श्री ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी पूजन 2024

श्री महालक्ष्मी आवाहन व पुजन व विसर्जनाचे मुहूर्त विषयावर लेख हा लेख पुर्ण वाचा


या वर्षी श्री महालक्ष्मी आवाहन दिनांक १०/०९/२०२४ रोजी मंगळवार भाद्रपद शुक्ल पक्ष षष्ठी-सप्तमी ला बलवान अनुराधा नक्षत्रावर


श्रीमहालक्ष्मी पुजन दिनांक ११/०९/२०२४ रोजी बुधवार भाद्रपद शुक्ल पक्ष अष्ठमीला बलवान ज्येष्ठा नक्षत्रावर दुसर्‍या दिवशी


श्रीमहालक्ष्मी विसर्जन दिनांक १२/०९/२०२४ रोजी गुरूवार भाद्रपद शुक्ल पक्ष नवमीला बलवान मूळ नक्षत्रावर विसर्जन करावे 


आली आली लक्ष्मी, 

आली तशी जाऊ नको बाळाला सांगते,

 धरला हात सोडू नको....

मला आहे हौस, चांदीच्या ताटाची

लक्ष्मीच्या नैवेद्याला मूद साखरभाताची.

श्री लक्ष्मीबाई आली सोन्याच्या पावलांनी

ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा आली

मालकाच्या घरी लक्ष्मी आली.......

घरोघरी श्रीमहालक्ष्मी चे आगमन होईल॥


श्री महालक्ष्मी आवाहन मुहूर्त:-


दिनांक १०/०९/२०२४ रोजी मंगळवार  भाद्रपद शुक्ल पक्ष सप्तमी ला बलवान अनुराधा नक्षत्रावर रात्री ०८ः०४ मी पर्यंत असल्यामुळे या मुहुर्तावर श्रीमहालक्ष्मी आवाहन आहे यांचे प्रमाण निर्णयसिंधु गंथांचा फोटो मध्ये दिला आहे


सकाळी:-१०:०४ ते ०१:१३ मी पर्यंत(स्थिर वृश्चिक लग्न )


दुपारी:-११:०० ते ०२:०० मी पर्यंत(लाभ~ अमृत)

 

संध्या:-०५ः१० ते ०६:४८ मी (स्थिर कुंभ लग्न)


या वरील शुभ मुहूर्तावर आपण श्रीमहालक्ष्मीचे आपल्या वास्तुमध्ये मंगलमय मिरवणूक करून आवाहन व स्थापन करावे कारण अनुराधा नक्षत्रावर रात्री ०८ः०४ मी पर्यंतच

असल्यामुळे या मुहुर्ताच्या आत श्रीमहालक्ष्मी आवाहन आहे

 

श्रीमहालक्ष्मी व अलक्ष्मी म्हणजे काय? 


भाद्रपद शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आवाहित केल्या जाणाऱ्या देवतेस श्रीमहालक्ष्मी असे संबोधले जाते. या देवतेचे आवाहन अनुराधा नक्षत्रावर आणि पूजन जेष्ठा नक्षत्रावर तसेच विसर्जन मूळ नक्षत्रावर होते. पुराणात थोडेफार उल्लेख आणि मौखिक परंपरेने चालत आलेली कहाणी इतकीच माहिती श्रीमहालक्ष्मी 

विषयी उपलब्ध आहे.


जेष्ठा नक्षत्रावर ही देवी येत असल्याचे तिला जेष्ठा लक्ष्मी म्हटले जाते. तसेच लक्ष्मीची जेष्ठा भगिनी अलक्ष्मी हिची पूजा या दिवशी केली जाते. जगात सर्वत्र प्रत्येक गोष्टींना चांगली- वाईट, डावी-उजवी अशा दोन विरोधी बाजू असतात. त्यातल्या डाव्या गोष्टीचा त्याग केल्यास अनवस्था निर्माण होते असे मानतात.


विशेष नोट :- 

भरपूर लोकांना हा गैरसमज आहे की श्रीलक्ष्मी हे जेष्ठागौरी आहे पण जेष्ठागौरी श्री शंकरांची पत्नी म्हणजे देवी पार्वती म्हणजे जेष्ठागौरी आहे यांचे पुजन चैत्र सह जेष्ठ महिन्यात व श्री मंगळागौर ही श्रावण महिना पुजन करण्यात येते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या दोन श्रीमहालक्ष्मी कश्या या बद्दल श्री वेद वाड्मयत सुद्धा ‘नमो जेष्ठाच च कनिष्ठाय च’ ‘स्तेतानां पतये नमः’ अशी वचने आहेत. यावरून अनिष्ट गोष्टीबद्दल सुद्धा पूज्यभाव मनात बाळगणे, हे मानवाच्या आध्यात्मिक उन्नतीचे द्योतक असल्याचे दिसते.


