स्नानहीन राहणे हा शास्त्रदृष्ट्या मोठा दोष आहे, पण काही वेळा प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे, काही वेळा प्रवासात असल्यामुळे, तर काही वेळा स्नानासाठी जलाचा अभाव असल्यामुळे मुख्य स्नान करणे अशक्य होते. अशा वेळी शास्त्राने गौणस्नानाचा पर्याय सांगितलेला आहे. मुख्यस्नानाखालोखाल गौणस्नानास महत्त्व आहे.
मंत्रस्नान, गायत्र्यस्नान, आग्नेयस्नान, कापिलस्नान असे गौणस्नानाचे चार प्रकार आहेत. त्यानुसार
१) मंत्रस्नान- 'आपो हि ष्ठा०' ह्या मंत्राचे पठन करत अंगावर पाणी प्रोक्षण करणे,
२) गायत्र्यस्नान गायत्री मंत्राने अभिमंत्रित केलेल्या जलाने अंगावर प्रोक्षण करणे,
३) आग्नेयस्नान / भस्मस्नान - 'अग्निरिति०' इत्यादी मंत्र म्हणून भस्मधारणविधीने सर्वांगास भस्मलेपन करणे,
४) कटिस्नान / कापिलस्नान - अंग कमरेपर्यंत स्वच्छ धुऊन ओल्या वस्त्राने पुसून घेणे व तेच ओले वस्त्र नेसून पुन्हा नंतर धूतवस्त्र नेसणे, ही सर्वप्रचलित गौणस्नाने होत. ह्यांपैकी भस्मस्नान व मंत्रस्नान ह्यांचा समावेश नित्यसंध्येमध्ये केलेला आहे.
ह्याखेरीज; तीर्थस्नान- देवमूर्तीचे (शालग्रामचे) तीर्थ, पूजनीय व्यक्तींच्या चरणांचे तीर्थ त्याचप्रमाणे तुलसी, बिल्व, दूर्वा, दर्भ इत्यादी वृक्षांच्या संपर्काने तयार केलेले तीर्थ अंगावर प्रोक्षण करणे; मानसस्नान (विष्णुस्नान) – विष्णुध्यान करत आत्मचिंतन करणे; - वायुस्नान - वाऱ्याच्या झुळुकीमध्ये थोडा वेळ बसून राहणे; सौरस्नान सूर्यप्रकाशात - बसून सर्वांगावर सूर्यप्रकाश घेणे; दिव्यस्नान - सूर्यकिरण असताना पावसात भिजणे; वायव्यस्नान - गायीच्या खुराखालील धूळ लावून घेणे; मृत्तिकास्नान - शुद्ध मृत्तिका अंगास लावणे, वारुणस्नान- पाण्यामध्ये डुबकी मारणे; हे गौणस्नानाचे अन्य प्रकार होत.
हिमालयातील अमरनाथ, मानससरोवर इत्यादी यात्रांमध्ये मुख्यस्नानाच्या अभावी कित्येक दिवस गौणस्नान करणेच भाग पडते. प्रकृतिस्वास्थ्य नसेल तर संध्यावैश्वदेवादी नित्यकर्मासाठी गौणस्नान केले तरी चालते. तथापि नैमित्तिक व्रतपूजा व श्राद्धासाठी मात्र नेहमीचे स्नान करावे.