आन्हिक कर्म ( नित्यकर्म )

नित्यनेमाने करावयाच्या कर्मांना 'आह्निक' अशी संज्ञा आहे. 'आह्निक' ह्या शब्दातील 'अहन्' म्हणजे दिवस. ह्यावरून व्युत्पत्तिशास्त्रदृष्ट्या 'आह्निक' म्हणजे "दिवसाशी संलग्न असणाऱ्या सर्व गोष्टी' असा अर्थ होतो. तथापि गौणार्थाने 'ब्राह्ममुहूर्तापासून मध्याह्नापर्यंत केली जाणारी विधियुक्त कर्मे' अशीच संकल्पना सर्वत्र रूढ आहे. सामान्यतः 


'संध्या स्नानं जपश्चैव देवतानां च पूजनम् 

वैश्वदेवं तथातिथ्यं षट् कर्माणि दिने दिने ।।' (बृहत्पराशरस्मृती) 


ह्या वचनानुसार संध्या, स्नान, जप, देवपूजा, वैश्वदेव व आतिथ्य ह्या सहा कर्मांना आह्निक अशी संज्ञा आहे. गृहस्थाच्या नित्यकर्माचे महत्त्व सांगताना सूत्रग्रंथ म्हणतात की, 


'अथोच्यते गृहस्थस्य नित्यकर्म यथाविधि 

यत् कृत्वानृण्यमाप्नोति दैवात् पैत्र्याच्च मानुषात् ।।  


अर्थात, शास्त्रविधीनुसार केलेल्या नित्यकर्मामुळे मनुष्य हा; देव, पितृ व मानव ह्यांच्या ऋणातून मुक्त होतो.' ज्याप्रमाणे शरीरातील श्वासोच्छ्वासादी नियत क्रिया शरीरधारणेस उपयुक्त ठरतात त्याप्रमाणे आह्निकातील आखीव क्रिया शरीराबरोबरच मनाचादेखील सर्वांगीण विकास घडवून आणतात.


सनातन कालापासून चालत आलेल्या हिंदुधर्माचा अभेद्य तट जो आजपर्यंत उभा आहे, तो केवळ आह्निकाच्या बळावरच. ज्याप्रमाणे सैन्याची शक्ती दररोजच्या कवायतीमुळे अधिकाधिक वाढत जाते, त्याप्रमाणे नित्य आह्निकामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास होत जातो. आरोग्यशास्त्राप्रमाणेच आह्निकास धर्मशास्त्र व मानसशास्त्र ह्यांची बैठक आहे. ज्याप्रमाणे एखादी कृती दररोज ठरावीक वेळी केल्यास कालांतराने ती कृती शरीराचा व मनाचा एक अविभाज्य भाग बनून राहते, त्याप्रमाणे नित्य आह्निक काटेकोर पद्धतीने करत गेल्यास ते व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनून राहते. उदाहरणार्थ, एखादा मुलगा पोहायला शिकण्यासाठी सुरुवातीला अनिच्छेनेच तयार होतो व त्या वेळी पोहताना त्याची दमछाक होते, पण एकदा का त्याला चांगले पोहायला येऊ लागले की त्याला पोहण्याची. आवड निर्माण होते आणि नंतर ताजेतवाने वाटण्यासाठी तो नित्यनेमाने पोहायला जाऊ लागतो. त्याप्रमाणे आह्निकात काटेकोरपणा आणताना प्रारंभावस्थेत थोडेसे कष्ट पडतात, पण एकदा का आह्निकाचार अंगवळणी पडला की त्याचे कटाक्षाने पालन केल्याखेरीज चैन पडत नाही. आह्निकाची मनापासून आवड निर्माण झाल्यास ते आह्निक अधिकाधिक उत्कृष्ट रितीने व काटेकोर पद्धतीने होत जाते. ह्याउलट दुसऱ्याने लादलेल्या आह्निकातून उद्वेग निर्माण होतो.


