभयतांच्या चित्ता । झाला होता अनिवार ॥ ७५ ॥
एक कर्माचा सागर । एक योगयोगेश्वर ।
एक मोगरा सुंदर । एक तरू गुलाबाचा ॥ ७६ ॥
एक गंगा भागीरथी । एक गोदा निश्चिती ।
एक साक्षात् पशुपती । एक शेषशायी नारायण ॥ ७७ ॥
स्वामी जेव्हां मठांत आले । तेव्हां गजानन होते बैसले ।
आपल्या पलंगावरी भले । चिटक्या करानें वाजवीत ॥ ७८ ॥
स्वामी येतां चिटकी थांबली । दृष्टादृष्ट दोघां झाली ।
तैं स्वामींनीं विचारिली । आज्ञा परत जावया ॥ ७९ ॥
फार बरें म्हणून । गजाननें तुकविली मान ।
स्वामी गेले निघून । बाळास कौतुक वाटलें ॥ ८० ॥
बाळ म्हणे गुरुराया । हें दृश्य पाहूनिया ।
संशय उपजला चित्ता ठायां । त्याची निवृत्ति करा हो ॥ ८१ ॥
त्यांचा मार्ग अगदी भिन्न । तुमच्या ह्या मार्गाहून ।
ऐसें साच असून । तुमचा बंधु कसा तो ? ॥ ८२ ॥
ऐसा प्रश्न ऐकिला । समर्थ देती उत्तर त्याला ।
बरवा प्रश्न बाळा केला । त्वां हा आज आम्हांतें ॥ ८३ ॥
ईश्वराकडे जाण्याचे । तीन मार्ग असती साचे ।
हे तिन्ही मार्ग ज्ञानाचे । गांवा जाऊन मिळतात ॥ ८४ ॥
स्वरूपें त्यांचीं भिन्न भिन्न । दिसतीं पाहाणारांकारण ।
तेणें घोटाळा वरितें मन । पाहाणारांचें राजसा ! ॥ ८५ ॥
सोवळें ओवळें संध्यास्नान । व्रत उपोषणें अनुष्ठान ।
या कृत्यांलागून । अंगें म्हणावीं कर्माचीं ॥ ८६ ॥
ही अंगे जो आचरी । निरालसपणें खरी ।
तोच समजावा भूवरीं । ब्रह्मवेत्ता कर्मठ ॥ ८७ ॥
अधिक न्यून येथें होता । कर्ममार्ग न ये हातां ।
म्हणून विशेष तत्परता । ठेविली पाहिजे आचरणीं ॥ ८८ ॥
येथें एवढीच खबरदारी । घ्यावी लागते जाण खरी ।
परांकारणें दुरुत्तरीं । कदा त्यानें ताडूं नये ॥ ८९ ॥
आतां भक्तिमार्गाचें । ऐक हें लक्षण साचें ।
भक्तिपंथानें जाणाराचें । मन पाहिजे शुद्ध अती ॥ ९० ॥
मलीनता मनाठायीं । अंशेही राहिल्या पाही ।
त्याच्या हातां येत नाहीं । भक्तिरहस्य बापा रे ! ॥ ९१ ॥
दया प्रेम लीनता । अंगीं पाहिजे तत्त्वतां ।
श्रवणीं पूजनीं आस्था । पाहिजे त्याची विशेष ॥ ९२ ॥
मुखामाजीं नामस्मरण । करणें हरीस जाणून ।
ऐशीं अंगे असती जाण । या भक्तिमार्गाला ॥ ९३ ॥
या अंगांसह जो भक्ती करी । त्यालाच भेटे श्रीहरी ।
भक्तिमार्गाची न ये सरी । त्याचा विधी सोपा असे ॥ ९४ ॥
परी तो करण्या आचरण । कर्माहून कठीण जाण ।
जेवीं गगनाचें जवळपण । नेत्रांलागीं दिसतसे ॥ ९५ ॥
आतां योगमार्ग तिसरा । सांगतों मी ऐक खरा ।
या योगमार्गाचा पसारा । दोघांपेक्षां जास्त असे ॥ ९६ ॥
परी हा पसारा निश्चयेंसी । आहे ज्याचा त्याचे पासीं ।
योगमार्ग साधण्यासी । बाहेरचें न कांहीं लागे ॥ ९७ ॥
जेवढें आहे ब्रह्मांडांत । तेवढें आहें पिंडांत ।
त्या पिंडांतील साहित्य । घेऊन योग साधावा ॥ ९८ ॥
आसनें रेचक कुंभक । इडापिंगलेचे भेद देख ।
धौती मुद्रा त्राटक । कळलें पाहिजे मानवां ॥ ९९ ॥
कुंडली आणि सुषुम्ना । यांचे ज्ञान पाहिजे जाणा ।
आधी योग करणारांना । तरीच तो साधेल ॥ १०० ॥
या तिन्ही मार्गांचें । अंतिम फळ ज्ञान साचें ।
परी तें ज्ञान प्रेमाचें । वीण असतां कामा नये ॥ १०१ ॥
जें जें कृत्य प्रेमावीण । तें तें अवघें आहे शीण ।
म्हणून प्रेमाचें रक्षण । करणें तिन्ही मार्गात ॥ १०२ ॥
काळा गोरा खुजा थोर । कुरूप आणि सुंदर ।
हे शरीराचे प्रकार । त्याची न बाधा आत्म्यातें ॥ १०३ ॥
आत्मा अवघ्यांचा आहे एक । तेथें न पडे कदा फरक ।
शरीरभेद व्यावहारिक । त्याचें कौतुक कांहीं नसे ॥ १०४ ॥
तीच या तिन्हीं मार्गांची । स्थिति तंतोतंत साची ।
बाह्य स्वरूपें भिन्न त्यांचीं । परी मूळ कारण एक असे ॥ १०५ ॥
मुक्कामास गेल्यावर । मार्गांचा न उरें विचार ।
जो मार्गी चालतो नर । महत्त्व त्याचें त्यास वाटे ॥ १०६ ॥
पथ चालण्या आरंभ झाला । परी मुक्कामास नाहीं गेला ।
अशाचाच होतो भला । तंटा पंथाभिमानानें ॥ १०७ ॥
या तिन्ही मार्गांचे ते पांथ । मुक्कामीं पोंचल्या होती संत ।
मग तयांच्या संबंधांत । द्वैत नसे एतुलेंही ॥ १०८ ॥
वसिष्ठ, वामदेव, जमदग्नी । अत्री, पाराशर, शांडिल्य मुनी ।
