श्री विठ्ठलाची आरती (येई हो विठ्ठले)

॥ आरती विठ्ठलाची ॥

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ।
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे ।।धृ.।।

आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
पंढरपुरी आहे माझा मायबाप ।।१।। येई..

पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला ।
गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला ।।२।। येई..

असो नसो भाव आम्हा तुझीया ठाया ।
कृपा दृष्टी पाहे माझ्या पंढरीराया ।। ३ ।। येई..

विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी ।।४।। येई हो विठ्ठले..

॥ आरतीचा संपूर्ण अर्थ ॥
ध्रुवपद: हे माझ्या विठ्ठल माऊली (आई), तू लवकर ये. मी माझ्या कपाळावर (निढळावर) हात ठेवून अत्यंत आतुरतेने तुझी वाट पाहत आहे.

कडवे १: पंढरपूरला जाणाऱ्या-येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यासोबत मी तुला निरोप पाठवत आहे, कारण त्या पंढरपुरात माझा प्रत्यक्ष माय-बाप (विठ्ठल) बसलेला आहे.

कडवे २: आकाशात विठ्ठलाचा पिवळा धम्मक पीतांबर कसा सुंदर झळकत (चमकत) आहे! माझा रक्षणकर्ता (कैवारी) विठ्ठल साक्षात गरुडावर बसून माझ्या मदतीला धावून आला आहे.

कडवे ३: हे पंढरीराया, माझ्या मनात तुझ्याविषयी भक्तीभाव असो वा नसो, माझ्याकडे कोणतीही पात्रता नसली तरी, तू मात्र माझ्याकडे नेहमी कृपेच्या आणि प्रेमाच्या दृष्टीनेच पाहा.

कडवे ४: या विठोबाच्या राज्यात (पंढरपुरात) आम्हाला दररोज दिवाळीसारखाच आनंद मिळतो. संत नामदेव (विष्णुदास नामा) आपल्या या लाडक्या विठुरायाला आपला जीव ओवाळून टाकत आहेत (अत्यंत प्रेमाने आरती करत आहेत).
थोडे नवीन जरा जुने