नित्यकर्मामध्ये कोणकोणत्या विधियुक्त कर्माचा अंतर्भाव होतो ?

१} दिनारंभ - 'ब्राह्मे मुहूर्ते बुध्येत ।।'  ह्या शास्त्राज्ञेनुसार आपल्या दिनचर्येचा आरंभ पहाटे ब्राह्ममुहूर्तावर करावा. 'रात्रेः पश्चिमयामस्य मुहूर्तो यस्तृतीयकः स ब्राह्म इति विज्ञेयो विहितः स प्रबोधने ।।' अर्थात, रात्रीच्या अंतिम प्रहराच्या तिसऱ्या भागास ब्राह्ममुहूर्त अशी संज्ञा आहे. सूर्योदयापूर्वी सुमारे पाच घटी (५ x २४ = १२० मिनिटे ) ब्राह्ममुहूर्त असतो. 


'वर्णं कीर्ती च लक्ष्मीं च स्वस्थमायुश्च विंदति 

ब्राह्मे मुहूर्ते संजाग्रच्छ्रियं वा पंकजं यथा ।।' 


ह्या शास्त्रवचनानुसार ब्राह्ममुहूर्तकाली निद्रात्याग करणाऱ्या व्यक्तीवर निसर्ग सौंदर्य, कीर्ती, बुद्धी, लक्ष्मी, स्वास्थ्य, आरोग्य व प्रसन्नता ह्यांची मुक्तहस्ताने खैरात करतो.

दिवसभरातील सर्व दैनंदिन व्यवहारांची सफलता अथवा असफलता प्रातःकालीन जागृतीनंतरच्या व्यवहारावर अवलंबून असते. नेमक्या ह्याच वेळी आळस करून निद्राधीन राहिल्यास नवजीवनाच्या निर्मितीचा स्फूर्तीपर संदेश आपल्यापर्यंत पोचत नाही.. परिणामतः, त्या दिवसाची गणना शून्यदिनात होऊ शकते. कारण प्रत्येक प्रभात ही आपल्यासाठी नवीन जीवनाचा प्रारंभ असते. चर व अचर सृष्टीस ब्राह्ममुहूर्तावर कार्यरत होण्यासाठी निसर्ग आपापल्या परीने साद घालत असतो. पशुपक्षी, प्राणी, वनस्पती, हवा, पाणी अशी समस्त चराचर सृष्टी त्यास प्रतिसाद देते. पण मानव मात्र स्वतःच्या मनाचा राजा असल्यामुळे तो बुद्धीच्या विरोधात जाऊन मनमानी करतो व बिछान्यातून घोरतच सूर्यनारायणाचे स्वागत करतो.

आयुर्वेददृष्ट्या ब्राह्ममुहूर्तकाली शरीरातील वातदोष प्रबल असतो. त्यामुळे ह्या कालावधीत कार्यरत झाल्यास उत्साह वाढतो, श्वसनक्रिया उत्तम राहते आणि शरीराच्या सर्व क्रिया सुनियंत्रित होण्यास मदत होते. शिवाय वातप्राबल्यामुळे मलमूत्रादी उत्सर्जनक्रिया उत्तम रितीने पार पडतात.

हल्लीच्या विद्यार्थिवर्गात रात्री बऱ्याच उशिरापर्यंत जागरण करून अभ्यास करण्याची एक जीवनशैली रूढ झालेली आहे. एरवी आहार-विहारादी अनेक गोष्टींत पाश्चिमात्य अनुकरणशील विद्यार्थिवर्गास ब्राह्ममुहूर्ताचे महत्त्व पाश्चात्त्यशैलीत पटवून द्यावयाचे झाल्यास 'Early to go bed, early to rise make a man healthy, wealthy and wise.' ह्या आंग्ल लोकोक्तीचा जरूर विचार करावा लागेल. त्यातील 'Early to rise' म्हणजेच ब्राह्ममुहूर्त होय. त्या वेळी उठून अभ्यास केला असता विद्याभ्यासास उपयुक्त असे ग्रहण (grasping), धारणा (memorization) व पुनःस्मरण (recollection) ही अंगे खचितच अधिकाधिक क्रियाशील होत जातात. पहाटे उठण्यास सुरुवातीस नाराज असणाऱ्या विद्यार्थ्यांस काही दिवसांत आपोआपच पहाटे उठण्याची आवड उत्पन्न होते.


