शास्त्रोक्त स्नानविधी

मानवी शरीर जणू त्वचारूपी जाळीदार वस्त्राने झाकलेले आहे. ही जाळी म्हणजेच त्वचेवर असलेली रंध्रे होत. ह्या रंध्रांमधूनच घामाचे उत्सर्जन होऊन शरीराचे योग्य ते तापमान राखले जाते. पण त्याचबरोबर शरीरातील निरुपयोगी द्रव्ये घामाच्या रूपाने व इतर द्रव्ये तैलरूपाने उत्सर्जित होत असतात. घामातील पाण्याची वाफ झाल्यावर ही सर्व द्रव्ये मलरूपाने त्वचेवर साठून राहतात व शरीरास मरगळ निर्माण करतात. योग्य वेळी त्यांचा निचरा झाला नाही, तर प्रकृतिस्वास्थ्य बिघडल्यावाचून राहणार नाही. ह्यास्तव दररोज स्नान करणे अत्यावश्यक आहे. रोज स्नान केल्यास त्वचा स्वच्छ राहते, तिच्या ठायी प्राणवायू आकर्षून घेण्याची शक्ती येते, शरीराचे रुधिराभिसरण उत्तम चालते व स्नायूंची शिथिलता जाऊन प्रसन्न वाटते.

रक्ताभिसरणाचा वेग हा स्नानोत्तर त्वचेकडे, तर भोजनोत्तर पचनसंस्थेकडे वाढत असतो. म्हणूनच जेवण झाल्यावर, • थंडीच्या दिवसात जास्त थंडी वाजते व उन्हाळ्याच्या दिवसात जास्त उकडते. भोजनोत्तर लगोलग स्नान केल्यास त्वचेकडे रक्ताभिसरण वाढून त्याचा विपरीत परिणाम पचनसंस्थेवर होतो. हा परिणाम बहुतेकांच्या बाबतीत विविध त्वचारोगांच्या रूपाने दिसून येतो. त्यामुळे भोजनानंतर लगोलग स्नान करू नये.

नित्य, नैमित्तिक व काम्य असे स्नानाचे तीन प्रकार असून त्याविषयीचे शास्त्रसंकेत खालीलप्रमाणे होत.


१) नित्यस्नान - आरोग्यप्राप्ती व आह्निकसिद्धी ह्यांसाठी नित्यस्नान केले जाते. नित्यस्नान हे नदी, देवनिर्मित जलाशय इत्यादी ठिकाणी होणे हा उत्तमपक्ष होय. उपरोक्त ठिकाणी जर नित्यस्नान करण्याचे भाग्य लाभत असेल तर, दररोज स्नानापूर्वी आचमन व संकल्प; आणि स्नानामध्ये मार्जन, अघमर्षण व तर्पण हे विधी अवश्य करावेत. हा सर्व विधी पुढे काम्यस्नान ह्या सदरात दिलेला आहे. तथापि, प्रत्येक ठिकाणी नदी किंवा जलाशय असेलच असे नाही. असेल तरी त्या ठिकाणी दररोज स्नान करणे सोयीस्कर होईलच असेही नाही. अशा वेळी शास्त्राने गृहस्नानाचा पर्याय दिलेला आहे.

'गृहस्नान' म्हणजे घरी करावयाचे स्नान. 


'उषस्युषसि यत् स्नानं नित्यमेवारुणोदये। 

प्राजापत्येन तत् तुल्यं महापातकनाशनम् ।।' 


ह्या दक्षस्मृतिमधील वचनानुसार. अरुणोदयकाली स्नान करावे. 'अरुण' हा सूर्यरथाचा सारथी असल्यामुळे पूर्वेस सूर्याचे आगमन होण्यापूर्वी सुमारे तीन घटिका (७२ मिनिटे) तांबूस छटेच्या रूपाने प्रथम अरुणोदय होतो. ह्या वेळी स्नान करणे शक्य झाले नाही तरी कमीतकमी सूर्योदयापूर्वी तरी अवश्य स्नान करावे. ग्रीष्मऋतूत सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तापूर्वी असे दोनदा स्नान करावे. वेदपठण, जप, प्राणायाम, योगाभ्यास, उपवास ह्या गोष्टी जास्त प्रमाणात होत असतील तर सकाळ-संध्याकाळ असे दोनदा शीतोदकाने अवश्य स्नान करावे. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णतेचा निचरा होतो. विशिष्ट नैमित्तिक कारणांखेरीज रात्री स्नान करण्यास शास्त्राचा निषेध आहे. ही विशिष्ट कारणे पुढे नैमित्तिकस्नानात दिलेली आहेत.

