श्री गजानन विजय ग्रंथ
अध्याय विसावा प्रारंभ
श्रीगणेशायनमः ॥
जयजयाजी रुक्मिणीवरा । हे चंद्रभागातटविहारा ।
देवा वरदपाणीधरा । दासगणूच्या मस्तकीं ॥ १ ॥
तूं भूपांचा भूपती । अवधेंच आहे तुझ्या हातीं ।
मग माझी फजिती । कां रे ऐसी मांडलीस ? ॥ २ ॥
माझें पाप ताप दहन । करा कृपाकृशानें करून ।
राहो आनंदी सदा मन । तुझें भजन करावया ॥ ३ ॥
यांत अंतर केल्यांस । वृथा तुला लागेल दोष ।
खऱ्या थोरांनी आपणांस । बट्टा लावून घेऊं नये ॥ ४ ॥
म्हणून हे श्यामसुंदरा । राही रुक्मिणीच्या वरा ।
पांडुरंगा परम उदारा । माझी इच्छा पूर्ण करी ॥ ५ ॥
असो समाधिस्थ झाल्यावर । श्रीगजानन साधुवर ।
म्हणूं लागले नारीनर । आतां काय ह्या शेगांवीं ॥ ६ ॥
शेगांवींचा ज्ञानगभस्ती । अस्ता गेला निश्चिती ।
आतां काय तेथें माती । राहिली आहे निव्वळ ॥ ७ ॥
समुद्राचे आटल्या नीर । वा पुष्पतरूंचा गेला भर ।
कोण त्याचें करणार । कौतुक या जगामध्यें ? ॥ ८ ॥
आतां खेपा शेगांवांत । करणें आहे कीं निमित्त ? ।
देव नसतां देव्हाऱ्यांत । माळा बांधणे व्यर्थची ॥ ९ ॥
ऐसें कित्येक बोलती । परी ती असे साच भ्रांती ।
महाराजांची दिव्य ज्योति । अदृश्य आहे तेच ठायां ॥ १० ॥
जेवीं इंद्रायणीचे तीरीं । ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी ।
ते आहेत भेटले परी । तेंच ठायीं भाविकां ॥ ११ ॥
तैशीच शेगांवांत । श्रीगजाननस्वामी समर्थ ।
ऐसा जयांचा सिद्धान्त । दर्शन त्यांना तेथ होतें ॥ १२ ॥
तेविषयींची एक कथा ! सांगतों मी येथ आतां ।
गणपत कोठाडे नामे होता । एक भाविक गृहस्थ ॥ १३ ॥
हा रायली कंपनीचा । एजंट शेगांव दुकानीचा ।
नित्य नेम होता त्याचा । दर्शनाचा श्रोते हो ॥ १४ ॥
अस्तमानीं प्रति दिवशीं । यावें त्यानें मठासीं ।
बैसोनिया समाधीपासीं । स्तवन करावें एकनिष्ठें ॥ १५ ॥
एकदां ऐसें वाटलें त्यास । अभिषेक करून समाधीस ।
उद्यांच्या विजयादशमीस । ब्राह्मणभोजन घालावें ॥ १६ ॥
केली सर्व तयारी । अभिषेकाची साजिरी ।
शिधा मठाभितरीं । धाडिला मोठ्या प्रमाणांत ॥ १७ ॥
तैं कांता म्हणे हो प्राणनाथा ! । हें तुम्ही काय करितां ।
हाड नाहीं तुमच्या हातां । खर्च करण्याच्या बाबतींत ॥ १८ ॥
उद्यां आहे विजयादशमी । म्हणून पोरांबाळांसी ।
कपडे अलंकार अंगासी । करून घाला कांही तरी ॥ १९ ॥
हे अभिषेक ब्राह्मणभोजनें । वरचेवरी न योग्य करणें ।
दिलीं आपणां ईश्वरानें । चार पोरेंबाळें हो ॥ २० ॥
फुटका मणि ना अंगावरती । मी लंकेची पार्वती ।
गृहस्थाची ही कां रीती ? । संचय करावा धनाचा ॥ २१ ॥
हैं कांतेंचें भाषण । गणपतरावा न रुचलें जाण ।
तो म्हणे प्रपंचाहून । श्रेष्ठ परमार्थ वाटे मला ॥ २२ ॥
तोच त्याच्या कांतेसी । स्वप्न पडलें रात्रीसी ।
उगे न छळी पतीसी । तो करतो तें करूं दे ॥ २३ ॥
त्यांत तुझ्या बापाचें । काय जातें सांग साचें ।
प्रेम अशाश्वताचें । वेडे ! हें बाळगू नको ॥ २४ ॥
यामध्यें न कांहीं सार । धन भूचें भूमिवर ।
येतें मात्र बरोबर । पाप पुण्य मानवाच्या ॥ २५ ॥