हे कर्ममार्गाच्या सेवनीं । मुक्कामासी पोंचले ॥ १०९ ॥
व्यास, नारद, कयाधूकुमर । मारुती, शबरी, अक्रूर ।
उद्धव, सुदामा, पार्थ, विदूर । हे गेले भक्तिमार्गे ॥ ११० ॥
श्री शंकराचार्य गुरुवर । मच्छिंद्र, गोरख, जालंदर ।
हे चढले जिना थोर । या योगमार्गाचा ॥ १११ ॥
जो वसिष्ठा लाभ झाला । तोच विदुराच्या पदरीं पडला ।
तोच मच्छिंद्रानें भोगिला । फळामाजीं फरक नसे ॥ ११२ ॥
तीच प्रथा पुढें चालली । येथें न शंका घ्यावी मुळीं ।
कर्ममार्गाची रक्षिली । बूज श्रीपादवल्लभें ॥ ११३ ॥
नरसिंहसरस्वती यतिवर । तैसेच झाले साचार ।
ठिकाण ज्यांचे गाणगापूर । वाडी, औदुंबर ख्यात जगीं ॥ ११४ ॥
नामा, सावता, ज्ञानेश्वर । सेना, कान्हु, चोखा महार ।
दामाजीपंत ठाणेदार । गेले भक्तिमार्गांनीं ॥ ११५ ॥
शेख महंमद श्रीगोंद्यांत । आनंदी स्वामी जालन्यांत ।
सुर्जीअंजनगांवांत । देवनाथ चाहाते योगाचे ॥ ११६ ॥
तैसेंच आहे सांप्रत । कर्ममार्गी वासुदेव रत ।
मी धरला भक्तिपंथ । आणिक बहुता जणांनीं ॥ ११७ ॥
पळुसचे धोंडीबुवा । सोनगीरचा नाना बरवा ।
जालन्याचें यशवंतरावा । भक्तिपंथ साध्य झाला ॥ ११८ ॥
खाल्ला आम्मा ती विदेही । तेंवीं शिर्डीचे बाबा साई ।
गुलाबरावांचें ठायीं । ज्ञानदृष्टि असे रे ॥ ११९ ॥
पहा चांदूर तालुक्याचा । वरखेडें नामें ग्रामाचा ।
आडकूजी नामें संत साचा । गेला याच वाटेनें ॥ १२० ॥
मुऱ्हा गांवचें संतरत्न । झिंग्राजी तो होय जाण ।
तेवीं नागपूरचे ताजुद्दीन । भक्तिमार्गासी चाहाते ॥ १२१ ॥
या अवघ्या संतांचें । आचरण भिन्न प्रकारचें ।
परी अधिकारी कैवल्याचे । ते बैसले होऊनी ॥ १२२ ॥
मार्ग असो कोणताही । त्याचें मुळीं महत्त्व नाहीं ।
जो मुक्कामास जाई । त्याचें कौतुक करणें असे ॥ १२३ ॥
आम्ही ही भावंडें सारी । येतों झालों भूमिवरी ।
कैवल्याच्या मार्गावरी । भाविक आणून सोडावया ॥ १२४ ॥
जें ज्याला आवडेल । तिकडे तो जाईल ।
आणि मोक्षरूपी भोगील फल । त्या त्या पंथा आचरोनी ॥ १२५ ॥
आतां नको पुसूस कांहीं । हें न कोणा सांगे पाही ।
निवांत बसू दे ये ठायीं । पिसेंपणाच्या पासोडीनें ॥ १२६ ॥
ज्याची निष्ठा बसेल । वा ! जो माझा असेल ।
त्याचेंच कार्य होईल । इतरांची ना जरूर मला ॥ १२७ ॥
ज्यासी अनुताप झाला । ब्रह्मज्ञान सांगणे त्याला ।
उगीच तर्कटी वात्रटाला । स्फोट त्याचा करूं नये ॥ १२८ ॥
कोणी कांहीं म्हणोत । आपण असावें निवांत ।
तरीच भेटे जगन्नाथ । जगद्गुरू जगदात्मा ॥ १२९ ॥
ऐसा उपदेश ऐकिला । बाळाभाऊच्या नेत्रांला ।
प्रेमाश्रूचा लोटला । पूर तो न आवरे त्या ॥ १३० ॥
अष्टभाव दाटले । शरीरा रोमांच उमटले ।
वैखरीचें संपलें । काम तेणें सहजची ॥ १३१ ॥
मौनेंच केला नमस्कार । श्रीगजानन साधु थोर ।
वऱ्हाड प्रांताचा उद्धार । करावयासी अवतरला ॥ १३२ ॥
साळुबाई नांवाची । एक असे कण्व शाखेची ।
ती होती महाराजांची । मनापासून भक्तिण ॥ १३३ ॥
तिला महाराज एके दिनीं । ऐशा परी वदले वाणी ।
डाळ पीठ घेऊनी । स्वयंपाक करी अहोरात्र ॥ १३४ ॥
जे येतील तयांना । साळु घाल भोजना ।
येणेच तूं नारायणा । प्रिय होशील निःसंशय ॥ १३५ ॥
ती साळुबाई मठांत । आहे अजूनपर्यंत ।
जी वैजापूरची असे सत्य । माहेर वाडेंघोडें जिचें ॥ १३६ ॥
प्रल्हादबुवा जोशाला । होता कृपेचा योग आला ।
तो न तया फलद झाला । तयाचिया दुर्दैवें ॥ १३७ ॥
खामगांवच्या सान्निध्यासी । जलंब गांव परियेसी ।
त्या गांवचा रहिवासी । तुळशीराम एक असे ॥ १३८ ॥
पुत्र या तुळशीरामाचा । आत्माराम नांवाचा ।
होता तैलबुद्धीचा । वेदाध्ययनीं प्रेम ज्याचें ॥ १३९ ॥
हा धर्मपीठ वाराणसी । जी भागीरथीच्या तटा काशी ।
तेथें गेला अध्ययनासी । वेदवेदांग स्मृतीच्या ॥ १४० ॥
प्रत्यहीं भागीरथीचें स्नान । माधुकरीचें सेवी अन्न ।
गुरुगृहातें जाऊन । करी अध्ययन श्रुतीचें ॥ १४१ ॥
श्रोते विद्यार्थी ना तरी । अध्ययना जाती देशावरी ।
शिकण्याऐवजीं परोपरी । करूं लागती चैन ते ॥ १४२ ॥
चैनीमाजीं गुंतल्या मन । मग कशाचें अध्ययन ? ।
बिरूड आंब्यालागून । लागतां नाश रसाचा ॥ १४३ ॥
आत्माराम नव्हता यापरी । विवेकसंपन्न सदाचारी ।