सकाळी स्नानापूर्वी मर्दनपूर्वक तैलाभ्यंग केले असता स्नायूंना पुष्टता येते. तथापि अभ्यंगस्नान हे दररोज न करता ठरावीक दिवशीच करावे. अभ्यंगस्नान करण्यासाठी श्राद्धतिथी वर्ज्य करून तृतीया व पंचमी ह्या तिथी; सोमवार, बुधवार व शनिवार हे दिवस सर्वांना प्रशस्त आहेत. व्रते, उत्सव तसेच यज्ञ, याग, धार्मिक कृत्ये इत्यादी प्रसंगी शास्त्राने आवर्जून अभ्यंगस्नान करावयास सांगितलेले असेल, तर त्या वेळी उपरोक्त वार-नक्षत्रे पाहू नयेत. अभ्यंगाने वात, कफ व श्रम ह्यांचा परिहार होतो आणि कांती, स्वास्थ्य, निद्रा, मृदुत्व व दीर्घायुष्य प्राप्त होते. देशाचार व ऋतुमान ह्यांनुसार अभ्यंगासाठी खोबऱ्याचे, तिळाचे, मोहरीचे, शतावरीचे वा माक्याचे इत्यादी पथ्यकर तेल घ्यावे.

घरी स्नानासाठी थंड पाणी घेणे हा उत्तम पक्ष होय. तथापि ऋतुमान व प्रकृतिमान ह्यांनुसार उष्णोदक घ्यावे. स्नानासाठी शक्यतो तांब्याचे घंगाळे किंवा पितळी धातुपात्र घ्यावे. कारण स्नानविधीमध्ये, जलाच्या ठिकाणी गंगादी नद्या अवतीर्ण झालेल्या असून त्या तीर्थराजामध्ये आपण स्नान करत आहोत अशी भावना करावयाची असते. त्यामुळे ह्या तीर्थराजासाठी लोखंड (स्टील), प्लॅस्टिक ह्यांची पात्रे शक्यतो टाळावीत. उष्णोदकाने स्नान करावयाचे असल्यास स्नानपात्रामध्ये प्रथम शीतोदक घालून त्यावर उष्णोदक घालावे. घरात स्नान करताना आपले मुख प्रातःकाळी पूर्वेस व सायंकाळी पश्चिमेस करावे. घराबाहेर अंगणात स्नान करताना आपले मुख घराकडे करावे.

स्नानास प्रारंभ करताना प्रथम हातपाय धुऊन तीन चुळा भराव्यात. नंतर 'मम कायिक- वाचिक - मानसिकादि - सकलपापक्षयपूर्वकं कर्माधिकारसिद्धिद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं शीतोदकेन (/उष्णोदकेन) गृहे प्रातः स्नानं ( / मध्याह्नस्नानं / सायंस्नानं) अहं करिष्ये।।' असा संकल्प करावा. नंतर 


'आपो नारायणोद्भूतास्ता एवास्यायनं पुनः 

तस्मान्नारायणं देवं स्नानकाले स्मराम्यहम् ।। 

त्वं राजा सर्वतीर्थानां त्वमेव जगतः पिता 

याचितं देहि मे तीर्थं तीर्थराज नमोऽस्तु ते ।। 

नमामि गंगे तव  पादपंकजं सुरासुरैर्वंदितदिव्यरूपम् 

भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणाम् ।।

पुष्कराद्यानि तीर्थानि गंगाद्याः सरितस्त । 

आगच्छंतु पवित्राणि स्नानकाले सदा मम ।। 

गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति । 

नर्मदे सिंधु कावेर जलेऽस्मिन् संनिधिं कुरु ।।' 


अशी तीर्थप्रार्थना करावी व गंगादी नद्यांचे स्मरण करून स्नानास प्रारंभ करावा. पुरुषांनी सशिरस्क (मस्तकावरून) स्नान करावे. तथापि, कढत पाणी एकदम मस्तकावरून कधीही घेऊ नये. स्त्रिया, कुमारिका व रुग्ण ह्यांनी आकंठ (गळ्याखालून) स्नान करावे. अशा प्रकारे नित्यस्नानविधी संपन्न होतो...