अभिषेक ब्राह्मणभोजन । हे पारमार्थिक आहे पुण्य ।
त्याच्यासाठीं वेंचितां धन । तें न जाय अनाठायीं ॥ २६ ॥
पेरलेल्या बिजापरी । त्याची स्थिति होते खरी ।
म्हणून सांगतों तुला पोरी । अडथळा त्या करूं नको ॥ २७ ॥
ऐशा पाहून स्वप्नास । सांगती झाली पतीस ।
तेणें गणपतरावास । हर्ष झाला विबुध हो ॥ २८ ॥
आलें कां हें प्रत्यंतर । महाराज येथेंच साचार ।
सोडून द्यावा कुविचार । आजपासून कांहीं तरी ॥ २९ ॥
मुलेंबाळें कोणाचीं । धनदौलत कोणाची ।
तूं न वाही चिंता त्यांची । तें अवघे समर्थांचें ॥ ३० ॥
असो गणपतरावानें । पूजन केले आनंदानें ।
त्या दसऱ्याच्या मुहूर्तानें । खर्चही केला अत्युत्तम ॥ ३१ ॥
या गणपतरावाची । निष्ठा समर्थपदीं साची ।
जडली शुद्ध स्वरूपाची । होती पहिल्यापासून ॥ ३२ ॥
लक्ष्मण हरी जांजळाला । ऐसाच अनुभव एक वेळां ।
बोरीबंदरावरी आला । तो ऐका सांगतों ॥ ३३ ॥
कांहीं कामानिमित्त । लक्ष्मण गेला मुंबईत ।
हा समर्थांचा होता भक्त । पहिल्यापासून विबुध हो ॥ ३४ ॥
घरच्या कांहीं कटकटीनें । वैताग त्याच्या घेतला मनें ।
कांहीं व्यापारासंबंधानें । आला होता मुंबईस ॥ ३५ ॥
असो बोरीबंदरावरी । लक्ष्मण आला जाया घरीं ।
तो आगगाडीच्या धक्क्यावरीं । एक भेटला परमहंस ॥ ३६ ॥
आजानुबाहु उंच बांधा । दृष्टि नासाग्रासी सदा ।
ओंकाराचा सर्वदा । जप चालला त्याच्या मुखीं ॥ ३७ ॥
तो बोलला लक्ष्मणास । तूं गजाननाचा आहेस शिष्य ।
ऐसें असून हताश । कां होतोस कळेना ? ॥ ३८ ॥
तूं आपल्या जेव्हां घरीं । पुण्यतिथि केलीस खरी ।
चारशें पानांची तयारी । करून अमरावतीला ॥ ३९ ॥
गोपाळराव पेठकर । आणि बापट मास्तर ।
यांचा कैसा प्रकार । घडला तो आण मना ॥ ४० ॥
पुत्रशोक बापटासी । झाला असून प्रसादासीं ।
तो तुझ्या गेहासी । आला होता ना सांग तें ॥ ४१ ॥
पेठकराचे ब्राह्मण भले । सांग कशानें राहिलें ? ।
अरे गजाननस्वामी गेले । त्या उभयतांच्या स्वप्नांत ॥ ४२ ॥
उपदेश करून दोघांस । आणिले होतें प्रसादास ।
हें कैसें विसरलास ? । सांग मला ये वेळीं ॥ ४३ ॥
खुणेच्या गोष्टी ऐकून । साशंक झाला लक्ष्मण ।
म्हणे हा असावा कोण । हें कांहीं कळत नसे ॥ ४४ ॥
लक्ष्मणें त्या संन्याशाला । आदरें नमस्कार केला ।
तो पाहातां पाहातां गुप्त झाला । बोरीबंदर स्टेशनासी ॥ ४५ ॥
मग लक्ष्मण येऊन घरीं । वागूं लागला पहिल्यापरी ।
प्रतिवर्षी आपुल्या घरीं । पुण्यतिथीचा प्रारंभ केला ॥ ४६ ॥
अवधूत जयराम खेडकरासी । राहीत साहीत गांवांसी ।
भेटते झाले पुण्यराशी । संन्याशाच्या वेषानें ॥ ४७ ॥
एक माधव मार्तंड जोशी । कळंब कसूर ग्रामासी ।
आला मोजणी करावयासी । जमिनीची श्रोते हो ॥ ४८ ॥
हा सरकारी नोकर । होता रेव्हेन्यु ऑफिसर ।
त्याचा गजानन साधुवर । पूर्ण होता भरंवसा ॥ ४९ ॥
दिवसभर मोजणी केली । पुढें त्यास इच्छा झाली ।
अस्तमानाचे समया भली । शेगांवास जाण्याची ॥ ५० ॥
आज गुरुवारचा आहे दिन । घेऊं समर्थांचें दर्शन ।
ऐसा विचार करून । आज्ञा केली शिपायाला ॥ ५१ ॥
जोड आपुली वेगें दमणी । जाऊं शेगांवालागुनी ।