मी समुद्र मंथन या लेखात सांगितल्या प्रमाणे मंथनातून श्रीमहालक्ष्मी आणि त्याची बहीण श्रीअलक्ष्मीचा जन्म झाला 

 श्रीमहालक्ष्मी म्हणजे(येणारे धन म्हणजे श्री महालक्ष्मी) आणि श्रीअलक्ष्मी(म्हणजे येणारे धन जो खर्च होतो त्या खर्चाला श्रीअलक्ष्मी) असे म्हणतात 


      याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहिण ‘अलक्ष्मी’ ही देखील पूजनीय आहे. या संदर्भातील प्राचीन आरण्यका अशी आहे. समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले. साक्षात श्रीविष्णूने श्रीलक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला. त्यावेळी आपल्या जेष्ठा भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही, असे श्रीलक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला. पण श्रीअल्क्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला. तेव्हा श्रीअलक्ष्मी अश्र्वत्थ(पिंपळाचे झाड) वृक्षा खाली रडत बसली.


तिथुन श्रीविष्णू जात असता त्यांनी तिला रडताना पाहिले. तिची हकिकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला तीन वरही दिले. पहिला वर, जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे. दुसरा वर, शनिवारी अश्र्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पिडा देऊ नये. तिसरा वर, दरवर्षी भाद्रपद महिन्यात जेष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल, असा होता. तेव्हापासून जेष्ठा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते. ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे. तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते. कारण श्रीअलक्ष्मी ही जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य वाहत्या पाण्यात असते.


या दोन गौरीमधील एक गौर म्हणजे लक्ष्मी घरातच असते. दुसरी बाहेरून आणतात तीच जेष्ठा गौर घरात आणताना तिचाही उल्लेख लक्ष्मी असाच केला जातो. यावेळी जमिनीवर रांगोळीने आठ पावले काढली जातात. प्रत्येक पावलावर थोडे थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उल्लेख केला जातो. यामध्ये अष्टलक्ष्मी चा समावेश असतो. श्रीलक्ष्मी आवाहन करण्याच्या अनेक पद्धती निरनिराळ्या प्रांतांनुसार प्रचलित आहेत. काही घरात चांदीच्या किंवा पितळ्याच्या किंवा मातीच्या मुखवट्यावर तर काही जणी सुघट (संक्रांत, घट, मातीचे भांडे), काही घरात वाहत्या पाण्याजवळच्या खड्यांवर तर काही जणी मूर्तीवर गौरीचेआवाहन करतात. काही प्रांतात गौरी म्हणजेच शंकराची पत्नी मानून पूजा करण्यात येते. तर काही ठिकाणी गौरीच्या वनस्पतीची रोपटी पूजेसाठी वापरतात. जेष्ठा गौरी म्हणजे माहेरी आलेली माहेरवाशीणच. या दिवशी सासूरवाशिणींना आपल्या माहेरी विशेष मान असतो. गौरी दिवशी घरी विशिष्ट प्रकारचे अन्न शिजवण्याची प्रथा आहे. त्यात प्रामुख्याने भाजी-भाकरीचा, ज्वारीच्या कण्याचा समावेश होतो. संध्याकाळी हळदीकुंकवाचा कार्यक्रम करून रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.


अष्टमीच्या दिवशी श्रीलक्ष्मी पूजन करून पुरणाचा नैवेद्य दाखविला जातो. जेष्ठा गौरी हे पार्वतीचेच विशिष्ट रूप मानले जाते. तिला वैराग्यलक्ष्मीच म्हणतात. लक्ष्मी प्राप्तीनंतर जो मद मस्त, जो अहंकार जोपासला जातो त्या सर्वांवरील उतारा म्हणजे ‘श्रीमहालक्ष्मी  व्रत’ असे मानतात.


श्रीमहालक्ष्मी पूजना इतकेच महत्व तिच्या विसर्जनाला आहे. श्रीमहालक्ष्मीचे विसर्जन मूळ नक्षत्रावर होणे आवश्यक आहे. कारण कोणत्याही गोष्टीचा त्याग मूळ नक्षत्रावर केल्यास त्या गोष्टी पुन्हा वाढीस लागत नाहीत, असे मानतात. विसर्जनाच्यावेळी दहीभाताचा नैवैद्य केला जातो. यावेळी या देवतेवर अक्षता वाहून तिला निरोप दिला जातो..


प्रथेचा प्रारंभ आणि इतिहास


 गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे. अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाते असे सांगितले आहे.

ज्योतिष आकाश नारायणराव पुराणिक 


पुजन माहिती....


श्रीमहालक्ष्मीचे आवाहन:-


श्रीमहालक्ष्मी चे मुखवटे त्यांच्या मुलांसह सर्वप्रथम सिंहदार प्रवेश दार तुन अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ ठेवले जातात. तिथून त्यांना वाजतगाजत घरात आणलं जातं. आणि यावेळी शिण रीमहालक्ष्मी घरात आणताना घरात सर्वत्र प्रकाशमय करूण आणवे.


देवघरात देवापुढे ठेवून त्यांना नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतर त्यांना स्टँडवर किंवा मडक्यांची उतरंड रचून उभं केलं जातं. श्रीमहालक्ष्मीचे मुखवटे हे प्रामुख्याने प्लॉस्टर ऑफ पॅरीसचे पाहायला मिळतात. त्याचबरोबर काही ठिकाणी ते पितळेचे असतात तर काही ठिकाणी ते  कणकेचेदेखील बनविलेले असतात . श्रीमहालक्ष्मीना साडी नेसविली जाते. त्याचबरोबर त्यांना दागदागिने चढविले जातात.