विद्या अवघी करून पुरी । आला निजदेशातें ॥ १४४ ॥
स्वदेशीं येतां शेगांवासी । गेला असे अति हर्षी ।
हजिरी ती द्यावयासी । श्रीगजाननमहाराजा ॥ १४५ ॥
तो वेदविद्येचा जाणता । गजानन केवळ ज्ञानसविता ।
आत्माराम वेद म्हणतां । कोठें कोठें चुकतसे ॥ १४६ ॥
त्या चुकीची दुरुस्ती । करूं लागले सद्गुरुमूर्ती ।
आत्मारामाचे संगती । वेद म्हणती महाराज ॥ १४७ ॥
ऐकतां त्यांचें वेदाध्ययन । तन्मय होती विद्वान् ।
न होय सराफावांचून । किंमत त्या हिऱ्याची ॥ १४८ ॥
शेवटीं समर्थांचेपाशीं । आत्माराम राहिला आदरेंसी ।
मधु टाकुनी मक्षिकेसी । जाणें कैसें आवडेल ? ॥ १४९ ॥
प्रत्यहीं सेवेकारण । यावें त्यानें जलंबाहून ।
चुकविला ना एकही दिन । ऐसा एकनिष्ठ भक्त तो ॥ १५० ॥
समर्थांच्या पश्चात् । हाच होता मठांत ।
पूजा अर्चा करण्याप्रत । सद्गुरूंच्या समाधीची ॥ १५१ ॥
मोबदला न घेतां भली । एकनिष्ठ सेवा केली ।
शेवटीं त्यानेंच अर्पिली । इस्टेट आपली महाराजा ॥ १५२ ॥
इस्टेट अल्प साचार । एक जमीन एक घर ।
येथें न दृष्टि किंमतीवर । देणें आहे भाग पाहा ॥ १५३ ॥
भिल्लिणीनें रामाला । बोरें देऊन वश केला ।
तैसाच प्रकार हाही झाला । म्हणून केलें वर्णन ॥ १५४ ॥
स्वामी दत्तात्रय केदार । दुसरा नारायण जामकर ।
निव्वळ दुधाचा ज्यांचा आहार । तो दुधाहारी बुवा ॥ १५५ ॥
ऐसे श्रोते तिघे जण । स्वामींचे भक्त निर्वाण ।
ज्यांनी आपुलें तनमन । समर्थचरणीं अर्पिलें ॥ १५६ ॥
मोरगांव भाकरे नांवाचा । गांव बाळापूर तालुक्याचा ।
तेथील मारुतीपंत पटवाऱ्याचा । वृत्तान्त ऐका थोडासा ॥ १५७ ॥
श्रोते ! त्या मोरगांवांत । मारुतीपंताच्या शेतांत ।
पिकांचें रक्षण करण्याप्रत । तिमाजी नामें माळी होता ॥ १५८ ॥
तो माळी खळ्याभीतरीं । निजला निशिच्या अवसरीं ।
गाढ झोंप लागली खरी । ते अवसरी तयाला ॥ १५९ ॥
उलटून गेले दोन प्रहर । कुंभाराचे दहावीस खर ।
खळ्यांत येऊनी दाण्यावर । पडले असती पांड्याच्या ॥ १६० ॥
राखणदार झोंपी गेला । गर्दभासी आनंद झाला ।
ते खाऊं लागले जोंधळ्याला । राशींत तोंड घालूनी ॥ १६१ ॥
हा पांड्या मारुतीपंत । महाराजांचा होता भक्त ।
म्हणून सद्गुरुरायाप्रत । लीला करणें भाग आले ॥ १६२ ॥
क्षणांत जाऊनी मोरगांवासी । हांक मारिली तिमाजीसी ।
अरे ! जागा होई त्वरेसी । रासेसी गाढवें पडलीं ना ॥ १६३ ॥
ऐसें मोठ्यानें बोलून । तिमाजीस जागे करून ।
महाराज पावले अंतर्धान । खळ्यामधून तेधवां ॥ १६४ ॥
तिमाजी उठून पाहतां । गाढवें दिसली तत्त्वतां ।
म्हणे काय करूं आतां । मालक रागे भरेल कीं ॥ १६५ ॥
पिकाचें रक्षण करण्यासी । त्यानें ठेविलें आहे मसीं ।
विश्वासघात आज दिशीं । झाला त्याचा माझ्या हातें ॥ १६६ ॥
तो विश्वासला माझ्यावर । मी निजतां झालों निसूर ।
रास ही निम्यावर । खाऊन टाकली गाढवांनी ॥ १६७ ॥
आतां समजूत मालकाची । कोण्या रीतिं घालूं साची ।
पहा त्या वेळीं इमानाची । किंमत होती लोकांस ॥ १६८ ॥
ना तरी हल्लींचे नोकर । निमकहराम शिरजोर ।
नफातोट्याची तिळभर । काळजी न त्यांना मालकाच्या ॥ १६९ ॥
तिमाजी तैसा नव्हता । हळहळ लागली त्याच्या चित्ता ।
म्हणे काय जाऊन सांगू आतां । मी पांड्याकारणें ॥ १७० ॥
कांहीं असो चुकीची । माफी मागितली पाहिजे साची ।
उदार बुद्धि मारुतीची । आहे तो क्षमाच करील ॥ १७१ ॥
ऐसें मनाशीं बोलून । उदयास येतां नारायण ।
तिमाजी गांवांत येऊन । पाय धरी पंतांचे ॥ १७२ ॥
महाराज माझ्या झोंपेनीं । बुडविलें तुम्हांलागूनी ।
दहावीस गाढवांनी । येऊन रास खाल्ली कीं ॥ १७३ ॥
ती नुकसान किती झाली । ती पाहिजे पाहिली ।
खळ्यामाजीं जाऊनि भली । म्हणजे मज वाटेल बरें ॥ १७४ ॥
मारुती म्हणाले त्यावर । खळ्यांत यावया साचार ।
वेळ ना मला तिळभर । मी निघालों शेगांवा ॥ १७५ ॥
दर्शन घेऊन सद्गुरूचें । त्या गजानन महाराजांचें ।
उद्यां सकाळीं धान्याचें । काय झालें ते पाहीन ॥ १७६ ॥
ऐसें बोलून शेगांवाला । मारुतीपंत येतां झाला ।
दर्शनासाठी मठांत गेला । दहा अकराचे सुमारास ॥ १७७ ॥
