श्री गुरूदत्तराजमूर्ती ओवाळितो प्रेमे आरती

श्रीगुरुदत्तराज मूर्ती, ओवाळितो प्रेमे आरती ॥ धृ ॥

ब्रह्माविष्णुशंकराचा, असे अवतार श्रीगुरूचा ।
कराया उद्धार जगाचा, जाहला बाळ अत्रिऋषीचा ।
धरिला वेष असे यतीचा, मस्तकी मुकुट शोभे जटीचा ।
कंठी रुद्राक्ष माळ धरुनी, हातामधी आयुध बहुध धरुनी ।
तेणे भक्तांचे क्लेश हरुनी ।
त्यासी करुनी नमन, अघशमन, होईल रिपुदमन,
गमन असे त्रैलोक्यावरती ।
ओवाळितो प्रेमे आरती ॥ १ ॥ श्रीगुरुदत्तराज मूर्ती...

गाणगापुरी वसती ज्याची, प्रीती औदुंबर छायेची ।
भीमा अमरजा संगमाची, भक्ती असे बहुत सुशिष्यांची ।
वाट दाऊनिया योगांची, ठेव देतसे निजमुक्तीची ।
काशी क्षेत्री स्नान करितो, करविरी भिक्षेला जातो,
माहुर निद्रेला वरितो ।
तरतरीत छाती झरझरीत, नेत्र गरगरीत, शोभतसे त्रिशूळ जया हाती ।
ओवाळितो प्रेमे आरती ॥ २ ॥ श्रीगुरुदत्तराज मूर्ती...

अवधूत स्वामी सुखानंदा, ओवाळितो सौख्यकंदा ।
तारी हा दास हृदयकंदा, दावी हा सद्गुरू ब्रह्मानंदा ।
चुकवी चौऱ्यांशीचा फेरा, घालिती षड्रिपू मज घेरा,
गांजिती पुत्रपौत्रदारा ।
वदवी भजन, मुखी तव पूजन, करितसे सुजन, तयांचे बलवंतावरती ।
ओवाळितो प्रेमे आरती ॥ ३ ॥
श्रीगुरुदत्तराज मूर्ती ओवाळितो प्रेमे आरती ॥

Post a Comment

आपला अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आमच्याकडून लिखाणात काही चुकी झाली असेल किंवा आपणांस अजून काही सुचवायचा असेल तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .

थोडे नवीन जरा जुने