श्रीमहालक्ष्मी ज्या मखरात उभ्या केल्या जातात तो सजवून श्रीलक्ष्मी  च्यापुढे त्यांचा संसार मांडला जातो. शिवाय त्यांच्यापुढे अनेक धान्याच्या राशी मांडलेल्या असतात. 


श्रीमहालक्ष्मी पुजन माहिती 


दिनांक ११/०९/२०२४ रोजी बुधवार भाद्रपद शुक्ल पक्ष अष्ठमीला बलवान ज्येष्ठा नक्षत्रावर दुसर्‍या दिवशी बलवान ज्येष्ठा नक्षत्रावर


आपल्या घराण्याच्या प्रथेनुसार कोणा कडे सकाळी, दुपारी,

किवा संध्याकाळी किवा रात्री महापुजन करतात  यात पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळतात, हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात तर नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबीरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा मोठा समारंभ केला जातो.

तिसर्‍या दिवशी तिला खीर-कानवल्याचा( करंजीचा प्रकार मुरड घालुन करतात, मुरडून परत यावी म्हणून) नैवेद्य दाखवुन तिची पाठवणी (विसर्जन) करतात.

अश्याप्रकारे ही माहेरवाशीण येते, राहाते, आणि डोळ्यात पाणी आठवण म्हणून ठेवते पणं परत येण्याचे वचन मात्र देऊन जाते. 


श्रीमहालक्ष्मीची कहाणी


आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढं एके दिवशी काय झालं? भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी श्रीमहालक्ष्मी  आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई, आई, आपल्या घरी श्रीलक्ष्मी आण! आई म्हणाली, बाळांनो, श्रीलक्ष्मी  आणून काय करू? तिची पूजा-अर्चा केली पाहिजे, घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही तुमच्या वडिलांजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे श्रीलक्ष्मी आणीन! मुलं तिथून उठली, वडिलांकडे आली. बाबा बाबा, बाजारात जा. घावनघाटल्याचं सामान आणा. म्हणजे आई श्रीलक्ष्मी आणेल!


वडिलांनी घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दु:खी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही. गरिबांपुढे उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्‍चय केला. अर्ध्या वाटेवर गेला, इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं.


बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्या बाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवर्‍यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि अंबिलाकरता कण्या पाहू लागली. तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवर्‍याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली, सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळी जणं आनंदानं निजली.


सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला, मुला मला न्हाऊ घालायला सांग, म्हणून म्हणाली, घावनघाटलं देवाला कर. नाही काही म्हणू नको, रंड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला बायकोला हाक मारली, अगं, अगं, ऐकलंस का, आजीबाईला न्हाऊ घाल, असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलंबाळंसुद्धा पोटभर जेवली.


म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी आजी दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितक्या गाईम्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाईम्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्याचं दूध काढ! ब्राह्मणानं तसं केलं, गाईम्हशींना हाका मारल्या (त्या) वासरांना घेऊन धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाईम्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं. दुसर्‍या दिवशी खीर केली.


संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला, मुला मला आता पोचती कर! ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी, तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचती कसे करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल? म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठालक्ष्मी  म्हणतात ती मीच! मला आज पोचती कर! ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग! 


श्रीमहालक्ष्मी नं सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती सार्‍या घरभर टाक, हांड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. श्रीमहालक्ष्मी आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. दोन खडे घरी आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. ज्येष्ठा महालक्ष्मी  व कनिष्ठाअलक्ष्मी म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावनगोड तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीला जेवू घालावं. तिची ओटी भरावी. संध्याकाळी हळदीकुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षयसुख मिळेल. संतती, संपत्ती मिळेल. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण.....


स्त्रीचं मन नेहमी स्वत:च्या कुटुंबाशी जोडलेलं असतं. घराची भरभराट व्हावी घरात नेहमी सुखसमृद्धी नांदावी, आपल्या माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव असते त्यामुळेच हे सणवार, व्रतवैकल्ये ती मोठ्या उत्साहाने, श्रद्धेने व मनोभावे करते.


विसर्जन करण्याचे मुहूर्त:-


दिनांक १२/०९/२०२४ रोजी गुरूवार भाद्रपद शुक्ल पक्ष नवमीला रात्री ०९ः५६ मी पर्यंतच्या आत बलवान मूळ नक्षत्रावर विसर्जन करावे 

बलवान मूळ नक्षत्रावर विसर्जन करावे 


विसर्जन वेळ:-

मूळ नक्षत्र समाप्ती रात्री ०९ः५६ मी  पर्यंतच्या आत पर्यंत आहे


संध्या:-०७:११ ते ०८:०० मी पर्यंत(अमृत)


या शुभ मुहूर्तावर अक्षदा वाहून श्रीमहालक्ष्मी हालवु 

ठेवावे नंतर संध्याकाळी हाळदी-कुंकुम झाल्यावर रात्री आपण

विसर्जन करावे




थोडे नवीन जरा जुने