महाराज होते आसनावरी । जगू पाटील समोरी ।
बाळाभाऊ बद्ध करीं । बसला जवळ पाटलाच्या ॥ १७८ ॥
मारुतीनें दर्शन । घेतां केलें हास्यवदन ।
तुझ्यासाठी मजकारण । त्रास झाला रात्रीसी ॥ १७९ ॥
तुम्ही माझे भक्त होतां । मला राखण्या लावितां ।
झोपाळू नोकर ठेवितां । आणि आपण निजतां खुशाल घरीं ॥ १८० ॥
मारुती काल रात्रीला । खळ्यांत तिमाजी झोपीं गेला ।
गाढवांचा सुळसुळाट झाला । ते रास भक्षू लागले ॥ १८१ ॥
म्हणून मी जागें केलें । जाऊन तिमाजीसी भले ।
रास सांभाळण्या सांगितलें । आणि आलों निघून ॥ १८२ ॥
ऐसी खूण पटतांक्षणीं । मारुतीनें जोडून पाणि ।
मस्तक ठेवूनियां चरणीं । ऐसें वचन बोलला ॥ १८३ ॥
आम्हां सर्वस्वीं आधार । आपुलाच आहे साचार ।
लेंकराचा अवघा भार । मातेचिया शिरीं असे ॥ १८४ ॥
आमुचें म्हणून जें जें कांहीं । तें अवघेंच आहे आपुले आई ! ।
सत्ता त्यावरी नाहीं । तुम्हांवीण कवणाची ॥ १८५ ॥
खळें आणि जोंधळा । अवघाची आहे आपला ।
तिमाजी नोकर नांवाला । व्यवहार दृष्टीं आहे कीं ॥ १८६ ॥
ब्रह्मांडाचें संरक्षण । आपण करितां येथून ।
लेंकरासाठीं त्रास पूर्ण । माता सोसी वरच्यावरी ॥ १८७ ॥
मी लेंकरूं आपुलें । म्हणूनिया आपण केलें ।
खळ्यांत तें जाऊन भलें । मोरगांवी संरक्षण ॥ १८८ ॥
ऐसीच कृपा निरंतर । स्वामी असावी माझ्यावर ।
आतांच जाऊन करितों दूर । नोकरीवरून तिमाजीला ॥ १८९ ॥
ऐसें बोलतां मारुती । कौतुक वाटले समर्थांप्रती ।
आणि भाषण केलें येणे रीति । तें आतां अवधारा ॥ १९० ॥
छे ! छे ! वेड्या ! तिमाजीस । नको मुळींच काढूंस ।
नोकरीवरून खास । त्याचे वर्म सांगतों तुला ॥ १९१ ॥
तिमाजी नोकर इमानी । खळ्यांत गाढवें पाहूनी ।
दुःखी झाला असे मनीं । तें म्यां तेव्हांच जाणिलें ॥ १९२ ॥
रात्रीची हकीकत । तुला सांगावया प्रत ।
आला होता भीत भीत । सकाळी ना तुजकडे ॥ १९३ ॥
तैं तूं म्हणालास त्याला । मी जातों आहे शेगांवाला ।
उद्यां सकाळीं खळ्याला । येऊनिया पाहीन ॥ १९४ ॥
ऐसें गुरुवचन ऐकिलें । मारुतीसी चोज जहालें ।
पहा संतांचे कर्तृत्व भलें । कैसें आहे अगाध ॥ १९५ ॥
गाढवें खळ्यांत पडलेली । कोणीं न त्या सांगितलीं ।
ती अंतर्ज्ञानें जाणिलीं । गजाननानें श्रोते हो ॥ १९६ ॥
शके अठराशें सोळासी । महाराज बाळापुरासी ।
असतां गोष्ट झाली ऐसी । ती थोडकी सांगतों ॥ १९७ ॥
तेथें सुखलाल बन्सीलालाची । एक बैठक होती साची ।
त्या बैठकीसमोर महाराजांची । स्वारी बैसली आनंदांत ॥ १९८ ॥
मूर्ति अवघी दिगंबर । वस्त्र नव्हतें तिळभर ।
त्या पाहून भाविक नर । नमन करून जात होते ॥ १९९ ॥
तो होता हमरस्ता । बाजारपेठेचा तत्त्वतां ।
त्या पंथानें जात होता । एक पोलीस हवालदार ॥ २०० ॥
नांव त्या हवालदाराचें । नारायण आसराजी होतें साचें ।
समर्था पाहून डोकें त्याचें । फिरून गेलें तात्काळ ॥ २०१ ॥
तो म्हणे हा नंगा धोत । मुद्दाम बसला पथांत ।
साधू ना हा भोंदू सत्य । त्याची उपेक्षा न करणें बरी ॥ २०२ ॥
ऐसे बोलून जवळीं गेला । अद्वातद्वां बोलूं लागला ।
लाज कैसीं नाहीं तुजला । नंगा बसतोस रस्त्यावरी ॥ २०३ ॥
हें घे त्याचें प्रायश्चित्त । तुला मी देतों आज येथ ।
ऐसें बोलून स्वामीप्रत । मारूं लागला छडीनें ॥ २०४ ॥
वळ पाठपोटावरी । उठते झाले निर्धारी ।
परी ना हवालदार आवरी । मारता हात आपुला ॥ २०५ ॥
ऐसे तेधवां पाहून । एक गृहस्थ आला धांवून ।
आपुल्या दुकानामधून । हुंडीवाला नाम ज्याचें ॥ २०६ ॥
तो म्हणे हे हवालदार । तूं विचार कांहीं कर ।
उगेंच सत्पुरुषावर । हात टाकणें बरें नव्हे ॥ २०७ ॥
कां कीं, संतांचा कैवारी । एक आहे श्रीहरी ।
वळ त्यांच्या पाठीवरी । उठले ते कां न दिसले तुला ? ॥ २०८ ॥
या कृत्यानें तुझा अंत । जवळीं आला अत्यंत ।
आजारीच मोडतो पथ्य । मरावयाकारणें ॥ २०९ ॥
तेंच तूं आज केलें । हें न कांहीं बरें झालें ।
अजून तरी उघडी डोळें । माफी माग गुन्ह्याची ॥ २१० ॥
हवालदार म्हणे माफीचें । कारण मसीं न मागण्याचें ।
कावळ्याचे शापें साचें । काय ढोरें मरतील ! ॥ २११ ॥
हा नंगा धोत हलकट । बसला पाहून बाजारपेठ ।
