नमस्कार त्या सूर्यनारायणासी | श्रीसूर्यस्तुति

जयाच्या रथा एकची चक्र पाही ।

नसे भूमि आकाश आधार काही ।

असे सारथी पांगुळा ज्या रथासी ।

नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ १ ॥


करी पद्म माथां किरीटी झळाळी । 

प्रभा कुडलांची शरीरा निराळी ।

पहा रश्मि ज्याची त्रिलोकासि कैसी ।

नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ २ ॥


सहस्त्रद्वये दोनशें आणि दोन ।

क्रमी योजनें जो निमिषार्धतेन ।

मना कल्पवेनाजयाच्या त्वरेसी ।

नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ३ ॥


विधिवेद कर्मासि आधारकर्ता ।

स्वधाकार स्वाहादि सर्वत्र भोक्ता ।

असे अन्नदाता समस्तां जनासी । 

नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ४ ॥


युगे मंत्र कल्पांत ज्याचेनि होती ।

हरिब्रह्मरुद्रादि ज्या बोलिजेती ।

क्षयाती महाकाळरुप प्रकाशी ।

नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ५ ॥


शशी तारका गोवुनी जो ग्रहातें ।

त्वरें मेरु वेष्टोनिया पूर्वपंथे ।

भ्रमे जो सदा लोक रक्षावयासी ।

नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ६ ॥


समस्तां सुरांमाजि तूं जाण चर्या ।

म्हणोनीच तूं श्रेष्ठ तया नाम सूर्या ।

दुजा देव तो दाखवी स्वप्रकाशी ।

नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ७ ॥


महामोह तो अंधकारासि नाशी ।

प्रभा शुद्ध सत्वाचि अज्ञान नाशी । 

अनाथां कृपा जो करी नित्य ऐसी ।

नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ८ ॥


कृपा ज्यावरी होय त्या भास्कराची ।

न पाहूं शके शत्रु त्याला विरंची ।

उभ्या राहती सिद्धी होऊनि दासी ।

नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ९ ॥


फळे चंदनें आणि पुष्पें करोनी ।

पुजावे बरे एकनिष्ठा धरोनीं ।

मनीं इच्छिले पाविजे त्या सुखासी । 

नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ १० ॥


नमस्कार साष्टांग बापा स्वभावें । 

करोनी तया भास्करालागिं घ्यावें ।

दरिद्रें सहस्त्रादि जो क्लेश नाशी ।

नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ११ ॥


वरी सूर्य आदित्य मित्रादि भानू ।

विवस्वान इत्यादिही पादरेणू ।

सदा वांच्छिती पूज्य ते शंकरासी ।

नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ १२ ॥

॥ इति श्रीसूर्यस्तुति ॥
थोडे नवीन जरा जुने