२} करदर्शन – निद्रासमाप्तीनंतर शय्येवर बसून दोन्ही तळहात समोर धरून करदर्शन करावे. त्या वेळी 

‘कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती। 

करमूले तु गोविंदः प्रभाते करदर्शनम् ।।' 

हा मंत्र म्हणावा. त्यातील, 'लक्ष्मी' ही सर्व सुख प्रदान करते, 'सरस्वती' ही सर्व ज्ञान प्रदान करते, तर गोविंद (गो-इंद्रिये, विंद-जिंकणारा) हा इंद्रियांना काबूत ठेवतो. ह्या त्रयींच्या प्राप्तीसाठीच तर अखिल मनुष्यमात्रांचा खटाटोप चालू असतो. हा दररोजचा खटाटोप करताना, आपल्या हातावर देवतांचा निवास असतो ह्या भावनेतून आपल्या हातून कोणतेही दुष्कृत्य घडणार नाही ना? ह्याविषयी तो जागरूक राहतो. हाच मुख्य हेतू करदर्शनामागे असतो. आरोग्यशास्त्रानुसार, रात्रभर डोळ्यांना विश्रांती मिळाल्यामुळे ते तणावमुक्त झालेले आसतात. 

अशा वेळी त्यांच्यावर एकदम ताण टाकणे योग्य नसते. करदर्शनाच्या निमित्ताने सृष्टी व डोळे ह्यांच्यामध्ये तात्पुरता अडसर निर्माण होतो व मंत्र म्हणण्याच्या निमित्ताने डोळ्यांना कार्यप्रवण होण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. प्रातःस्मरण - करदर्शनानंतर हात जोडून आपापल्या परंपरेनुसार प्रातःस्मरण करावे, अथवा 

'आदित्यं गणनाथं च देवीं रुद्रं यथाक्रमम् । 

नारायणं विशुद्धाख्यमंते च कुलदेवताम् ।।' 

ह्या वचनानुसार सूर्य, गणपती, देवी, रुद्र, नारायण ह्यांचे यथाक्रम स्मरण करून शेवटी कुलदेवतेचे स्मरण करावे. तसेच खालील सर्वोपयोगी प्रातःस्मरण म्हणावे.


'पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिरः । 

पुण्यश्लोका च वैदेही पुण्यश्लोको जनार्दनः ।।१।। 

अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा। 

पंचकं ना स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।।२।।

 प्रह्लादनारदपराशर - पुंडरीक

व्यासांवरीष शुकशौनक भीष्मदाल्भ्यान् । 

रुक्मांगार्जुन वसिष्ठविभीषणादीन् 

पुण्यानिमान् परमभागवतान् नमामि ||३||

धर्मो विवर्धति युधिष्ठिरकीर्तनेन 

पापं प्रणश्यति वृकोदरकीर्तनेन । 

शत्रुर्विनश्यति धनंजयकीर्तनेन 

माद्रीसुतौ कथयतां न भवति रोगाः ||४|| 

अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका । 

पुरीद्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिकाः ||५|| 

मनुं स्मराम्यादिगुरुं प्रजानां भगीरथं धीरमुदग्रयत्नम् 

भूपं हरिचंद्रमभंगवाचं श्रीरामचंद्र रघुवंशसूर्यम् ||६|| 


अर्थ १) पुण्यवान नलराजा, पुण्यवान युधिष्ठिर, पुण्यवती सीता, पुण्यवान जनार्दन ह्यांचे मी स्मरण करतो. २) अहल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी ह्या पांच जणींचे स्मरण मनुष्याने केले असता महापापांचा नाश होतो. ३) प्रह्लाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीष, शुक, शौनक, भीष्म, दाल्भ्य, रुक्मांगद, अर्जुन, वसिष्ट व बिभीषण ह्या निष्ठावान भगवद्भक्तांना मी नमस्कार करतो. ४) युधिष्ठिराच्या नामोच्चाराने धर्मवृद्धी होते, भीमाच्या नामोच्चाराने पापनाश होतो, अर्जुनाच्या नामोच्चाराने शत्रुनाश होतो, सहदेव-नकुलांच्या नामोच्चाराने रोगराई होत नाही. ५) अयोध्या, मथुरा, माया (हरिद्वार), काशी, कांची, अवंती, द्वारका ही सात तीर्थक्षेत्रे मोक्षदायक आहेत. ६) अखिल मानवांचे आद्यगुरू मनू, प्रयत्नशील भगीरथ, सत्यवचनी राजा हरिश्चंद्र व रघुवंशाचा सूर्य श्रीरामचंद्र ह्यांचे मी स्मरण करतो. भूमिप्रार्थना शय्यात्याग करण्यापूर्वी मस्तक खाली टेकवून भूमातेस पुढील प्रार्थनामंत्राने वंदन करावे. 