तोंडानें गोष्टी चावट । अचाट ऐसा करीत हा ॥ २१२ ॥
ऐशा ढोंग्याला मारणें । ईश्वर जरी मानील गुन्हे ।
तरी मग न्याया कारणें । जागाच नाहीं राहिली ॥ २१३ ॥
तेंच पुढें सत्य झालें । हवालदार पंचत्व पावले ।
त्या बाळापूर नगरींत भले । आपण केलेल्या कृत्यानें ॥ २१४ ॥
एका पंधरवड्यांत । हवालदाराचे अवघे आप्त ।
होते झाले भस्मीभूत । एका साधूस मारल्यानें ॥ २१५ ॥
म्हणून अवघ्या लोकांनीं । साधूसमोर जपूनी ।
वागावें प्रत्येकानीं । खरें कळेपर्यंत ॥ २१६ ॥
नगर जिल्ह्यांत संगमनेर । प्रवरा नदीचे कांठावर ।
गांव अति टुमदार । त्याचें वर्णन करवेना ॥ २१७ ॥
अनंतफंदी नांवाचा । कवि जेथें झाला साचा ।
तेथील हरी जाखड्याचा । ऐका तुम्ही वृत्तान्त हा ॥ २१८ ॥
हा हरी जाखडी माध्यंदिन । होता यजुर्वेदी ब्राह्मण ।
गांवोगांव फिरून । पोट आपुलें भरितसे ॥ २१९ ॥
तो फिरत फिरत शेगांवासी । आला समर्थ दर्शनासी ।
बसतां झाला पायांपासीं । श्रीगजानन स्वामींच्या ॥ २२० ॥
तों हजारों घेती दर्शन । कोणी ब्राह्मणभोजन ।
कोणी खडीसाखर वांटून । नवस केलेला फेडितीं ॥ २२१ ॥
तईं हरी म्हणे चित्तासी । हा केवढा ज्ञानरासी ।
येऊनिया पायांपासीं । विन्मुख जाणें भाग मला ॥ २२२ ॥
कां कीं दैव खडतर । माझें आहे साचार ।
निव्वळ पर्वत खडकावर । हरळ उगवेल कोठोनी ? ॥ २२३ ॥
आज अन्न मिळालें । उद्यांचे कोणीं पाहिलें ।
ऐसें करीत संपले । दिवस माझे आजवर ॥ २२४ ॥
संग्रहासी नाहीं धन । शेतवाडा मळा जाण ।
मी ना मुळींच विद्वान् । मला कन्या कोण देईल ? ॥ २२५ ॥
हे स्वामी गजानना । सच्चिदानंदा दयाघना ! ।
संसारसुखाची वासना । जहाली मनीं बलवत्तर ॥ २२६ ॥
ती तूं पूर्ण करावी । मुलें लेंकरें मला व्हावी ।
प्रथम बायको मिळावी । कुलीन आज्ञाधारक ॥ २२७ ॥
ऐसें जो इच्छी मनांत । तोंच त्याच्या अंगावर्त ।
थुंकते झाले सद्गुरुनाथ । इच्छेस त्याच्या जाणूनी ॥ २२८ ॥
या हरी जाखड्यानें । बावंच्या मागला मजकारणें ।
म्हणून आलें थुंकणें । या मूर्खाच्या अंगावर ॥ २२९ ॥
संसारापासून सुटावया । लोक भजती माझ्या पाया ।
यानें येथें येऊनिया । संसारसुख मागितलें ॥ २३० ॥
पहा जगाची रीत कैसी । अवघेच इच्छिती संसारासी ।
सच्चिदानंद श्रीहरीसी । पहाण्या न कोणी तयार ॥ २३१ ॥
ऐसें आपणासी बोललें । पुन्हां जाखड्यासी पाहिलें ।
जें जें तूं इच्छिलें । सांप्रतकालीं मनांत ॥ २३२ ॥
तें तें अवघें होईल पूर्ण । पुत्रपौत्र तुजलागून ।
होतील संग्रहासी धन । तेंही थोडकें राहील ॥ २३३ ॥
जा आतां परत घरा । सुखें करी संसारा ।
करीत असावा परमेश्वरा । आठव वेड्या ! विसरूं नको ॥ २३४ ॥
ऐसें तयासी बोलून । प्रसाद म्हणून थोडकें धन ।
दिलें हरी जाखड्याकारण । लग्न स्वतःचे करावया ॥ २३५ ॥
हरी जाखड्या संगमनेरीं । सुखी जाहला संसारीं ।
महाराजांची वाणी खरी । ती कोठून खोटी होईल ॥ २३६ ॥
ऐसाच एक निमोणकर । गोविंदाचा कुमार ।
रामचंद्र नामें साचार । ओव्हरसिअरच्या हुद्यावरी ॥ २३७ ॥
बेंद्रे वासुदेव सव्र्व्हेअर । होता त्याच्या बरोबर ।
तो आणि निमोणकर । आले मुकना नदीवरी ॥ २३८ ॥
हा मुकना नाला डोंगरांत । आहे सह्याद्री पर्वतांत ।
इगतपुरी तालुक्यांत । बुध हो नाशिक जिल्ह्याच्या ॥ २३९ ॥
वनश्री ती रमणीय अती । तिचें वर्णन करूं किती ।
हरीण बालकें बागडती । निर्भयपणें काननांत ॥ २४० ॥
फलभारें तरूवर । वांकले असती अपार ।
वन्य पशु फिरती स्वैर । बिब्बट लांडगे ते ठायां ॥ २४१ ॥
असो या मुकन्या नाल्यापासी । जवळ एका खोऱ्यासी ।
एका जलाच्या प्रवाहासी । कपीलधारा नाम असे ॥ २४२ ॥
तेथें प्रत्येक पर्वणीस । भाविक येती स्नानास ।
लौकिक याचा आसपास । तीर्थ म्हणून पसरलासे ॥ २४३ ॥
असो एक्या पर्वणीसी । निमोणकर गेले स्नानासी ।
योगाभ्यास थोडा यासी । येत होता विबुध हो ॥ २४४ ॥
तो पूर्ण व्हावा म्हणून । इच्छीत होतें त्याचें मन ।
गोसावी बैराग्यालागून । पुसूं लागला तेथल्या ॥ २४५ ॥
नाहीं नाहीं माहीत मात । ऐकू येई सर्वत्र ।
तेणें निमोणकर चित्तांत । हताश पूर्ण जहाला ॥ २४६ ॥
काय करूं देवा आतां । मला योगाभ्यास शिकवितां ।