प्रातःस्मरणापासून भोजनापर्यंतच्या सर्वच कर्माना शास्त्राने विधिपूर्वक आचरणाची बैठक आणि वेळ, तसेच काल आणि प्रमाण ह्यांचे गणित घालून दिलेले आहे. आह्निकात अचूकता जितकी अधिक तितके आह्निकाचे लाभ अधिकाधिक होत राहतात. आह्निक कर्म करताना शास्त्राने वैज्ञानिकतेस यत्किंचितही डावललेले नाही. एकीकडे शरीरास अत्यंत उपयुक्त व पोषक ठरणारे आरोग्यशास्त्र, तर दुसरीकडे मनाचा विकास व उन्नती साधणारे मानसशास्त्र, अशी दुहेरी जोड देऊन शास्त्राने आह्निकाचे नियम घालून दिलेले आहेत. आह्निकाचा काल व कृती ह्यांच्या बाबतीत कोणतीही उणीव न ठेवता काटेकोरपणावर भर देणारे शास्त्र देशकालपरिस्थितीनुसार उद्भवणाऱ्या आपत्प्रसंगी आह्निकाचारास योग्य ती मुभाही देते. 


'स्वग्रामे तु कृताचारः सीमांते चार्ध उच्यते। 

भाषाभित्रे तदर्थः स्यात् संकटे तु कृताकृतः ।।' 


आपल्या गावात पूर्ण, सीमा ओलांडल्यावर अर्घा, तर अन्यभाषिक प्रांतात गेल्यावर त्याहून अर्धा आह्निकाचार करावा. संकटात आह्निकाचाराचे काटेकोर बंधन नसते. तसेच, 


'आरोग्ये तु कृताचार आतुरे चार्थ उच्यते 

अर्धस्तु जननाशौचे मृताशीचे कृताकृतः ।।' 


आरोग्यावस्थेत पूर्ण, रुग्णाईत असताना अर्धा, जननाशौचात त्याहून अर्धा आह्निकाचार करावा, तर मृताशौचात आह्निकाचाराचे बंधन नाही. अर्थात, हे पर्याय म्हणजे सवडीशास्त्र नव्हे. शास्त्राने असे पर्याय दिले नसते तर धर्माचे अस्तित्वच शिल्लक राहिले नसते


आह्निक म्हणजे कर्मकांडाचे जंजाळ असा काही जणांचा अपसमज आहे. वास्तविक तसा काहीच प्रकार नसतो. नियमितपणे व जाणीवपूर्वक केलेल्या शास्त्रसंमत नियमांचे मनःपूर्वक पालन म्हणजे खऱ्या अर्थाने आह्निक होय. जेथे दिवसातील बहुतेक वेळ प्रवासात व्यतीत होणे हेच जीवनाचे अविभाज्य अंग असते अशा मोठमोठ्या शहरांतही.

नियमितपणे आह्निक करून त्यास पूरक असे आचारपालन करणे हे सहजशक्य आहे. मात्र त्यासाठी धर्माविषयी अतूट निष्ठा व धर्मपालनाची मनःपूर्वक आवड ह्या दोन गोष्टींची आवश्यकता असते. मनू, याज्ञवल्क्य अशा महान प्राचीन स्मृतिकारांच्या ग्रंथांपासून निर्णय सिंधु, धर्मसिंधु इत्यादी अर्वाचीन धर्मग्रंथांपर्यंत सर्वच ग्रंथांत आह्निकाची महती गायिलेली आहे.


आह्निक म्हणजे कर्मठपणा नसून कर्मप्रवणता होय. दिवसभरात हातून घडणाऱ्या प्रत्येक कर्मास आह्निकाचे इंधन देणे अत्यावश्यक असते. आदर्श व काटेकोर आह्निकाचे मनापासून पालन करणारी व्यक्ती मनाने सुदृढ राहते. परिणामतः, ती सहसा दुर्व्यसन, आजार, मनोविकृती, दारिद्र्य इत्यादी आपत्तींचे भक्ष्य ठरत नाही. तात्पर्य, व्यक्तिमत्त्वाची उत्कृष्ट जडणघडण करणाऱ्या अशा ह्या आह्निकाची आज समाजास अत्यंत आवश्यकता आहे. आह्निकातील विविध बाबींचा ऊहापोह सदर प्रकरणात केलेला आहे.

थोडे नवीन जरा जुने