॥ सार्थ श्री तुकाराम महाराज हरिपाठ ॥

॥ सार्थ श्री तुकाराम महाराज हरिपाठ ॥

अभंग १ नमिला गणपति माऊली सारजा । आतां गुरुराजा दंडवत ।। १ ।।
गुरुरायाचरणीं मस्तक ठेविला । आपुल्या स्तुतीला द्यावी मती ।। २ ।।
गुरुराया तुज ऐसा नाहीं सखा । कृपा करुनी रंका धरीं हातीं ।। ३ ।।
तुका म्हणे माता पिता गुरु बंधु । तूंचि कृपासिंधु पांडुरंगा ।। ४ ।।
अभंग २ पहाटेच्या प्रहरीं म्हणा हरि हरी । तया सुखा सरी नाहीं दुजें ।। १ ।।
केशव वामन नारायण विष्णु । कृष्ण संकर्षणु राम राम ।। २ ।।
माधवा वामना श्रीधरा गोविंदा । अच्युत मुकुंदा पुरुषोत्तमा ।। ३ ।।
नरहरी भार्गवा गोपाळा वासुदेवा । हृषीकेशा पावा स्मरणमात्रें ।। ४ ।।
तुका म्हणे ऐका नामीं भाव । राहे होय साह्य पांडुरंग ।। ५ ।।
अभंग ३ अयोध्या मथुरा काशी अवंतिका । कांची हे द्वारका माया सत्य ।। १ ।।
मोक्ष पुऱ्या ऐशा नित्य वाचे स्मरे । प्राणी तो उद्धरे स्मरणमात्रें ।। २ ।।
नित्य नित्य मनीं हरि आठवावा । तेणेंचि तरावा भवसिंधु ।। ३ ।।
तुका म्हणे ऐसा नामाचा महिमा । राहील जो नेमा तोचि धन्य ।। ४ ।।
अभंग ४ यमुना कावेरी गंगा भगीरथी । कृष्णा सरस्वती तुंगभद्रा ।। १ ।।
नर्मदा आठवी वेळोवेळी वाचे । नाहीं भय साचें प्राणियासी ।। २ ।।
जयाचे संगती प्राणी उद्धरती । दर्शनेंच होती मुक्ति प्राप्त ।। ३ ।।
तुका म्हणे नामीं एकनिष्ठ भाव । तेथें वासुदेव सर्व काळ ।। ४ ।।
अभंग ५ प्रातःकाळीं नाम पवित्रचि घ्यावें । तेणें विसरावें जन्ममृत्यु ।। १ ।।
नळ युधिष्ठिर जनक जनार्दन । स्मरणेंचि धन्य होती प्राणी ।। २ ।।
न करा आळस नाम घेतां वाचे । नाहीं भय साचें प्राणियासी ।। ३ ।।
तुका म्हणे वाचे गाईल गोविंद । होईल परमानन्द नामें ऐका ।। ४ ।।
अभंग ६ कश्यप गौतम भारद्वाज अत्री । ऋषि विश्वामित्र नाम थोर ।। १ ।।
जमदग्नि मुनि वसिष्ठ वर्णिला । तिन्हीं लोकीं झाला वंद्य एक ।। २ ।।
नाम घेतां नुरे पाप ताप दैन्य । होय थोर पुण्य उच्चारितां ।। ३ ।।
तुका म्हणे ऐसी उच्चारितां वाणी । तेथें अंतःकरणीं सुख होय ।। ४ ।।
अभंग ७ अहिल्या द्रौपदी सीता तारा चारी । मुख्य मंदोदरी पतिव्रता ।। १ ।।
नामें घेतां त्यांची वाणी हे पवित्र । होय कुळगोत्र उद्धरण ।। २ ।।
संकल्प विकल्प सांडोनियां दुरी । वाचे हरि हरी उच्चारावे ।। ३ ।।
नाहीं बद्धकता तया संसाराची । जाचणी यमाची मग कैंची ।। ४ ।।
अभंग ८ व्यास अंबरिष वसिष्ठ नारद । शौनक प्रल्हाद भागवत ।। १ ।।