रात्र तेथें काढूनी । येऊं सकाळीं परत पुन्हां ॥ ५२ ॥
तईं तो शिपाई कुतुबुद्दीन । बोलला कर जोडून ।
आभाळ आलें भरून । याचा विचार करावा ॥ ५३ ॥
मन नदीला पाणी भलें । आहे थोडकें आतां आलें ।
पाही पाणी गढूळ झालें । म्हणून केली विनंती ॥ ५४ ॥
जोशी म्हणाले त्यावर । अरे आतां होऊं नदीपार ।
जा दमणी करी तयार । उगीच सबबी सांगू नको ॥ ५५ ॥
शिपायानें जोडिली दमणी । आला लगेंच घेऊनी ।
जोशी आंत बैसोनी । जाऊं लागले शेगांवा ॥ ५६ ॥
दमणी घातली नदींत । तो पाणी आलें अकस्मात् ।
जाण्या पैल तटाप्रत । अवसर नाहीं राहिला ॥ ५७ ॥
झंझावात बळावला । कडकडाट करी चपला ।
मन नदीला पूर आला । क्षणामाजीं भयंकर ॥ ५८ ॥
मेघ वर्षे मुसळधारा । झंझावात सुटला खरा ।
शेतकऱ्यांचिया छपरा । तो उडवू लागला हो ॥ ५९ ॥
शिपाई म्हणे कुतुबुद्दीन । साहेब येथेंच आलें मरण ।
तुम्हां आम्हांलागून । उपाय यासी आतां नसे ॥ ६० ॥
तईं माधव मार्तंड जोशी । घाबरे झाले निजमानसीं ।
बाहूं लागले समर्थांसी । करुणायुक्त वचनानें ॥ ६१ ॥
हे समर्थ गजानना । रक्षणा आमुच्या करी प्राणां ।
अशा संकटीं तुझ्याविणा । त्राता न कोणी आम्हांतें ॥ ६२ ॥
कथा ऐकिली पुराणांत । जहाज बुडतां समुद्रांत ।
त्यास संतानें देऊन हात । रक्षण केलें सर्वस्वीं ॥ ६३ ॥
तूंही संत असामान्य । ब्रह्मवेत्ता करुणाघन ।
करी आमुचें रक्षण । येऊन या पुरामध्यें ॥ ६४ ॥
दमणींत आलें जीवन । बैल गेले घाबरोन ।
मग जोशी पुढें होऊन । बोलते झाले शिपायास ॥ ६५ ॥
तूं आतां मागें सर । अवलीयाचें भजन कर ।
तेच नेतील आपणां पार । त्याची चिंता करूं नको ॥ ६६ ॥
जोशी म्हणाले समर्था । अगाध आहे तुझी सत्ता ।
वाटेल तें करी आतां । तारी अथवा मारी आम्हां ॥ ६७ ॥
कासरा दिला सोडून । दोघांनीही मिटले नयन ।
तों काय घडलें वर्तमान । तें आतां परियेसा ॥ ६८ ॥
ऐशा महापुरांतूनी । पैल तटा पावली दमणी ।
उभी राहिली येऊनी । सडकेवरी शेगांवाच्या ॥ ६९ ॥
ऐसा प्रकार पाहातां । आनंदले उभयतां ।
पाहा केवढीं अगाध सत्ता । आहे अवलीया बाबांची ॥ ७० ॥
पुरामाजीं रक्षण केलें । निज भक्तां ना बुडूं दिलें ।
जोशी शेगांवाप्रती आले । एक घटका रात्रीस ॥ ७१ ॥
वंदन केलें समाधीला । पालखीचा पाहिला सोहळा ।
दुसरे दिवशीं बहुत केला । दानधर्म जोशांनी ॥ ७२ ॥
बाळाभाऊचियापासीं । ब्राह्मणभोजन घालण्यासी ।
कांही रुपये अतिहर्षी । जोशी देते जाहले ॥ ७३ ॥
साकल्यें कथिलें वर्तमान । बाळाभाऊलागून ।
हे नवसाचे ब्राह्मण । तुम्ही घाला माझ्यास्तव ॥ ७४ ॥
कां कीं मला रजा नाहीं । काम जरूरीचें पाही ।
ऐसें सांगून लवलाही । जोशी गेले निघून ॥ ७५ ॥
एक यादव गणेश सुभेदार । होता हिंगणीचा राहाणार ।
हा करितसे व्यापार । वऱ्हाडांत कापसाचा ॥ ७६ ॥
यास एके सालीं भला । दहा हजार तोटा आला ।
त्या चिंतेनें क्षीण झाला । कांहीं न सुचे मानसीं ॥ ७७ ॥
परी व्यापार सोडवेना । चिंता मनींची जाईना ।
फायदा कांही होईना । त्याच्या मनाप्रमाणें ॥ ७८ ॥
फायद्यासाठीं खटपट करी । नाना प्रकारें साजिरी ।
