जय हो जय श्री भागवता | आरती करू तुज भगवंता |
श्री शुक मुनिने | परम भक्तीने ।। नानापरीने ||
गाईयले ज्या हरिचरिता || आरती करू || १ ||
वेद तरूचे मधुर फळ | स्वादुरसे जे सोज्वळ ।।
आत्माराम मुनी सकळ । सेवुनि झाले जन सुफळ ||
पहा पर्वणी । आली अवणी । की अघहरिणी ।।
भवजलतरणी ती पतिता ।। २ || आरती करू ||
येथे व्यासांची वाणी | सार्थक हरिगुण गाऊनी ।
शास्त्रपुराणे मुकुटमणी । परमप्रेमामृत जननी ।।
सहज सेविता | भाविक भक्ता । उदार दाता ।।
मोक्ष तत्त्वता दे हातां ।। ३ || आरती करू ||
गमते जणू मानसतीर्थ द्वादश सोपाने युक्त ।
निर्मल भक्तिजले भरित । विहरे हरि हंसचि चित्त ।।
लोक सुकमळे । संतद्विजकुळे । सेवुनि रमले ||
भान हरपले रस पीता || ४ || आरती करू ||
अपार महिमा ग्रंथाचा | वदवेना कोणा साचा ।।
प्राणाचि कीर्तनकारांचा | मेवा कविवर संतांचा ||
जणू बोधाचा । स्वयंप्रभेचा । द्वादश कळिचा ||
रवि अंतरिचा तमहर्ता ।। ५ || आरती करू ||
ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण | गीते वेधी मन पूर्ण ।।
अनन्य होता या शरण । खचित टळे जन्म - मरण ||
त्रिताप जाती । चिर ये शांती | नाथ ही वदती ।।
कृष्ण पदी ठेवू माथा ।। ६ || आरती करू ||