'समुद्रवसने देवि पर्वतस्तनमंडले 

विष्णुपत्नि नमस्तुभ्यंपादस्पर्श क्षमस्व मे ।' 


'हे विष्णुपत्नी (भूमाते), समुद्राचे वस्त्र धारण करणाऱ्या व पर्वतरूपी स्तनांनी सुशोभित अशा तुला मी वंदन करतो. तुझ्यावरील माझ्या पदस्पर्शाची क्षमा कर.' त्यानंतर जमिनीवर प्रथम उजवे पाऊल ठेवून उठावे. आरोग्यशास्त्रदृष्ट्या, पाठीचा कणा रात्रभर एकाच अवस्थेत राहिलेला असतो. उपरोक्त भूमिप्रार्थनेच्या निमित्ताने बसलेल्या अवस्थेत मस्तक खाली टेकवले जाते. त्यामुळे त्यास योग्य व्यायाम घडून तो दिवसभराच्या हालचालींसाठी कार्यप्रवण होतो.

मंगलदर्शन प्रातःकाळी उठल्यानंतर जी वस्तू सर्वांत प्रथम पाहिली जाते तिचे कळत-नकळत स्मरण दिवसभर होत असते. जर ती वस्तू कल्याणकारी असेल, तर दिवसभर कल्याणकारी विचार मनात तरळतात. ह्यास्तव शय्या सोडल्यावर प्रथम कुणाचे दर्शन घ्यावे व घेऊ नये ह्या बाबतीत शास्त्रसंकेत असे आहेत - गोरोचन, चंदन, सुवर्ण, मृदंग, आरसा व रत्न; त्याचप्रमाणे आपली इष्टदेवता, वेदपाठी पुरुष, सुवासिनी, गाय, अग्नी, अग्निहोत्री किंवा याज्ञिक ह्यांचे दर्शन जो मनुष्य घेतो, त्यास कल्याणप्राप्ती होते. ह्याउलट, सकाळी उठल्यावर पापी पुरुष, कुलटा स्त्री, मद्य, नग्न पुरुष वा कुटाळक्या करणारा पुरुष ह्यांना जो मनुष्य पाहतो, तो दिवसभर निरुत्साही राहतो. परिणामतः, त्यास अपेक्षित यशः प्राप्ती होत नाही.


३}उषःपान – आयुर्वेदानुसार प्रातःकाळी शौचास जाण्यापूर्वी उत्तरेकडे मुख करून तीन श्वासांत एक पेला ह्याप्रमाणे आपणास शक्य होईल तेवढे जलप्राशन करावे. ह्यानंतर सुमारे ४५ मिनिटे कशाचेही सेवन करू नये. त्यामुळे आरोग्य, आयुष्य व मेधा ह्यांची प्राप्ती तर होतेच शिवाय आम्लपित्त, मलावरोध, मधुमेह, रक्तदाब, सांधेदुखी इत्यादी अनेक जुनाट रोगांस पायबंद बसतो.


४}शौचाचार – पारस्करादी विविध गृह्यसूत्रांमध्ये मूत्रपुरीषोत्सर्गांचा ऊहापोह केलेला केलेला आहे. त्यानुसार शौचास जाताना यज्ञोपवीत कंठलंबित करून उजव्या कानाभोवती मोकळ्या हवेमध्ये, मस्तकास वस्त्र लपेटून व शेंडीची गाठ सोडून, उत्तरेकडे (रात्री दक्षिणेकडे) मुख करून शौचविधी करणे हितावह असते. सूर्याकडे मुख करून शौचविधी करणे शास्त्रदृष्ट्या निषिद्ध आहे. तथापि शहरी संस्कृतीमध्ये उपरोक्त गोष्टी शक्य नसल्या तरी शौचालयाची किमान स्वच्छता एवढा तरी निकष असावा, जेणेकरून श्वासावाटे दूषित हवा शरीरात जाणार नाही. मलोत्सर्गानंतर मृत्तिका (किंवा जंतुघ्न साबण) हातास लावून त्यानंतर शुद्धी करावी. त्यामुळे आपल्या हाताचा मलाशी संपर्क न येता खन्या अर्थानि शुद्धी होते. ‘शौच’ ह्याचा अर्थ 'शुद्ध' असा असून 'शौचास जाणे' म्हणजे 'शुद्धी करणे' असा गर्भितार्थं आहे. शौचासाठी मृत्तिका वापरावयाची असेल तर ती प्रथम पाण्यात कालवून वस्त्रातून गाळून घ्यावी व निवळत ठेवावी. त्यानंतर वरील पाणी काढून टाकून त्या मृत्तिकेचा चिखल उन्हात वाळवावा. म्हणजे पाहिजे तशी वस्त्रगाळ मृत्तिका तयार होते. ती एका डब्यात भरून ठेवून तिचा उपयोग शौचासाठी करावा. उपरोक्त संपूर्ण शौचविधीदरम्यान मौन (मुख मिटलेले) असावे; बोलणे, थुंकणे इत्यादी क्रिया करू नयेत.