वस्त्रधारण – ह्यानंतर अंग न पुसता कोरडे वस्त्र परिधान करून ओले वस्त्र वरच्या वर काढून घ्यावे. ओले वस्त्र खाली सोडणे शास्त्रनिषिद्ध आहे. ओले वस्त्र पिळून घ्यावे. पिळलेले वस्त्र खांद्यावर घेऊ नये. अर्थात, उपरण्यासारखे वस्त्र नेसून जर स्नान केले तरच उपरोक्त शास्त्रसंकेतांचे पालन करता येते. धर्मकार्यासाठी द्विजत्रयांनी अनुक्रमे शुभ्र, लालसर व पिवळसर वर्णाचे, तर द्विजेतरांनी निळसर वर्णाचे वस्त्र घ्यावे. हे वस्त्र 'अहत' असावे, म्हणजेच न जळलेले, न फाटलेले, न शिवलेले व न गाठी मारलेले असावे. तसेच ते दुसऱ्याने वापरलेले नसावे. तसेच ते वस्त्र शक्यतो स्वतः धुतलेले असावे. कोणतेही वस्त्र नेसताना दक्षिणेस किंवा पश्चिमेस उलगडून नेसू नये. नाभीजवळ, किंचित डावीकडे व पाठीमागे असे त्रिकच्छ पद्धतीने वस्त्रधारण करावे. वस्त्रधारणानंतर उत्तरीय परिधान करावे. तथापि, पिता व ज्येष्ठ बंधू हयात असल्यास उत्तरीय (उपरणे) घेऊ नये.


२) नैमित्तिकस्नान - पुत्रादिजन्मकाल, मृतदिवस, श्राद्धदिवस, स्पर्शास अयोग्य अशा वस्तूचा स्पर्श, श्मशानप्रवेश, निकटच्या नात्यातील निधनवार्ताश्रवण, क्षौर इत्यादी निमित्तांनी जे स्नान घडते ते नैमित्तिकस्नान होय. नैमित्तिकस्नान (क्षौराचा अपवाद वगळता) हे त्या-त्या निमित्तांनुसार दिवसा किंवा रात्री केले तरी चालते. उपरोक्त प्रसंगी शक्यतो शीतोदकाने स्नान करावे. श्मशानप्रवेश, क्षौर इत्यादी प्रसंगी सचैल (अंगावरील कपडे भिजवून) स्नान करावे. त्याचप्रमाणे यात्रा (प्रवास), शरीरास पीड़ा (अंगाची लाहीलाही होणे) अशा निमित्ताने दिवसा किंवा रात्री नैमित्तिकस्नान करता येते.


३) काम्यस्नान ग्रहण, संक्रांती, पर्वकाल, तीर्थयात्रा इत्यादी निमित्तांनी करावयाचे ते काम्यस्नान होय. हे स्नान शक्यतो नद्यादी तीर्थामध्ये करावे. मंगळवार ह्या दिवशी समुद्रस्नान करू नये. सूर्योदयापूर्वी नक्षत्रदर्शन होत आहे अशा वेळी केलेले स्नान उत्तम, सूर्योदयापर्यंत मध्यम, तर सूर्योदयानंतर कनिष्ठ होय. ग्रहणादी प्रसंगी स्पर्शमोक्षादि - कालानुसार पर्वस्नान करावे. नद्यादी ठिकाणी पर्वस्नान करणे शक्य झाले नाही तर घरीच पण शक्यतो शीतोदकाने संकल्पोक्त स्नान करावे.