स्वस्थ ना बसती व्यापारी । राहाती सदा प्रयत्नांत ॥ ७९ ॥
हा एकदां वर्ध्यांत । आला कांहीं कामानिमित्त ।
उतरण्या गेला घरांत । विनायक असिरकराच्या ॥ ८० ॥
तों इतक्यात तेथें आला । एक भिकारी बुध हो भला ।
भिक्षां कांही मागण्याला । असिरकराच्या घरांत ॥ ८१ ॥
पोषाख अवघा मराठी । करामाजीं भव्य काठी ।
डोईस होती टोपी मोठी । बनातीची मळकट ॥ ८२ ॥
कंपवायुनें शरीर । कांपत होते वरच्यावर ।
त्यास पाहातां असिरकर । चित्तीं परम कोपले ॥ ८३ ॥
जा बेट्या मागल्या द्वारीं । तेथे मिळेल भिक्षा खरी ।
नको चढूंस पायरी । ओसरीची ये वेळां ॥ ८४ ॥
परी हे बोल त्याचे । भिक्षेकरी न मानी साचे ।
येऊनी वरती ओसरीचे । यादवासन्निध बैसला ॥ ८५ ॥
घाल भिक्षा कांहीं तरी । असें म्हणून पुढें करी ।
भिक्षापात्र भिकारी । यादव सुभेदाराच्या ॥ ८६ ॥
यादव म्हणे मनांत । भिकारी हा लोचट बहुत ।
नको म्हणत असतां येथ । हा बैसला येऊनी ॥ ८७ ॥
त्यातें पाहातां न्याहाळून । तईं तो भासला गजानन ।
सुभेदाराकारण । शेगांवचा राजयोगी ॥ ८८ ॥
दृष्टीस तेज अत्यंत । स्वरही त्यांच्या परी सत्य ।
फरक इतुकाच होता त्यांत । कंप होता तनूला ॥ ८९ ॥
तेज मुद्रा बोलणें । होतें समर्थाप्रमाणे ।
तें पाहून ऐसें म्हणे । सुभेदार निज चित्तीं ॥ ९० ॥
हा जरी मानूं गजानन । तरी ते गेले समाधिस्थ होऊन ।
आतां महाराज कोठून । पडतील आमुच्या दृष्टींशीं ? ॥ ९१ ॥
कांहीं असो पैसे दोन । देऊं भिकाऱ्याकारण ।
श्रीगजानन समजून । ऊहापोह ज्याचा नको ॥ ९२ ॥
पैसे घेतले भिकाऱ्यानें । आणिक कांही देई म्हणे ।
श्रीगजाननाकारणें । शेरणी वाट गुळाची ॥ ९३ ॥
ते वायदे करिसी वरचेवर । ते मी न आतां मानणार ।
तोटा दहा हजार । तुज व्यापारीं आला ना ? ॥ ९४ ॥
त्याचा विचार अंतरीं । करून देई कांहीं तरी ।
रुपये मजला लवकरी । काढ पाकीट खिशांतून ॥ ९५ ॥
ऐसें भिकारी बोलतां । सुभेदार झाला देतां ।
कांही रुपये तत्त्वतां । पाकीटाचे काढून ॥ ९६ ॥
भिकारी म्हणे ते अवसरी । संतुष्ट मी इतुक्यावरी ।
होत नाहीं दे लवकरी । आणखी रुपये कांहीं मला ॥ ९७ ॥
पुन्हां रुपये काढिले । भिकाऱ्यासी अर्पिले ।
तों इतुक्यात घरांत गेले । विनायकराव असिरकर ॥ ९८ ॥
यादवराव एकटा बसला । होता असिरकराच्या ओसरीला ।
तें पाहून बोलला । सुभेदारासी येणें रीतीं ॥ ९९ ॥
संशय गजाननाविषयीं । कां घेतोंस चित्तीं पाही ? ।
कपडे काढून उभा राही । माझ्यापुढें ये वेळां ॥ १०० ॥
तुझ्या अवघ्या अंगावर । दृष्टि पडूं देई एकवार ।
माझीं तेणें होईल दूर । व्याधि तुझी यादवा ॥ १०१ ॥
तूं मजला मुलापरी । कां रे लाजसी अंतरी ? ।
ऐसें म्हणून पाठीवरी । हात फिरविला तयांनी ॥ १०२ ॥
फिरविला नखशिखांत । अंगावरून त्यानें हात ।
तों आले इतक्यांत । असिरकर ओसरीला ॥ १०३ ॥
रुपये घेऊन भिक्षेकरी । गेला द्वाराच्या बाहेरी ।
यादवानें बहुतापरी । तपास केला गांवांत ॥ १०४ ॥
परी न थांग लागला । शेवटी त्यानें निश्चय केला ।
ऐसा आपुल्या चित्ताला । कीं हा असावा गजानन ॥ १०५ ॥