नित्य स्मरण करी यांचें जरी प्राणी । पुन्हां नाहीं खाणी चौऱ्याशींची ।। २ ।।
शुक पराशर मुनि पुंडलीक । अर्जुन वाल्मीक नाम गाती ।। ३ ।।
बली बिभीषण भीष्म रुक्मांगद । बकदालभ्य शुद्ध महर्षि ।। ४ ।।
तुका म्हणे यांचीं नामें येतां वाणीं । प्रत्यक्ष तो प्राणी देवाऐसा ।। ५ ।।
अभंग ९ गीता भागवत वेद उच्चारितां । पापाची तों वार्ता कोठें राहे ।। १ ।।
सकळ वासना नामीं जे रंगली । साधनें राहिली मग कैंची ।। २ ।।
म्हणोनिया नेम ऐसा तारी जीवा । होय तोचि देवा आवडता ।। ३ ।।
उगवला दिवस जाय तो क्षणांत । विचारुनि हित वेगीं करा ।। ४ ।।
तुका म्हणे स्मरा वेगीं विठोबासी । न धरा मानसीं दुजें कांहीं ।। ५ ।।
अभंग १० तीर्थाचें जें मूळ व्रताचें जें फळ । ब्रह्म तें केवळ पंढरीये ।। १ ।।
तें आम्हीं देखिलें आपुले नयनीं । फिटलीं पारणीं लोचनांचीं ।। २ ।।
जिवींचा जिव्हाळा सुखाचा शेजार । उभें कटीं कर ठेवूनियां ।। ३ ।।
जगाचा जनिता कृपेचा सागर । दीनां लोभपर दुष्टां काळ ।। ४ ।।
सुरवरां चिंतनीं मुनिवरां ध्यानीं । आकार निर्गुणीं तोचि असे ।। ५ ।।
तुका म्हणे नाहीं श्रुती आतुडलें । आम्हां सांपडलें गीतीं गातां ।। ६ ।।
अभंग ११ राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ।। १ ।।
कस्तुरी मळकट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ।। २ ।।
मुकुट कुंडलें श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतिलें सकळही ।। ३ ।।
कांसे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सावळा बाइयांनो ।। ४ ।।
सकळही तुम्ही व्हा गे ऐकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ।। ५ ।।
अभंग १२ आवडे हें रूप गोजिरें सगुण । पाहतां लोचन सुखावले ।। १ ।।
आतां दृष्टीपुढें ऐसाचि तूं राहे । जों मी तुज पाहें पांडुरंगा ।। २ ।।
लांचावलें मन लागलीसे गोडी । ते जीवें न सोडी ऐसें झालें ।। ३ ।।
तुका म्हणे आम्हीं मागावें लडिवाळी । पुरवावी आळी मायबापें ।। ४ ।।
अभंग १३ शंख चक्र गदा रुळे वैजयंती । कुंडलें तळपती दोन्हीं कानीं ।। १ ।।
मस्तकीं मुकुट नवरत्नहार । वरी पीतांबर पांघुरला ।। २ ।।
रत्नहिरेजडित कटीं कडदोरा । रम्य शोभे हिरा बेंबीपाशी ।। ३ ।।
जडित कंकण कर्णी शोभे मुद्रिका । लाचावला तुका भेटीसाठीं ।। ४ ।।
अभंग १४ नेणें जप तप योग युक्ति ध्यान । करितां चिंतन रात्रंदिवस ।। १ ।।
नेणें कांहीं देवा झालों उतराई । मागें लागों पाहीं बाळ जैसा ।। २ ।।
भाव-गंगोदकें आम्ही शुद्ध पाहें । प्रक्षाळिले पाय विटेसहित ।। ३ ।।
