जयदेव जयदेव जय श्री गजवदना
ओवाळू आरती तुजला मनरमणा ।।धृ।।
मंगलमुर्ती तुझे रुप गोजिरे,
दोंदील तनु वर पितांबर हि शोभे
मौक्तिक माळा भाळी कुंकूम साजिरे,
तव चरणी मस्तक भावे ठेविले ।।१।।
गुळ खाद्याची बहु आवड तुजसी,
मोदक अर्पिता पावसी भक्तासी
दुर्वांकुर वाहता हर्षसी मानसी,
वरदायक होसी तु गौरिनंदना ।।२।।
विद्येचा सागर तुचि गणराया,
ज्ञानामृत तु देसी तुझीया भक्ताला
विघ्न नाशुनी देई अभया,
सुखकर्ता दुःखहर्ता तुची गणेशा ।।३।।
भवसागर तराया शक्ती बुद्धी दे,
तुझ्या भक्तीत मन हे रमु दे
अजाण बालावरी कृपा असु दे,
पुनरपि येरझार चुकवी मोरया ।।४।।