हे दयानिधे श्री गजानना | गणेश करुणाष्टके

ll गणेश करुणाष्टके ll

घोर हा नको फार कष्टलो ।
निजहितास मी व्यर्थ गुंतलो ।
वारि शीघ्र संसार यातना ।
हे दयानिधे श्री गजानना ॥ १ ॥

विषय गोड हे लागले मला ।
यामुळे असे घात आपुला ।
कालुनीया असें भ्रांति जाईना ।
हे दयानिधे श्री गजानना ॥ २ ॥

त्रिविध ताप हा जाळितो अती ।
काम क्रोध हे जान पीडती ।
चित्त सर्वथा स्वस्थ राहिना ।
हे दयानिधे श्री गजानना ॥ ३ ॥

स्त्री धनादि हे आठवे गनी ।
छंद हाच रे दिवसयामिनी ।
विसरलो तुला दिनपालना ।
हे दयानिधे श्री गजानना ॥ ४ ॥

माउली पिता बंधू सोयरा ।
तूंचि आमुचा निच्छये खरा ।
शरण तुंज मी विघ्नभजना ।
हे दयानिधे श्री गजानना ॥ ५ ॥

म्हणवितो तुझा दास या जनी ।
सकळ व्यापका जाणशी मनी ।
भुक्ती मुक्ती दे भक्तपालना ।
हे दयानिधे श्री गजानना ॥ ६ ॥

काय काय रे साधनें करू ।
मी असे तुझे मुर्ख लेकरु ।
विटंबिती मला द्वैतभावना ।
हे दयानिधे श्री गजानना ॥ ७ ॥

विषयचिंतेनें शोक पावलों ।
देह बुद्धीने व्यर्थ नाडलों ।
भालचंद्रजी तोडी बंधना ।
हे दयानिधे श्री गजानना ॥ ८ ॥

गजमुखा तुझी वाट पहातां ।
नेत्र शीणले जाण तत्वतां ।
भेटसी कधी भ्रमनिवारणा ।
हे दयानिधे श्री गजानना ॥ ९ ॥

प्रभु समर्थ तू आमुचे शिरी ।
वेष्टिलों असे विषयापागरीं ।
नवल हेंचि रे वाटते गना ।
हे दयानिधे श्री गजानना ॥ १० ॥

अगुण अद्वया तू परात्परा ।
पार नेणवे विधि हरीहरां ।
अचल निर्मला नित्य निर्गुणा ।
हे दयानिधे श्री गजानना ॥ ११ ॥

जीवन व्यर्थ हे तुज वेगळे ।
स्वहित आपुले काम साधिले ।
सुख नसे सदा मोहयातना ।
हे दयानिधे श्री गजानना ॥ १२ ॥

फारसे मला बोलता न ये ।
पाउले तुझे देखिलीं स्वये ।
मांडिली असे बहुत वल्गना ।
हे दयानिधे श्री गजानना ॥ १३ ॥

दीनबंधू हे ब्रीद आपुले ।
साच तूं करीं दाविं पाउले ।
मंगलालया विश्वजीवना ।
हे दयानिधे श्री गजानना ॥ १४ ॥

नाशिवंत रे सर्व संपदा ।
हे नको मला पाव एकदा ।
क्षेम देउनी चित्तरंजना ।
हे दयानिधे श्री गजानना ॥ १५ ॥

जातसे घडी पल युगापरी ।
लागली तुझी खंती अंतरी ।
स्वामी आपुला विरह साहिना ।
हे दयानिधे श्री गजानना ॥ १६ ॥

कळेल तें करी विनविणे किती ।
तारी अथवा मारीं गणपती ।
सकलदोष अन संकष्टनाशना ।
हे दयानिधे श्री गजानना ॥ १७ ॥

आवडे मला त्रिभुवनाकृती ।
पूजुनी बरी करीन आरती ।
धांव पाव रे मोदकाशना ।
हे दयानिधे श्री गजानना ॥ १८ ॥

हृदय कठीण तूं न करि सर्वथा ।
अंत आमुचा बघसी पुरता ।
सिद्धी वल्लभा मूषकवाहना ।
हे दयानिधे श्री गजानना ॥ १९ ॥

कल्पवृक्ष तू कामधेनु वा ।
लाविजे स्तनीं जिविंच्या जिवा ।
हाचि हेत रे शेष भुषणा ।
हे दयानिधे श्री गजानना ॥ २० ॥

गणपति तुझे नाम चांगले ।
आवडी बहु चित्त रंगले ।
प्रार्थना तुझी गौरीनंदना ।
हे दयानिधि श्री गजानना ॥ २१ ॥

तारिं मोरया दुःखसागरीं ।
गोसावीनंदन प्रार्थना करी ।
आत्मया मनी जाण चिदघना ।
हे दयानिधे श्री गजानना ॥ २२ ॥

Post a Comment

आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .

थोडे नवीन जरा जुने