आचमन व आचमनाचे शास्त्रीय स्वरूप

आचमन हे सर्व काम्य, नित्य व निष्काम कर्मांचे एक अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्यशास्त्रदृष्ट्याही आचमनाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. पेलाभर पाणी एकदम पिण्यापेक्षा तेच पाणी थोडेथोडेसे घेत राहिल्यास ते पाणी व्याधिनाशक व अमृतोपम होते. चमच्याने थोडेथोडे पाणी घेणे शरीरास अत्यंत हितावह असते हे संशोधनाअंती सिद्ध झालेले आहे. मुखातील तालुप्रदेश शुष्क होऊन उचकी लागली, तर आचमनाद्वारे ती थांबते. ज्वरादी शारीरिक व्याधींनी ग्रस्त असता आचमन केल्याप्रमाणे शुद्ध पाणी प्राशन केल्यास प्रकृतीस आराम पडतो.

आचमनाबाबत ‘त्रिः पिबेदापो गोकर्णवद् हस्तेन त्रिराचमेत् ।।' असे शास्त्रवचन आहे. आचमनासाठी उजव्या हाताची गोकर्णमुद्रा करावी. ही मुद्रा करताना तर्जनीच्या तळाशी पृष्ठभागावर अंगठ्याने दाब द्यावा. त्यानंतर तर्जनीवर मध्यमा, मध्यमेवर अनामिका व अनामिकेवर कनिष्ठिका अशा रितीने ठेवत जावे की, हाताचा आकार गायीच्या कानाप्रमाणे होईल. आचमनासाठी आत्मतीर्थाचा उपयोग करतात. तळहाताच्या मनगटाजवळील भागाचा मध्य म्हणजे आत्मतीर्थ (ब्राह्मतीर्थ ) होय. तेथे ओठ टेकवून तळहातातील पाणी ग्रहण करण्याच्या क्रियेस 'आचमन' म्हणतात. सामान्यतः अशा प्रकारे तीन वेळा पाणी प्राशन केले जाते.

आचमनाविषयी स्मृतिग्रंथात 'प्रथमं यत् पिबति, तेन ऋग्वेदं प्रीणाति यद् द्वितीयं तेन यजुर्वेदं प्रीणाति यत् तृतीयं तेन सामवेदं प्रीणाति ।।' असे वचन आहे. ह्यावरून असे मानले जाते की, प्रत्येक आचमनाच्या वेळी एकेका वेदाची तृप्ती होते. म्हणूनच कोणत्याही धार्मिक कार्याचा प्रारंभ व समाप्ती आचमन करून होते. एवढेच काय पण श्मशानातील और्ध्वदेहिकादी कर्माचा प्रारंभदेखील आचमनानेच होतो. आचमनाखेरीज केलेले कोणतेही कर्म निष्फळ होते. धर्मकार्याच्या वेळी केशवादी नामांनी किंवा आपापल्या
परंपरेनुसार नामोच्चारण करून आचमन करावे. सामान्यतः संध्या, भोजन, जप, होम, दान

व प्रतिग्रह इत्यादी कर्माच्या प्रारंभी व अंती असे प्रत्येक वेळी दोनदा आचमन करावे.

धर्मकार्यांखेरीज इतर कोणकोणत्या प्रसंगी आचमन करणे आवश्यक आहे ह्याविषयी शास्त्र सांगते की - 'झोपून उठल्यावर, शौचोत्तर हात-पाय धुतल्यावर, शिंक-जांभई - ढेकर आल्यावर, उसका उचकी लागल्यावर, थुंकल्यावर, नाक शिंकरल्यावर, स्नानापूर्वी व स्नानानंतर, अल्पोपाहाराच्या पूर्वी व नंतर, अपानवायू सरकल्यावर व दातामध्ये अडकलेले अन्नकण मुखात आले असता शुद्धाचमन करावे. शुद्धाचमन म्हणजे कोणताही मंत्रोच्चार न करता केवळ शुद्ध जलाने आचमन करणे होय. ह्याखेरीज वेदाध्ययनानंतर, धास्तीने असत्यभाषण घडल्यास, बीभत्सदर्शन घडल्यास अवश्य आचमन करावे.

आचमनाची उपरोक्त निमित्ते लक्षात घेतल्यास असे दिसून येईल की, ज्या-ज्या प्रसंगी शरीरातील दशविध प्राणांपैकी एक किंवा अधिक प्राणांच्या शक्तीचा व्यय होतो; त्या-त्या वेळी संबंधित इंद्रियास किंवा इंद्रियद्वारास शुष्कता येणे, उष्णता वाढणे किंवा मलिनता येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. अन्नग्रहण, पचन, विरेचन आणि विसर्जन ह्या क्रियांच्या बाबतीत प्राणाचे स्थान अनन्यसाधारण असते. आचमनाद्वारे जलप्राशन करताना ओठांची रचना चोचीप्रमाणे होत असल्यामुळे अनायासे शीतली प्राणायाम होत असतो. त्यामुळे अशा वेळी आचमन केल्यास प्राणशक्तीचा व्यय भरून येतो. कर्मारंभी आचमन केल्यास कर्मासाठी आवश्यक असणाऱ्या प्राणशक्तीचा संचय होतो. त्यामुळे मनास व देहास प्रसन्नता येऊन ते कर्म उत्साहात पार पडते. कर्मांती आचमन केल्यामुळे प्राणशक्तीचा कर्मकाळात झालेला व्यय भरून येतो.

उपरोक्त प्रसंगी प्रत्येक वेळी जलाने आचमन करणे अव्यवहार्य व गैरसोयीचे असते. म्हणून शास्त्राने जलाचमनास श्रोत्राचमन हा पर्याय दिलेला आहे. श्रोत्राचमन म्हणजे उजव्या हाताने उजव्या कानास स्पर्श करणे. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ह्या पंचतत्त्वांपैकी आकाश हे परमोच्च व अतिशुद्ध तत्त्व आहे. ज्या वेळी पृथिव्यादी तत्त्वांची अनुपलब्धी असते त्या वेळी शुद्धीकरणासाठी आकाश हे तत्त्व घेतात. 'कर्ण' हे आकाश महाभूताचे बाह्यांग असल्यामुळे श्रोत्राचमनात उजव्या हाताने उजव्या कानास स्पर्श करतात. समाजात वावरताना श्रोत्राचमन करणे काही वेळा प्रशस्त वाटत नाही. अशा वेळी मनोमन 'विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमः ।।' असे म्हणून विष्णुस्मरण करणे हाही आचमनाचा एक प्रकार शास्त्रात सांगितलेला आहे. अशा आचमनास तूष्णी आचमन म्हणतात.
थोडे नवीन जरा जुने