शौचविधीनंतर मृत्तिकादिकांनी नखे व बोटांमधील खाचा ह्यांच्यासह कोपरांपर्यंतचे हात स्वच्छ धुवावेत. त्यानंतर घोट्यांसह पाय गुडघ्यांपर्यंत धुवावेत, तसेच चेहरा स्वच्छ धुऊन आठ चुळा भराव्यात. नंतर यज्ञोपवीत नेहमीप्रमाणे करून आचमन किंवा श्रोत्राचमन (दक्षिणकर्णस्पर्श) करावे. शौचविधी व्यवस्थित झाल्यास दिवसभरातील कर्मांसाठी उत्साह व प्रसन्नता प्राप्त होते.


४}दंतधावन - बोर, करंज, औदुंबर, आंबा, आघाडा, चाफा, खैर किंवा निंब ह्यांपैकी एखाद्या वनस्पतीच्या काडीने (अन्यथा औषधियुक्त दंतमंजनाने) दंतधावन करावे. दंतधावनासाठी मध्यमेचा वापर करावा. कारण शास्त्रानुसार पितृकर्मासाठी तर्जनी, मनुष्यकर्मासाठी मध्यमा व देवकर्मासाठी अनामिका ह्यांची नियुक्ती असते. जिव्हानिर्लेखन (धातूच्या पट्टीने जीभ साफ करणे) हा विधीदेखील तितकाच महत्त्वपूर्ण आहे. दंतधावनामुळे दात व हिरड्या मजबूत होतात, तर निर्लेखनामुळे रसनेंद्रियांची शक्ती वाढून लालास्राव प्राकृत होतो.


५}व्यायाम - 'शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।।'- शरीर हे धर्माचरणाचे मूळ साधन असल्यामुळे त्यास कार्यक्षम ठेवण्यासाठी व्यायाम हेच एकमेव साधन आहे. भारतीय व्यायामपद्धतीमध्ये सूर्यनमस्कार व योगाभ्यास ह्यांस अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपापल्या क्षमतेनुसार विविधांगी व्यायाम करताना दररोज कमीतकमी बारा सूर्यनमस्कार घालणे व प्राणायामसाधना करणे आवश्यक आहे.


६}क्षौर (समग्र केशकर्तन) - आयुर्वेदात केस व नखे ह्यांना अस्थिधातूचा मल म्हटलेले आहे. ह्यास्तव त्यांच्यात होणाऱ्या वाढीचा वेळच्या वेळी निचरा होणे योग्य ठरते. केशकर्तनास निषिद्ध तिथी व वार ह्यांविषयी शास्त्रात विस्तृत ऊहापोह केलेला असून सारांश रितीने एकादशी, चतुर्दशी, पौर्णिमा व अमावस्या ह्या तिथी; व्यतीपातयोग, विष्टिकरण, संक्रांती ह्यांसारखे पर्वकाल, व्रतदिन, वर्धापनदिन, श्राद्धदिन; तसेच मंगळवार व शनिवार आणि पुत्रवंतांनी सोमवार हे दिवस केशकर्तनास वर्ज्य करावेत. श्मश्रूविषयी (दाढी करण्याविषयी) शास्त्रात सुस्पष्ट आदेश नसले तरी किमान एकादशी, अमावस्या, व्रतदिन, श्राद्धदिन, पुरश्चरणकाल व पर्वकाल ह्या काळांत श्मश्रूकर्म वर्ज्य करावे. मात्र राजकार्य (नोकरी-व्यवसाय) करणाऱ्या व्यक्तींना अत्यावश्यक असेल तर कोणत्याही दिवशी श्मश्रुकर्म करता येते. क्षौर अथवा श्मश्रू दिवसाच्या प्रथम किंवा द्वितीय प्रहरी भोजनापूर्वीच करावयाचे असून ह्या दोन्हीही कर्मानंतर स्नान करणे आवश्यक असते.



थोडे नवीन जरा जुने