कडकडिला स्तंभ गडगडिले गगन |
अवनी होत आहे कंपायमान ।
तडतडली नक्षत्रे पडताती जाण |
उग्ररूपे प्रकटे तो नृसिंहवदन ।। १ ।।
जय देव जय देव जय नरहरिराया ।
आरती ओवाळू महाराजवर्या || धृ ।।
एकवीस स्वर्गमाळा डळमळली कैसी ।
ब्रह्मयाच्या वाटे अभिनव चित्तासी ।
चंद्रसूर्य दोनी लोपति प्रकाशी।
कैलासी शंकर दचके मानसी।।जय।।२ ।।
थरथरती त्या जटा जिव्हा लळलळित ।
तीक्ष्ण नखांनी तो दैत्य विदारीत ।
अर्धांगी कमलजा शिरि छाया धरित |
माधवदासा स्वामी नरहरि शोभत ।
जय देव जय देव जय नरहरिराया ।
आरती ओवाळू महाराजवर्या || ३ ||