जन्मली जान्हवी ज्या ठायीं उत्तम । हारावया श्रम भाविकांचे ।। ४ ।।
तुका म्हणे आम्ही झालों पुण्यवंत । सेविलें अमृत रामतीर्थ ।। ५ ।।
अभंग १५ परिमळमिश्रित करूनि उटणें । नारायण तेणें तोषविला ।। १ ।।
पय घृत दहि मधु ते शर्करा । गोशृंगधारा अखंडित ।। २ ।।
करोनि संयुक्त ओपियली ईशा । पंचामृतें तैशी पंचविधि ।। ३ ।।
तुका म्हणे जेथें गंगे जन्म झाला । प्रसाद दिधला आम्हालागी ।। ४ ।।
अभंग १६ आपुलिया घरीं कष्ट तरी करीं । आणोनि घागरी गंगोदक ।। १ ।।
करोनि विनंती विनवितो तुम्हां । स्नान पुरुषोत्तमा करा वेगीं ।। २ ।।
उत्तम वस्त्रानें पुसावें तें अंग । करोनि अभ्यंग सर्वांगासी ।। ३ ।।
परिधान वस्त्रें केलें पीतांबरें । तेणें हें साजिरें रूप दिसे ।। ४ ।।
तुका म्हणे नेत्र पाहतां निवाले । ध्यान संचारलें हृदयामाजीं ।। ५ ।।
अभंग १७ मन हा मोगरा अर्पूनी ईश्वरा । पुनरपि संसारा येणें नाहीं ।। १ ।।
मन हें सेवंती अर्पूनी भगवंतीं । पुनरपि संसृती येणें नाहीं ।। २ ।।
मन हें तुळसी अर्पूनी हृषीकेशी । पुनरपि जन्मासी येणे नाहीं ।। ३ ।।
तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा । तया वास व्हावा वैकुंठासी ।। ४ ।।
अभंग १८ नामपुष्प शुद्ध गळां घाला हार । विवेक सारासार तुरा लावूं ।। १ ।।
बोध भाळीं बुका क्षमा तुलसीदळ । वाहतां गोपाळ संतोषतो ।। २ ।।
गाइलीया गुण संतोषें तयानें । करितां कीर्तनें आल्हादे तो ।। ३ ।।
आल्हादे हा देव कीर्ति वाखाणितां । पवाडे सांगतां याचे यास ।। ४ ।।
याचे यास करूं सर्व निवेदन । वारील हा शीण संसारांचा ।। ५ ।।
संसाराचा वारा लागों नेदी अंगा । भावे पांडुरंगा आळवितो ।। ६ ।।
तुका म्हणे आतां उजळली आरती । भावें तो श्रीपती ओवाळूंया ।। ७ ।।
अभंग १९ शब्दाचिया भावें केला उपचार । तेणें सर्वेश्वर संतोषला ।। १ ।।
शब्दाचिया करें करविलें भोजन । धाला नारायण तेणें सुखें ।। २ ।।
शब्दाचिया करें करविले आचमन । तांबूल अर्पून फळें पुष्पे ।। ३ ।।
तुका म्हणे अन्नाआधी धूपदीप । उपचार अल्प समर्पिले ।। ४ ।।
अभंग २० मजलागीं नाहीं ज्ञानाची ती चाड । वाचे घेत गोड नाम तुझें ।। १ ।।
नेणतें लेकरूं आवडीचें नातें । बोले वचनातें आवडीनें ।। २ ।।
भक्तिविण कांहीं वैराग्य तें नाहीं । घातला विठाई भार तुज ।। ३ ।।
तुका म्हणे नाचूं निर्लज्ज होऊनी । नाहीं मझे मनीं दुजा भाव ।। ४ ।।
अभंग २१ पूजूं नारायण शब्दाचे सुमनें । मंत्रपुष्प तेणें वाहियेलें ।। १ ।।