सुभेदार म्हणे मानसीं । हें समर्थ असल्या आज दिवशीं ।
फायदा होईल व्यापारासी । कांहींतरी निःसंशय ॥ १०६ ॥
तो सुभेदाराच्या । गाड्या आल्या कापसाच्या ।
विकावयासाठीं साच्या । वर्ध्याचिया बाजारीं ॥ १०७ ॥
विक्री होता किंमत । येती झाली तया बहुत ।
तेणें यादव चित्तांत । समाधान पावला ॥ १०८ ॥
आणि निश्चय ऐसा केला । जो भिकारी भेटला ।
तो होता समर्थ भला । श्रीगजानन योगीराज ॥ १०९ ॥
समर्थ आपुल्या भक्तांसी । रक्षण करिती अहर्निशीं ।
निष्ठा मात्र त्यांचेविषयीं । दृढतर पाहिजे मनांत ॥ ११० ॥
भाऊ राजाराम कवर । खामगांवीं होता डॉक्टर ।
त्याची तेल्हाऱ्यावर । बदली असे जाहली ॥ १११ ॥
म्हणून तेथें जाण्याला । खामगांवाहून निघाला ।
सहकुटुंब मठांत आला । घ्याया श्रींचें दर्शन ॥ ११२ ॥
गाडी केली तेल्हाऱ्याची । तयारी केली निघण्याची ।
वेळ अस्तमानाची । असती झाली ते वेळां ॥ ११३ ॥
बाळाभाऊ मठाधिपती । तो त्या बोलला येणें रीति ।
अहो ऐका माझी विनंती । प्रसाद घेऊन जावें तुम्ही ॥ ११४ ॥
तुम्ही आजपर्यंत । गेला न येथून उपोषित ।
आज ऐसें विपरीत । कां हो मनीं आणिलें ॥ ११५ ॥
ह्यांतून आहे व्यतिपात । हें आणावें मनांत ।
कवर सांगे त्याप्रत । मला निकड आहे बहु ॥ ११६ ॥
आज रात्रीं प्रसाद घेतों । मागल्या रात्रीं निघून जातों ।
नसतां आग्रह मला तो । तुम्ही न करा ये काळीं ॥ ११७ ॥
बोलल्याप्रमाणें निघाला । तेल्हाऱ्यासी डॉक्टर भला ।
घेऊन मुलांमाणसांला । दमणीमाजीं बसून ॥ ११८ ॥
रात्र होती अंधारी । महा भयंकर साजरी ।
वाटे निशा शोक करी । निज पतीच्या वियोगें ॥ ११९ ॥
तों चमत्कार ऐसा झाला । तेल्हाऱ्याचा रस्ता चुकला ।
कोणी न भेटे पंथाला । विचारावें कोणा जरी ॥ १२० ॥
गाडी अरुंद रस्त्यावर । दोन्ही बाजूंस कांटे फार ।
गाडी उभी कांठावर । एका भव्य तलावाच्या ॥ १२१ ॥
म्हणतां झाला गाडीवाला । साहेब रस्ता आहे चुकला ।
हें ऐकून कवराला । आश्चर्य वाटलें मानसीं ॥ १२२ ॥
खालीं उतरून जों पाहात । तों अवघें दिसलें विपरीत ।
अपशब्द बोलला बहुत । तो त्या गाडीवाल्याला ॥ १२३ ॥
तूं तेल्हाऱ्याचा म्हणून । तुझी गाडी केली जाण ।
आडमार्गे आणून । आम्हां कैसें सोडिलें ? ॥ १२४ ॥
काय होतास दारू प्याला । म्हणून हा रस्ता चुकला ।
वाट तुझ्या डोळ्यांला । दिसली कशी ना सांग मज ? ॥ १२५ ॥
तेल्हाऱ्याचा रस्ता थोर । आम्ही हमेशा वाहातों साचार ।
मग आडमार्गावर । गाडी कैसी आली तुझी ? ॥ १२६ ॥
ऐसें कवर बोलतां । गाडीवाला जोडी हातां ।
कां हो मजला शिव्या देतां ? । म्यां न अपराध केला कीं ॥ १२७ ॥
मी हमेशा भाडें करतों । तेल्हाऱ्याहून येथे येतो ।
वाटेल तेव्हां गाडी हांकतो । रस्ता अवघा माहीत मज ॥ १२८ ॥
बैलही ना कोठें वळलें । ते नीट येथेंच आले ।
तलाव पाहातां स्तब्ध झाले । हा न रस्ता तेल्हाऱ्याचा ॥ १२९ ॥
मग कवर समजला मनांत । हें समर्थांचें आहे कृत्य ।
प्रसाद घेतल्याविरहित । कां कीं मी निघालों ॥ १३० ॥
बाळाभाऊच्या विनंतीला । मीं नाहीं मान दिला ।
म्हणून माझा रस्ता चुकला । आतां वाट गवसे कशी? ॥ १३१ ॥