विविध काम्यस्नानांमध्ये वैशाखस्नान, कार्तिकस्नान, माघस्नान ह्यांना विशेष महत्त्व आहे. त्यानुसार वैशाखस्नान हे चैत्र पौर्णिमा ते वैशाख पौर्णिमा, कार्तिकस्नान हे आश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा, माघस्नान हे पौष पौर्णिमा ते माघ पौर्णिमा असे असून महिनाभर दररोज विधिपूर्वक हे स्नान करावयाचे असते. संपूर्ण महिनाभर जर स्नान करणे शक्य नसेल तर किमान त्या-त्या मासातील पर्वकाळी, तेही शक्य न झाल्यास शेवटी पौर्णिमेला एक दिवस तरी ही स्नाने अवश्य करावीत. ह्या स्नानांचा विधी, देवता, संकल्प इत्यादी गोष्टी विस्तरभयास्तव येथे न देता 'व्रतवैकल्ये' संदर्भातील अन्य ग्रंथात दिलेल्या आहेत. ह्या ग्रंथात, तीर्थस्थानी गेल्यावर करावयाचा किमान स्नानविधी दिलेला आहे.

नद्यादी तीर्थाप्रत गेल्यावर तीर्थात पूर्वाभिमुख उभे राहून किंवा पाणी कमी असल्यास खाली बसून प्रथम शिखाबंधन करावे. नंतर तीर्थातील किंचित जल आपल्या अंगावर प्रोक्षण करून आचमन करावे व 


'तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च । 

योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत् ।।' 


असा संक्षिप्त देशकालोच्चार करावा. त्यानंतर 'मम अनेकजन्मार्जित-महापातकादि- समस्तदुरितक्षयद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं.... ( नद्यां / तडागे/कुंडे) स्नानमहं करिष्ये ।।' असा संकल्प करावा व नित्यस्नानातील 'आपो नारायण०' इत्यादी मंत्रांनी तीर्थप्रार्थना करून तीर्थास नमस्कार करावा. (गंगेच्या ठिकाणी गंगेखेरीज इतर तीर्थांचे नामोच्चारण करू नये.) नंतर पूर्वाभिमुख किंवा प्रवाहसंमुख होऊन तीन वेळा बुडी मारावी व सर्वांगाचे प्रक्षालन करावे. त्यानंतर दोन वेळा आचमन करून 'आपो हि ष्ठा०' इत्यादी मंत्रांनी मार्जन व 'ऋतं च०' इत्यादी मंत्रांनी अघमर्षण झाल्यावर खालील स्नानागतर्पण करावे. घरी काम्यस्नान करताना हे स्नानांगतर्पण करू नये.

स्नानांग तर्पण तीर्थकुंड, नदी व समुद्र इत्यादी महापुण्यकारक तीर्थांमध्ये स्नान - केल्यास देव, ऋषी आणि पितर ह्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी व त्यांतून अंशतः मुक्त होण्यासाठी भूः भुवः स्वः ह्या व्याहृतींनी युक्त अशी देवांची, ऋषींची व पितृदेवतांची नावे घेऊन सव्याने देवतीर्थावरून देवांस एकदा, नीवितीने ऋषितीर्थावरून ऋषींना दोनदा व अपसव्याने पितृतीर्थावरून पितरांना तीनदा उदकाने तर्पण करावे. तर्पणविधी ज्ञात नसल्यास वरील सर्वांचे स्मरण करून गायीच्या शिंगाइतक्या उंचीवरून ओंजळीतील पाणी तीर्थात सोडून जलांजली द्यावी असे यमस्मृती सांगते. ह्यानंतर, आपल्या शरीरावरील मलाने तीर्थातील पाणी दूषित झाल्यामुळे तद्दोषपरिहारार्थ


'यन्मया दूषितं तोयं शारीरमलसंभवात 

तत्दोषपरिहारार्थं यक्ष्माणं तर्पयाम्यहम् ।।' 


हा मंत्र म्हणून पाणी ओंजळीतून खाली सोडावे. नंतर यथाविधि वस्त्रांतर व वस्त्रधारण करावे. अशा प्रकारे शास्त्राने विविध स्नानविधी सांगितलेले आहेत.

थोडे नवीन जरा जुने