भावाचे पैं हातीं जोडुनी ओंजळ । समर्पिले जळ शुद्ध भावें ।। २ ।।
मुखशुद्धी तांबूल दिलें तुळसीदल । आनंद सकळ ओसंडला ।। ३ ।।
तुका म्हणे आतां उरलें नाहीं । नामाविण कांहीं बोलावया ।। ४ ।।
अभंग २२ समाधान चित्ताचें चरणा आलिंगन । पायावरी मन स्थिरावले ।। १ ।।
जैसें केलें तैसें घालूं लोटांगणा । करूं प्रदक्षिणा नमस्कार ।। २ ।।
प्रार्थितों मी तुज राहें माझें पोटीं । हृदयसंपुटीं देवराया ।। ३ ।।
क्षेम आलिंगन दिली पयीं मिठी । घेतलीसे लुटी अमूप हो ।। ४ ।।
तुका म्हणे आतां आनंदीआनंद । गाऊं परमानंद मनासंगें ।। ५ ।।
अभंग २३ काय उपचार करूं पांडुरंगा । हेंचि मज सांगा विचारूनी ।। १ ।।
कोणता पदार्थ उणा तुजपासी । बोलाया वाचेसीं मौन पडे ।। २ ।।
शंकर-शेषादि करिती स्मरण । तेथें माझें मन गाऊं शके ।। ३ ।।
इंद्र सुरवर वाहती सुमनें । तेथें म्यां वाहणे काय ऐक ।। ४ ।।
परी आवडीनें जोडुनी ओंजळ । बुका वाहूं माळ तुळसीची ।। ५ ।।
उणें पुरें तुम्ही करूनियां सांगा । जिवालागीं मग सुख तेंव्हां ।। ६ ।।
तुका म्हणे माझी ऐकावी प्रार्थना । तुम्ही नारायणा सेवकाची ।। ७ ।।
अभंग २४ कैसें करूं ध्यान कैसा पाहूं तुज । वर्म दावी मज याचकासी ।। १ ।।
कैसी भक्ति करूं सांग तुझी सेवा । कोण्या भावें देवा आतुडसी ।। २ ।।
कैसी कीर्ति वाणूं कैसा लक्षीं जाणूं । जाणूं हा कवणूं कैसा तुज ।। ३ ।।
कैसा गाऊं गीतीं कैसा ध्याऊं चित्तीं । कैसी स्थिति मति न कळे मज ।। ४ ।।
तुका म्हणे जैसें दास केलें देवा । तैसें हें अनुभवा आणीं मज ।। ५ ।।
अभंग २५ काय तुज कैसें जाणावें गा देवा । आणावे अनुभवा कैशापरी ।। १ ।।
सगुण निर्गुण स्थूल कीं लहान । न कळे अनुमान मज तुझें ।। २ ।।
कोणता निर्धार करूं हा विचार । भवसिंधु पार तारावया ।। ३ ।।
तुका म्हणे कैसें पाय आतुडती । न पडे श्रीपती वर्म ठावें ।। ४ ।।
अभंग २६ स्तुती करूं तरी कोण माझी मती । वेदां पडे भ्रांति हें आश्चर्य ।। १ ।।
परी हा जिव्हाग्रीं रामकृष्णहरी । बैसवीं लौकरी यातीगुण ।। २ ।।
रूप गुण कीर्ति कृपाळू उदार । वर्णावया पार ब्रह्मा नेणे ।। ३ ।।
रूपीं नामीं शिव होऊनिया वेडा । वर्णिला पवाडा रामनामीं ।। ४ ।।
तुका म्हणे मज नेणवेचि शिव । नाहीं राहिला वाव बोलावया ।। ५ ।।
अभंग २७ नामाचा प्रताप न वर्णवेचि मज । सांग गरुडध्वज राहे तेथें ।। १ ।।
मम वाचा किती परतल्या श्रुती । वेद मुखें श्रुती मौन ठेले ।। २ ।।
वर्णू नेणें शेष नामाचा पवाडा । चिरलिया रांडा जिव्हा त्याच्या ।। ३ ।।