हें भयंकर कानन । येथें मशी त्राता कोण ।
गजानना ! तुजवांचून । रक्षण माझें कराया ॥ १३२ ॥
तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला । घांगरमाळांचा आवाज झाला ।
डॉक्टरांच्या कानीं पडला । तेणें आला थोडा धीर ॥ १३३ ॥
गाडीवाल्यासी म्हणे कवर । रस्ता नाहीं फार दूर ।
या चाहुलीचा सुमार । धरून गाडी हाण आतां ॥ १३४ ॥
तें त्यानें ऐकिलें । काट्यांकुपाट्यांमधून नेलें ।
नीट रस्त्याला लाविलें । या आपल्या गाडीस ॥ १३५ ॥
हमरस्ता लागतां भली । डॉक्टरानें चौकशी केली ।
तों ऐशापरी समजली । गोष्ट त्या कवरातें ॥ १३६ ॥
हें शेगांवचें शिवार । आहे अजून साचार ।
मग म्हणाला डॉक्टर । चाल शेगांवीं परत आतां ॥ १३७ ॥
सूर्योदयाचे समयाला । शेगांवासी कवर आला ।
वृत्तान्त बाळाभाऊला । केला सर्व निवेदन ॥ १३८ ॥
मग बाळाभाऊ म्हणाले । हेंच आज बरें झालें ।
व्यतिपाती न जाऊं दिलें । समर्थांनीं तुम्हांस ॥ १३९ ॥
आज प्रसाद ग्रहण करा । उद्यां जा हो तेल्हारा ।
करूं नये कधींच खरा । प्रसादाचा इन्कार ॥ १४० ॥
समर्थांचे तुम्ही भक्त । म्हणून तुम्हां आणिलें परत ।
मानवाचे अवघे बेत । सिद्धीस जाणें अशक्य ॥ १४१ ॥
संतांच्या जें असेल मनीं । तेंच येईल घडोनी ।
भरंवसा त्यांचे चरणीं । ठेवून स्वस्थ असावें ॥ १४२ ॥
दुसरे दिवशीं प्रसादासी । घेऊन गेला तेल्हाऱ्यासी ।
आतां पुढील गोष्टीसी । अवधान द्यावें श्रवणातें ॥ १४३ ॥
एक रतनसा नामें नर । होता जातीनें भावसार ।
तयाचा मुलगा दिनकर । होता एक वर्षाचा ॥ १४४ ॥
त्यासी सोबणीचा रोग झाला । कोणी म्हणती सटावला ।
बालक अवघा सुकून गेला । रक्त न राहिलें अंगांत ॥ १४५ ॥
दिसूं लागलीं अवघीं हाडें । वरती नुसतें कातडें ।
वैद्य आणले बडेबडे । परी न झाला उपयोग ॥ १४६ ॥
मुलगें रडतां राहिना । दूधपाणी घेईना ।
ज्वर मुळींच सोडीना । पाहा तयाच्या तनूतें ॥ १४७ ॥
वैद्य म्हणती रतनसासी । आतां औषध न देईं यासी ।
हा तुझ्या हातासी । लागणें आहे अशक्य ॥ १४८ ॥
शक्याशक्य विचार । सुझें करावा निरंतर ।
उगीच पूल सागरावर । बांधावया जाऊं नये ? ॥ १४९ ॥
ऐसें ऐकून रतनसा । रडूं लागला ढसढसां ।
शेवटीं विचार त्यानें ऐसा । केला आपुल्या मानसीं ॥ १५० ॥
येवींतेवीं मरतें पोर । माझें आतां साचार ।
पाहूं करून एकवार । उपाय हा शेवटचा ॥ १५१ ॥
दिनकराचा अंतकाळ । आला होता अति जवळ ।
घरचीं माणसें सकळ । लागलीं श्रोते रडावया ॥ १५२ ॥
हातपाय गार झाले । नेत्रतेज मंदावलें ।
मनगटाचें सोडिलें । ठिकाण पाहा नाड्यांनीं ॥ १५३ ॥
ऐशा स्थितिमाझारी । रतनसानें पुत्र करीं ।
घेऊन ठेविला असे द्वारीं । नेऊनिया समर्थांच्या ॥ १५४ ॥
आणि केला त्यांसी नवस । पुत्र माझा उठल्यास ।
शेरणी वांटीन तुम्हांस । मी पांच रुपयांची ॥ १५५ ॥
तुम्ही पावले अवघ्यांला । त्याचा अनुभव द्यावा मला ।
मीही आहे आपुला । माझी उपेक्षा करूं नका ॥ १५६ ॥
माझें मूल द्वारांत । तुझ्या जरी झालें मृत ।
तरी अवघ्या वऱ्हाडांत । तुझी होईल नाचक्की ॥ १५७ ॥
अमृतापरी तुझे चरण । आले सांगत आम्हां जन ।