कोठे भेटेल तत्त्वतां । ती कृपा करून सांगणें ॥ २४७ ॥
तो कपीलधारेवरी । एक पुरुष देखिला अधिकारी ।
ज्याचे हात गुडघ्यावरी । येऊन सहज लागले ॥ २४८ ॥
उंच बांधा मुद्रा शांत । बसला होता ध्यानस्थ ।
त्यास घातलें दंडवत । निमोणकरानें अष्टांगेसी ॥ २४९ ॥
बराच वेळ झाला जरी । योगी न कांहीं बोले परी ।
अस्तमानाची वेळ खरी । समीप येऊं लागली हो ॥ २५० ॥
पोटीं ना अन्न तिळभर । बिऱ्हाड राहिलें बहु दूर ।
कपीलधारेचे धरून नीर । तुंब्यांत गोसावी निघाले ॥ २५१ ॥
तैं निमोणकर म्हणे समर्था ! । अंत माझा किती पहातां ।
ठाऊक असल्या योगगाथा । मशीं कांहीं शिकवा हो ! ॥ २५२ ॥
तो अखेर अस्तमानीं । बोलते झाले कैवल्यदानी ।
हा चित्रपट घेऊनी । जा आपुलें काम करी ॥ २५३ ॥
षोडशाक्षरी त्यावर । मंत्र लिहिला आहे थोर ।
त्याचा वाणीनें निरंतर । जप आपुला करावा ॥ २५४ ॥
मंत्रप्रभावें थोडाबहुत । योग येईल तुजप्रत ।
योगमार्ग हा अत्यंत । कठीण सर्व योगामध्यें ॥ २५५ ॥
गोगलगाय शेप किडा । हिमालया न देईल वेढा ! ।
सागरीचा सिंप किडा । मेरू पर्वता न जाय कधीं ॥ २५६ ॥
नेटाचा केला यत्न । ब्रह्मचर्य संभाळून ।
येतील दहापांच आसन । धौती नौती केल्यावरी ॥ २५७ ॥
जा पुढें न विचारी मला । हा घे देतों प्रसाद तुला ।
ऐसें बोलून उचलिला । एक तांबडा खडा करें ॥ २५८ ॥
तो देऊनियां मजसी । गुप्त झाले पुण्यरासी ।
तेच पुढें नाशिकासी । गंगेवरी भेटले त्या ॥ २५९ ॥
त्या पाहून निमोणकर । गेले धांवत साचार ।
शिर ठेवून पायांवर । प्रश्न त्यांसी ऐसा केला ॥ २६० ॥
महाराज माझा कंटाळा । कां हो ! आपणच कां केला ? ।
आपुल्या नांव गांवाला । न सांगतांच गेला कीं ॥ २६१ ॥
महाराज डोळे वटारून । बोलते झाले त्याकारण ।
तांबडा खडा देऊन । नांव माझें कथिलें म्यां ॥ २६२ ॥
नर्मदेचा गणपती । तांबडा असतो निश्चिती ।
तूं मूळचाच मूढमती । रहस्य त्याचें न जाणिलें ॥ २६३ ॥
म्हणून त्याचें गूढ तुला । पडतें झालें जाण मुला ! ।
मी रहातों शेगांवाला । गजानन हे नांव माझें ॥ २६४ ॥
धुमाळ सदनापर्यंत । चाल माझ्या समवेत ।
पुन्हां भेटी तुजप्रत । होईल माझी ते ठायां ॥ २६५ ॥
ऐसें बोलूनी निघाले । महाराज रस्त्यांत गुप्त झाले ।
भिरभिरी पाहूं लागले । चहूंकडे निमोणकर ॥ २६६ ॥
कंटाळून अखेरी । धुमाळाच्या आले घरीं ।
तो गजानन महाराज ओसरीवरी । बसलें ऐसें पाहिले ॥ २६७ ॥
मौनेंच करून वंदन । कथिलें धुमाळाकारण ।
कपीलधारेपासून । जें कां झालें इथवरी ॥ २६८ ॥
तें ऐकून धुमाळाला । अतिशय आनंद जहाला ।
तो म्हणे योगीराजाला । वाण कशाची सांग मज ॥ २६९ ॥
हे अवघ्या सामर्थ्यांची । खाण निःसंशय आहेत साची ।
सार्वभौमपदाची । त्यांच्या पुढें न किंमत ॥ २७० ॥
जो तांबडा खडा तुसी । दिला तो ठेवून पाटासी ।
करणें पूजा अर्चेसी । सद्भावें निरंतर ॥ २७१ ॥
योगाभ्यास ही समोरी । त्या खड्याच्या आदरें करी ।
त्याच्या कृपेनें कांही तरी । योगाभ्यास येईल ॥ २७२ ॥
तेंच पुढें झालें सत्य । योगाभ्यास थोडाबहुत ।
आला निमोणकराप्रत । श्रीगजाननकृपेनें ॥ २७३ ॥
एक शेगांवचा रहिवासी । तुकाराम कोकाटे परियेसी ।
त्याची संतति यमसदनासी । जाऊं लागली उपजतांच ॥ २७४ ॥
म्हणून त्यानें समर्थांला । एकदां नवस ऐसा केला ।
जरी देशील संततीला । दीर्घायुषी गुरुराया ॥ २७५ ॥
तरी एक मुलगा त्यांतून । तुसी करीन अर्पण ।
मनोरथ त्याचें पूर्ण । केले श्रीगजाननस्वामींनें ॥ २७६ ॥
दोन तीन मुलें झाली । परी नवसाची न राहिली ।
आठवण तुकारामा भली । संततीच्या मोहानें ॥ २७७ ॥
तो थोरला मुलगा नारायण । रोग झाला त्याकारण ।
औषधोपचार केलें जाण । परी न आला गुण कांहीं ॥ २७८ ॥
नाडी बंद होऊ लागली । नेत्रांची ती दृष्टि थिजली ।
धुगधुगी मात्र उरली । होती त्याच्या छातीला ॥ २७९ ॥
ती स्थिती पाहून । तुकारामा झाली आठवण ।
नवस केल्याची ती जाण । एकदम त्या समयाला ॥ २८० ॥
तुकाराम म्हणे गुरुराया । हा पुत्र माझा वांचलिया ।
अर्पण करीन सदया । सेवा तुमची करण्यास ॥ २८१ ॥
ऐसा वचनबद्ध होतां क्षणीं । नाडी आली ठिकाणीं ।