अनुसरली रमा वर्णावया श्रीहरी । पायांची किंकरी होऊनि ठेली ।। ४ ।।
तुका म्हणे आम्ही मानव किंकर । वर्णावया पार न कळे तुझा ।। ५ ।।
अभंग २८ आम्हीं मानवानी वर्णावें तें काय । सुरवर पाय वंदिताती ।। १ ।।
गणेश शारदा करिती गायन । आदिदेव गण श्रेष्ठ श्रेष्ठ ।। २ ।।
जयाच्या गायना तिष्ठतो शंकर । तयासी पैं पार न कळे तुझा ।। ३ ।।
तुका म्हणे आम्ही किंकर ते किती । इंद्राची ती मती नागविली ।। ४ ।।
अभंग २९ अगा महाविष्णु अनंत भुजांच्या । आम्हां अनाथांच्या सोयरीया ।। १ ।।
न कळे महिमा वेद मौनावती । तेथें माझी मति कोणीकडे ।। २ ।।
काय म्यां वर्णावें तुझ्या थोरपणा । सहस्रवदना शक्ति नव्हे ।। ३ ।।
रविशशी जेथें तेजें सामावती । तेथें माझी मती कोणीकडे ।। ४ ।।
तुका म्हणे आम्ही बाळ तूं माऊली । करावी साउली करुणेची ।। ५ ।।
अभंग ३० नमो विश्वरूपा अगा मायबाप । अपारा अमूपा पांडुरंगा ।। १ ।।
विनवितो रंक दास मी सेवक । वचन तें ऐक आइकावे ।। २ ।।
तुझी स्तुती वेद करितां भागला । निवांतचि ठेला नेति नेति ।। ३ ।।
ऋशि मुनि बहु सिद्ध कविजन । वर्णितां तुझे गुण न सरती ।। ४ ।।
तुका म्हणे तेथें काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्ति देवा ।। ५ ।।
अभंग ३१ विनविजे ऐसे भाग्य नाहीं देवा । पायांशीं केशवा सलगी केली ।। १ ।।
धीटपणे पत्र लिहिलें आवडी । पार नेणें थोडी मति माझी ।। २ ।।
जेथें वेदां तुझा न कळेचि पार । तेथें मी अपार काय वानूं ।। ३ ।।
जैसे तैसे माझे बोल अंगिकारी । बोबड्या उत्तरी गौरवितो ।। ४ ।।
तुका म्हणे विटेवरी जीं पाऊलें । तेथें म्यां ठेविलें मस्तक हें ।। ५ ।।
अभंग ३२ त्रिगुण आटीव वाचेचा पसारा । पडेल विचार सर्व रस ।। १ ।।
आदि मध्य अंतीं नाहीं अवसान । जीवनीं जीवन मिळुनी गेलें ।। २ ।।
रामकृष्ण नाम माळ ही साजिरी । ओंविली गोजिरी कर्णी मनी ।। ३ ।।
तुका म्हणे तनु झाली हे शीतल । आवडी सकळ ब्रह्मानंदें ।। ४ ।।
अभंग ३३ इतुकें करीं देवा ऐकें वचन । समूळ अभिमान जाळीं माझा ।। १ ।।
इतुकें करीं देवा आइकें हे गोष्टी । सर्व समदृष्टी तुज देखें ।। २ ।।
इतुकें करीं देवा विनवितों तुज । संतचरण रज वंदी माथां ।। ३ ।।
इतुकें करीं देवा आइकें हे मात । हृदयीं पंढरीनाथ दिवसरात्रीं ।। ४ ।।
भलतियां भावें तारी पंढरीनाथा । तुका म्हणे आतां शरण आलों ।। ५ ।।
।। इति श्रीतुकाराम हरिपाठ समाप्त ।।

Post a Comment

आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .

थोडे नवीन जरा जुने