हे स्वामी गजानन । कृपा करा या बाला ॥ १५८ ॥
पुत्र न माझा उठला जरी । मी डोकें फोडीन पायांवरी ।
तुझ्या आज निर्धारीं । ऐसा निश्चय मनींचा ॥ १५९ ॥
अमृततुल्य तुझी दृष्टि । त्याची करावी आज वृष्टि ।
नको करूंस मला कष्टी । महापुरुषा गजानना ! ॥ १६० ॥
त्यास कांहीं वेळ झाला । तों प्रकार ऐसा घडून आला ।
मूल हातापायांला । हालवावया लागलें ॥ १६१ ॥
नाडी आली ठिकाणीं । रुदन करूं लागलें जाणी ।
तो प्रकार पाहूनी । लोक सारे आनंदले ॥ १६२ ॥
समर्थकृपा झाल्यावर । राहिल कोठून त्या दर ? ।
सूर्याचिया समोर । तमाचा तो पाड नसे ॥ १६३ ॥
दिनकर थोडे दिवसांत । होता झाला पूर्ववत् ।
नवस असला श्रद्धायुक्त । तो फळे हा न्याय असे ॥ १६४ ॥
दादा कोल्हटकरांचा । पुत्र राजा नांवाचा ।
आहे प्रसाद समर्थांचा । संतकृपा अमोल खरी ॥ १६५ ॥
कन्या रामचंद्र पाटलाची । चंद्रभागा नांवाची ।
ज्वान अठरा वर्षांची । लाडेगांव सासर जिचें ॥ १६६ ॥
ही असतां गरोदर । प्रसंग आला दुर्धर ।
प्रसूतीची वेळ फार । कठीण स्त्रीजातीला ॥ १६७ ॥
लाडेगांवाहून माहेरीं । चंद्रभागा आली खरी ।
प्रसूतीस्तव निर्धारी । जनरीतीप्रमाणें ॥ १६८ ॥
मोठ्या कष्टानें प्रसूती । झाली तिची निश्चिती ।
तोंच चंद्रभागेवरती । ज्वरें अंमल बसविला ॥ १६९ ॥
तो होता नवज्वर । थकून गेले डॉक्टर ।
औषधउपचार केले फार । आपुल्या मुलीस पाटलांनीं ॥ १७० ॥
थोडाबहुत गुण आला । व्याधि तितक्यापुरता दबला ।
परी नव्हता मुळींच झाला । नामशेष देहांतूनी ॥ १७१ ॥
चंद्रभागा आजारी । पडूं लागली वरच्यावरी ।
एकदां अकोल्या नेलें खरी । औषध तिला द्यावया ॥ १७२ ॥
वैद्य विधानें नाना करिती । कोणी नळसंग्रहणी बोलती ।
कोणी वैद्य ऐसें म्हणती । क्षय झाला मुलीस या ॥ १७३ ॥
मेळ एकाचा एकाला । नाहीं मुळीं लागला ।
मग पाटलानें विचार केला । आतां वैद्य गजानन ॥ १७४ ॥
तारो अथवा मारो इसी । अंगारा लावा प्रतिदिवसीं ।
तीर्थ द्यावें प्यावयासी । समर्थांच्या पायांचें ॥ १७५ ॥
पिता मोठा निष्ठावंत । समर्थांवरी अवघा हेत ।
हळुहळू त्या पोरीप्रत । गुण येता जाहला ॥ १७६ ॥
तिला उठवत नव्हतें शय्येसी । तीच आली दर्शनासी ।
पायीं चालत मठासी । हें महत्त्व अंगाऱ्याचें ॥ १७७ ॥
निष्ठावंत ज्याचा भाव । तयाशीं पावे देव ।
उपास्यापदीं भाव । उपासकें ठेवावा ॥ १७८ ॥
रामचंद्राची अंगना । जानकाबाई सुलक्षणा ।
परी दैवयोग सुटेना । तो भोगल्यावांचुनी ॥ १७९ ॥
वाताचा झाला विकार । जानकाबाईस साचार ।
पोट दुखे वरच्यावर । कांही उपाय चालेना ॥ १८० ॥
औषध देतां दबे वात । पुनः उठे पूर्ववत् ।
ऐसा क्रम दिवस बहुत । चालला होता श्रोते हो ॥ १८१ ॥
त्या वाताची अखेरी । होती झाली मस्तकावरी ।
मेंदु बिघडला निर्धारी । गेली जाणीव मावळून ॥ १८२ ॥
वेड्यापरी करावें । वाटेल तें बोलावें ।
कधीं उपाशी निजावें । कधीं बसावें जेवत ॥ १८३ ॥
कोणी म्हणती लागलें भूत । कोणी म्हणती रोग सत्य ।
कांहीं वदूं लागले तेथ । हा करणीचा प्रकार असे ॥ १८४ ॥