हळुहळु नेत्र उघडोनी । पाहूं लागला बाल तो ॥ २८२ ॥
व्याधि बरी झाल्यावर । तो नारायण नामे कुमार ।
आणून सोडला मठावर । नवस आपला फेडावया ॥ २८३ ॥
तो नारायण अजूनी । आहे तया ठिकाणीं ।
बोलिलेला नवस कोणी । महाराजांचा चुकवू नये ॥ २८४ ॥
हेंच सांगण्या लोकांप्रत । नारायण आहे जिवंत ।
शेगांवी त्या मठांत । संतचरित्र ना कादंबरी ॥ २८५ ॥
असो पुढें आषाढमासीं । महाराज गेले पंढरीसी ।
घेऊन हरी पाटलासी । विठ्ठलासी भेटावया ॥ २८६ ॥
जो सर्व संतांचा । ध्येयविषय साचा ।
जो कल्पतरू भक्तांचा । कमलनाभसर्वेश्वर ॥ २८७ ॥
जो जगदाधार जगत्पति । वेद ज्याचे गुण गाती ।
जो संतांच्या वसे चित्तीं । रुक्मिणीपती दयाघन ॥ २८८ ॥
पंढरीस आले गजानन । चंद्रभागेचें केलें स्नान ।
गेलें घ्याया दर्शन । पांडुरंगाचे राऊळीं ॥ २८९ ॥
हे देवा पंढरीनाथा । हे अचिंत्या अद्वया समर्था ।
हे भक्तपरेशा रुक्मिणीकांता । ऐक माझी विनवणी ॥ २९० ॥
तुझ्या आज्ञेनें आजवर । भ्रमण केलें भूमिवर ।
जे जे भाविक होते नर । त्यांचे मनोरथ पूर्ण केले ॥ २९१ ॥
आतां अवतारकार्य संपलें । हें तूं जाणसी वहिले ।
पुंडलीक वरदा विठ्ठले । जाया आज्ञा असावी ॥ २९२ ॥
देवा ! मी भाद्रपदमासीं । जावया इच्छितों वैकुंठासी ।
अक्षईचे रहावयासी । तुझ्या चरणासन्निध ॥ २९३ ॥
ऐसी करून विनवणी । समर्थांनीं जोडिले पाणि ।
अश्रु आले लोचनीं । विरह हरीचा साहवेना ॥ २९४ ॥
हरी पाटील जोडून हातां । पुसूं लागला पुण्यवंता ।
अश्रु कां हो सद्गुरुनाथा । आणिलें लोचनीं ये वेळां ? ॥ २९५ ॥
किंवा मी कांहीं सेवेला । चुकलों आहे दयाळा ।
म्हणून आपणां खेद झाला । ते सांगा लवलाही ॥ २९६ ॥
महाराज म्हणाले त्यावर । हरी पाटलाचा धरून कर ।
सांगितले तरी न कळणार । त्याचें वर्म बापा तुला ॥ २९७ ॥
तो विषय खोल भारी । तूं न पडावें त्या भीतरीं ।
इतकेंच सांगतों श्रवण करी । संगत माझी थोडी असे ॥ २९८ ॥
चाल आतां शेगांवाला । तूं आपल्या ठिकाणाला ।
तुमच्या पाटील वंशाला । कांहीं न कमी पडेल ॥ २९९ ॥
पंढरीचें मावंदे केलें । शेगांवामाजी भलें ।
चित्त चिंतेनें व्याप्त झालें । मात्र हरी पाटलाचें ॥ ३०० ॥
तो म्हणे मंडळींस । महाराज वदले पंढरीस ।
संगत राहिली थोडे दिवस । माझी विठूच्या राऊळीं ॥ ३०१ ॥
पुढें श्रावणमास गेला । क्षीणता आली तनूला ।
पुढें भाद्रपदमास आला । काय झालें तें ऐका ॥ ३०२ ॥
गणेश चतुर्थीचें दिवशीं । महाराज म्हणाले अवघ्यांसी ।
आतां गणपती बोळवण्यासी । यावें तुम्ही मठांत ॥ ३०३ ॥
कथा गणेशपुराणांत । ऐशापरी आहे ग्रंथित ।
चतुर्थीच्या निमित्त । पार्थिव गणपती करावा ॥ ३०४ ॥
त्याची पूजा अर्चा करून । नैवेद्य करावा समर्पण ।
दुसरे दिवशीं विसर्जून । बोळवावा जलामध्यें ॥ ३०५ ॥
तो दिवस आज आला । तो साजरा पाहिजे केला ।
या पार्थिव देहाला । तुम्ही बोळवा आनंदें ॥ ३०६ ॥
दुःख न करावें यत्किंचित् । आम्ही आहों येथें स्थित ।
तुम्हां सांभाळण्याप्रती सत्य । तुमचा विसर पडणें नसे ॥ ३०७ ॥
हें शरीर वस्त्रापरी । बदलणें आहे निर्धारी ।
ऐसें गीताशास्त्रांतरीं । भगवान् वदला अर्जुना ॥ ३०८ ॥
जे जे ब्रह्मवेत्ते झाले । त्यांनी त्यांनी ऐसेंच केलें ।
शरीरवस्त्रांसी बदलिलें । हें कांही विसरू नका ॥ ३०९ ॥
चतुर्थीचा अवघा दिवस । आनंदामाजीं काढिला खास ।
बाळाभाऊच्या धरिलें करास । आसनीं आपल्या बसविलें ॥ ३१० ॥
मी गेलों ऐसें मानूं नका । भक्तीत अंतर करूं नका ।
कदा मजलागी विसरूं नका । मी आहे येथेंच ॥ ३११ ॥
ऐसें भाषण करून । योगें रोधिला असे प्राण ।
दिला मस्तकी ठेवून । त्या महात्म्या पुरुषानें ॥ ३१२ ॥
शके अठराशें बत्तीस । साधारणनाम संवत्सरास ।
भाद्रपद शुद्ध पंचमीस । गुरुवारी प्रहर दिवसाला ॥ ३१३ ॥
प्राण रोधितां शब्द केला । 'जय गजानन' ऐसा भला ।
सच्चिदानंदीं लीन झाला । शेगांवामाझारीं ॥ ३१४ ॥
देहाचें तें चलनवलन । पार गेलें मावळोन ।
स्वामी समाधिस्थ पाहून । लोक हळहळू लागले ॥ ३१५ ॥
पुकार झाली गांवांत । स्वामी झाले समाधिस्थ ।
ऐसी ऐकतां मात । हृदय पिटतीं नारीनर ॥ ३१६ ॥
