सदा प्रार्थितों स्वामि तूझ्या पदासी
नमोनी तुला वर्णितों आदरेंसी
धरोनी करी तारिं या बाळकासी
नमस्कार माझा श्रीदत्तात्रयासी ॥१ ॥
मतीहीन मी दीन आहे खरा हो
परि बाळ तूझा मि माया करा हो
जसें पोटिचें लेंकरुं माय पोसी
नमस्कार माझा श्रीदत्तात्रयासी ॥२ ॥
लडीवाळ मी बाळ अज्ञान तूझें
तुझ्या कृपेनें दुःख जळेल माझें
अन्य उपाय नाही की निश्चयेंसी
नमस्कार माझा श्रीदत्तात्रयासी ॥३ ॥
गणगोत बंधू पिता तूंची देवा इष्ट
मित्र काही नसे अन्य हेवा
तुजवीण त्राता नसे या जिवासी
नमस्कार माझा श्रीदत्तात्रयासी ॥४ ॥
गुरूची लीला जो करी नित्यपाठ
स्तुती भक्तिभावें करी एकनिष्ठ
तया पुत्रप्राप्ती महाज्ञानराशी
नमस्कार माझा श्रीदत्तत्रयासी ॥५ ॥
जो औदुंबरी वाडिमाजी त्रिकाळ
बसूनी त्रिलोकी क्रमी सर्व काळ
तया गुरुनाथा वर्णवेना मुखेंर्सी
नमस्कार माझा श्रीदत्तात्रयासी ॥६ ॥
निजभक्तांसी दे जो राज्यासनाला
स्मरतांच पळवी रोगादिकाला
उपवेद श्वाने नमिती पदासी
नमस्कार माझा श्रीदत्तात्रयासी ॥७ ॥
माता अनुसूया पिता अत्रिनाथ
अतितीव्र गुरु हा स्वामी समर्थ ;
पापताप दुःखें स्मरणेंची नासी
नमस्कार माझा श्रीदत्तात्रयासी ॥८ ॥
म्हणे पद्मनाभ स्मरा नेम साचा
धरोनी मनी निश्चय अष्टकांचा ;
धनधान्य वृद्धी सुखसंपदेसी
पावाल नमितां गुरुपादुकांसी॥९ ॥