कां कीं जितके असती जमेदार । त्यांचें असतें वांकडे फार ।
दुबळा आपुला दावी जोर । चेटूककरणी करुनिया ॥ १८५ ॥
औषध उपाय बहुत केले । जाणतेही आणविले ।
गंडे बहुत बांधिले । करीं जानकाबाईच्या ॥ १८६ ॥
पाटील घरचा श्रीमंत । तो सांपडला अडचणींत ।
म्हणून येतां झाला ऊत । अवघ्यां त्या दांभिकांना ॥ १८७ ॥
कोणी अंगांत आणावें । वेडाचें निदान करावें ।
कांही तरी सांगावें । धनास्तव पाटलाला ॥ १८८ ॥
तो बिचारा सारें करी । कांता बरी न होय परी ।
विचार त्यानें अखेरीं । ऐशा रीतीं ठरविला ॥ १८९ ॥
वैद्य आतां गजानन । जाणता आतां गजानन ।
देव ऋषि आतां गजानन । तो जें वाटेल तें करो ॥ १९० ॥
माझी बायको सून त्याची । ही भावना माझी साची ।
आतां अन्य उपायांची । गरज नाहीं आम्हांला ॥ १९१ ॥
तूं उद्यांपासून । प्रातःकाळीं करी स्नान ।
मठामाजीं जाऊन । घाली प्रदक्षिणा समाधीसी ॥ १९२ ॥
तें तिनें पतीचें वचन । सर्वथैव केलें मान्य ।
समर्थ समाधी लागून । घालूं लागली प्रदक्षिणा ॥ १९३ ॥
गेल्या न त्या मात्र वायां । दया आली सद्गुरुराया ।
वातविकार जाऊनियां । निर्दोष ती जाहली ॥ १९४ ॥
खऱ्या खऱ्या संतांची । सेवा न जाई वांया साची ।
परी निष्ठा मानवाची । जडणें तेथे अशक्य ॥ १९५ ॥
समर्थांच्या नंतर । बाळाभाऊ गादीवर ।
बसले त्यांचे चमत्कार । कांहीं थोडे जाहले ॥ १९६ ॥
हे वैशाख वद्य षष्ठीसी । शेगांवी गेले वैकुंठासी ।
त्यांच्यामागून गादीसी । बसले येऊन नारायण ॥ १९७ ॥
बाळाभाऊ जेव्हां गेले । तेव्हां नारायणासी स्वप्न पडलें ।
नांदूरें ग्रामीं भलें । तें थोडें सांगतों ॥ १९८ ॥
हे माळी नारायणा । तूं शेगांवास करी गमना ।
रक्षण्या भाविक जनांना । ऐसें मला वाटतें ॥ १९९ ॥
ऐसें स्वप्नीं सांगून । निघून गेले गजानन ।
म्हणून आले नारायण । शेगांवामाझारीं ॥ २०० ॥
कांहीं दिवस यांनींही । अधिकार चालविला ते ठायीं ।
यांची समाधि झाली पाही । चैत्र शुद्ध षष्ठीला ॥ २०१ ॥
पूर्वसुकृतावांचून । संतसेवा न घडे जाण ।
संतसेवेचें महत्पुण्य । त्या पुण्या पार नसे ॥ २०२ ॥
श्रीगजाननलीलेचा । पार कधीं न लागायाचा ।
अंबरीच्या चांदण्यांचा । हिशेब कोणा न लागे कधीं ॥ २०३ ॥
मी अज्ञान पामर । मति नाहीं तिळभर ।
मग हा लीलासागर । मुखीं केवीं वर्णू हो ! ॥ २०४ ॥
त्यानें जें जें वदविलें । तें तें मीं कथित केलें ।
लेखणीनें अक्षर लिहिलें । परी तें न तिचें सामर्थ्य ॥ २०५ ॥
ती लेखणी ज्याच्या करीं । तोच अक्षरें काढी सारीं ।
निमित्ताकारण होते खरी । लेखणी ती लिहावया ॥ २०६ ॥
तैसेंच येथे झालें । मी लेखणीचें काम केलें ।
लिहिते लिहविते स्वामी भले । श्रीगजानन महाराज ॥ २०७ ॥
त्यांच्या कृपेंकरून । मी हें केलें लेखन ।
येथें माझें मोठेपण । कांहींच नाहीं विबुध हो ! ॥ २०८ ॥
स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा श्रीगजाननविजय नामें ग्रंथ ।
आतां आला कळसाप्रत । कळसाध्याय पुढें असे ॥ २०९ ॥
शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति श्रीगजानन विजय ग्रंथस्य विंशोऽध्यायः समाप्तः ॥