गेला गेला साक्षात्कारी । चालता बोलता श्रीहरी ।
गेला गेला कैवारी । आज दीनजनांचा ॥ ३१७ ॥
गेला आमुचा विसांवा । गेला आमुचा सौख्यठेवा ।
विझाला हा ज्ञानदिवा । कालरूपी वाऱ्यानें ॥ ३१८ ॥
अहो गजाननस्वामी समर्था ! । आतां आम्हांस कोण त्राता ? ।
कां रे इतक्यांत पुण्यवंता । गेलास आम्हां सोडून ? ॥ ३१९ ॥
मार्तंड पाटील, हरी पाटील । विष्णुसा, बंकटलाल ।
ताराचंद प्रेमळ । भक्त स्वामींचा जो असे ॥ ३२० ॥
श्रीपतराव कुळकर्णी । मठामाजीं जमले जाणी ।
विचार केला अवघ्यांनी । ऐशा रीतिं श्रोते हो ॥ ३२१ ॥
आज आहे पंचमीचा दिवस । समाधि न द्या स्वामीस ।
हाळोपाळीच्या लोकांस । येऊं द्या हो दर्शना ॥ ३२२ ॥
आतां पुढें ही मूर्ति । लोपणार आहे निश्चिती ।
अस्तमानापर्यंत ती । लोकांची ती वाट पाहा ॥ ३२३ ॥
ज्यांच्या नशिबीं असेल । तयांना दर्शन घडेल ।
नका करूं आतां वेळ । जासूद धाडा चोहींकडे ॥ ३२४ ॥
गोविंदशास्त्री डोणगांवचे । एक विद्वान् होते साचे ।
ते बोलिले आपुल्या वाचें । सर्व लोकांस येणें रीतिं ॥ ३२५ ॥
त्यांच्या आवडत्या भक्तांसी । ते दर्शन देतील निश्चयेंसी ।
तोपर्यंत प्राणासी । मस्तकीं धारण करतील ॥ ३२६ ॥
त्याची प्रचीति पहावया । नको कोठें लांब जाया ।
पहा लोणी ठेवूनिया । येधवां मस्तकीं स्वामींच्या ॥ ३२७ ॥
लोणी ठेवितां शिरावरी । तें पघळू लागलें निर्धारी ।
जो तो त्याचें कौतुक करी । बल हें योगशास्त्राचें ॥ ३२८ ॥
तो प्रकार पहातां । गोविंदशास्त्री झाला बोलतां ।
एक दिवसाची काय कथा । हे राहतील वर्षभर ॥ ३२९ ॥
निःसंशय ऐशा स्थितींत । परी हें करणें अनुचित ।
आवडते अवघे आलिया भक्त । समाधि द्या स्वामीला ॥ ३३० ॥
तें अवघ्यांस मानवलें । स्वामींपुढें आदरें भलें ।
भजन त्यांनी मांडिलें । हजार टाळ जमला हो ॥ ३३१ ॥
दूरदूरच्या भक्तांप्रत । स्वामी जाऊन स्वप्नांत ।
आपुल्या समाधीची मात । कळविते झालें विबुध हो ॥ ३३२ ॥
तया ऋषिपंचमीला । अपार मेळा मिळाला ।
लोकांचा तो शेगांवाला । घ्याया दर्शन स्वामींचें ॥ ३३३ ॥
रथ केला तयार । दिंड्या आल्या अपार ।
सडे घातले रस्त्यांवर । गोमयाचे बायांनी ॥ ३३४ ॥
रंगवल्या नानापरी । काढू लागल्या चतुर नारी ।
दीपोत्सव झाला भारी । त्या शेगांवग्रामाला ॥ ३३५ ॥
मूर्ति ठेविली रथांत । मिरवणूक निघाली आनंदांत ।
रात्रभरी शेगांवांत । तो ना थाट वर्णवे ॥ ३३६ ॥
वाद्यांचे नाना प्रकार । दिंड्या मिळाल्या अपार ।
होऊं लागला भजनगजर । विठ्ठलाच्या नांवाचा ॥ ३३७ ॥
तुळशी बुक्का गुलाल फुलें । भक्त उधळू लागले ।
फुलांखाली झांकून गेले । श्रीगजानन महाराज ॥ ३३८ ॥
बर्फी पेढ्यांस नाहीं मिती । लोक वांटिती खिरापती ।
कित्येकांनी रथावरती । रुपये पैसे उधळीले ॥ ३३९ ॥
ऐशी मिरवणूक रात्रभर । शेगांवीं निघून अखेर ।
उदयास येतां दिनकर । परत आली मठांत ॥ ३४० ॥
समाधीच्या जागेवरी । मूर्ति नेऊन ठेविली खरी ।
रुद्राभिषेक केला वरी । अखेरचा देहाला ॥ ३४१ ॥
पूजा केली पंचोपचार । आरती उजळली अखेर ।
भक्तांनीं केला नामगजर । गजाननाचे नांवाचा ॥ ३४२ ॥
जय जय अवलिया गजानना ! । हे नरदेहधारी नारायणा ! ।
अविनाशरूपा आनंदघना ! । परात्परा जगत्पते ॥ ३४३ ॥
ऐशा भजनाभीतरीं । मूर्ति ठेविली आसनावरी ।
उत्तराभिमुख साजिरी । शास्त्रमार्गाप्रमाणें ॥ ३४४ ॥
अखेरचें दर्शन । अवघ्यांनी घेतलें जाण ।
'जय स्वामी गजानन' । ऐसें मुखें बोलोनी ॥ ३४५ ॥
मीठ अर्गजा अबीर । यांनीं ती भरली गार ।
शिळा लावूनी केलें द्वार । बंद भक्तांनी शेवटीं ॥ ३४६ ॥
दहा दिवसपर्यंत । समाराधना चालली तेथ ।
घेऊन गेले असंख्यात । लोक स्वामींच्या प्रसादा ॥ ३४७ ॥
खरोखरीच संतांचा । अधिकार तो थोर साचा ।
सार्वभौम राजाचा । पाड नाहीं त्यांच्या पुढें ॥ ३४८ ॥
स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा श्रीगजानन विजय नामें ग्रंथ ।
भाविकां दावो सत्पथ । भक्ति हरीची करावया ॥ ३४९ ॥
शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति श्रीगजानन विजय ग्रंथस्य एकोनविंशोऽध्यायः समाप्तः ॥