श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्राची किती आवर्तने झाली असतील याची गणनाच आपण करू शकणार नाही. किंबहुना एवढी आवर्तने झालीत म्हणूनच हे स्तोत्र असे अलौकिक प्रभावी ठरलेले आहे.
आजवरच्या असंख्य महात्म्यांनी या स्तोत्राची स्वत: अनुभूती घेऊन लक्षावधी भक्तांना याची उपासना दिलेली आहे. अनेक संतांच्या चरित्रात या स्तोत्राशी संबंधित अद्भुत हकिकती वाचायला मिळतात. पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी त्यांच्या 'श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य' या पुस्तकात असे भरपूर प्रसंग कथन केले आहेत. त्यातील काही आपण मुद्दाम पाहूया.
शिर्डीत असताना एक रामदासी बुवा श्रीसंत साईबाबांच्या समोर 'अध्यात्म रामायण’ आणि ‘श्रीविष्णुसहस्रनाम’ यांची पारायणे करीत असे. एके दिवशी आपल्या पोटदुखीसाठी बाजारातून सोनामुखी आणून देण्यास बाबांनी त्याला सांगितले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे तो रामदासी आपल्या पोथ्या गुंडाळून ठेवून बाजारात गेला असता, बाबांनी त्याच्या दप्तरातील ‘विष्णुसहस्रनामा’ची पोथी काढून घेतली आणि ती परमभक्त शामाच्या हातात देऊन बाबा त्याला म्हणाले की, “एकदा माझे प्राण कासावीस झाले. त्या बिकट प्रसंगी मी हे पुस्तक माझ्या छातीवर घट्ट धरून त्याचे पारायण केले; आणि मला अलभ्य लाभ झाला; प्रत्यक्ष श्रीभगवंतांचे दर्शन झाले ! म्हणून तूही रोज हे वाचीत जा. किमान एक नाम वाचण्याचा प्रयत्न केलास तरी चालेल !” या प्रसंगावरून, श्री साईबाबांसारख्या अवतारी सत्पुरुषांचीही केवढी गाढ श्रद्धा या स्तोत्रावर होती, हे कळून येते.
श्रीसंत दासगणू महाराजांच्या चरित्रातही ‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा’च्या प्रभावाने त्यांच्यावरील करणी प्रयोग असफल झाल्याची कथा आली आहे. प.प.श्री.टेंब्ये स्वामी महाराजांनीही या स्तोत्राची उपासना सांगून अनेकांना दुःखमुक्त, बाधामुक्त केल्याचे दाखले त्यांच्या चरित्रात आहेत.
योगिराज सद्गुरु श्री.गुळवणी महाराज देखील त्यांचा या स्तोत्राच्या संबंधातला एक सुंदर प्रसंग नेहमी सांगत असत, श्री.मानवतकर महाराजांच्या घरी घडलेला. तो प्रसंग मोठा असल्याने पू.दादांच्या पुस्तकातून मुळातूनच वाचावा. त्याच्या शेवटी पू.श्री.गुळवणी महाराजांनी या स्तोत्राचे सांगितलेले माहात्म्य मात्र येथे आवर्जून देत आहे. श्री महाराज म्हणत, "श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राच्या श्रवण-पठण-चिंतनाने मनुष्य सर्व प्रकारच्या संकटांतून तरून जातो आणि आपले मनोरथ सिद्धीस नेऊ शकतो. या स्तोत्राच्या शब्दाशब्दांंतून अशुभ नाहीसे करणारी परममंगल अशी मंत्रशक्ती भरलेली आहे !"
योगिराज श्री.गुळवणी महाराज आणि योगिराज श्री.मामासाहेब देशपांडे महाराज हे थोर गुरु-शिष्य नित्यनेमाने या स्तोत्राचे पठण करीत असत आणि आपल्या शिष्यांनाही आवर्जून करायला सांगत असत. म्हणूनच या अधिक महिन्याच्या निमित्ताने आता आपण सर्वांनी न चुकता दररोज हे स्तोत्र म्हणायचा किंवा ऐकायचा तरी नियम करू या आणि श्रीभगवंतांच्या दिव्य कृपेची साक्षात् अनुभूती घेऊ या !!
विष्णू सहस्त्रनामावली पठण महिमा आणि चमत्कार....
एका परिचितांनी सांगितलेला हा प्रसंग आहे. ह्या परिचित ताईंना काही दिवसांपूर्वी एक त्यांच्या परिचित असणाऱ्या स्त्री भेटल्या. बरीच दिवसांनी भेटल्ल्यांनंतर त्या स्त्री परिचित ताईंच्या घरी गेल्या. काही चर्चा झाल्यावरती त्या स्त्री म्हणाल्या गेले कित्येक रात्री मी झोपू शकत नाही. कारण मला घरामध्ये ३/४ मृत व्यक्ती रात्री फिरताना दिसत आहेत. त्यामुळे नाईलाजाने दिवसा झोपावे लागत आहे. त्या मृत व्यक्ती काही त्रास देत नाहीत पण एकूणच त्या समोर दिसल्यावरती घाबरायला होत आहे.
हे ऐकून आमच्या ताईंनी त्यांना विष्णू सहस्त्रनामावली चे दर बुधवारी पठण करायला सांगितले. आणि कशा प्रकारे करायचे तेसुद्धा सांगितले. ह्या पठणामुळे त्या मृत व्यक्तीना चांगली गती मिळून त्यांची या योनीतुन सुटका होईल. त्या स्त्री आधीच घाबरल्या असल्या कारणाने म्हणाल्या हे एकाच बुधवारी केले तर चालेल का ? तर आमच्या ताईंनी सांगितले हरकत नाही करून पहा.
त्या परिचित स्त्रीने सांगितल्याप्रमाणे एका बुधवारी संकल्प सोडून ४ वेळा विष्णू सहस्त्रनामावली चे पठण केले आणि त्यांना रात्री दिसणाऱ्या मृत व्यक्ती बंद झाल्या. बहुतेक दुसऱ्यासाठी केलेली त्यांची प्रार्थना फळाला आली आणि श्री विष्णू भगवंतांनी त्यांची प्रार्थना ऐकून त्या मृत व्यक्तींची मृत योनीतुन सुटका केली.
हे वाचून प्रश्न पडेल कि हे मृतात्मे त्या बाईंनाच का दिसत असावेत याचे कारण म्हणजे शुभ स्थानातील उच्चीचा नेपच्युन आणि त्यावरती शुभ ग्रहांची दृष्टी अशी पत्रिकेत स्थिती असेल तर अशा व्यक्ती अतींद्रिय शक्तींशी संवाद साधू शकतात किंवा त्यांच्या संबंधात येऊ शकतात. यात मृतात्मे सुद्धा येऊ शकतात.
विष्णू सहस्त्रनामावली चे पठण व त्याचे फलित....
ज्यांच्यामुळे आपले अस्तिव आहे त्या आपल्या पितरांना संतुष्ट करून त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत यासाठी दर बुधवारी " विष्णूसहस्रनामाचे " पठण करावे.
आधी आपल्या ज्ञात आणि नंतर अज्ञात पितरांसाठी याचे पठण करावे. लग्न झालेल्या स्त्रियांनी सुद्धा आपल्या माहेरच्या पितरांसाठी आणि सासरच्या पितरांसाठी सदगती मिळवून देण्यासाठी याचे पठण करायला हरकत नाही.
आमच्या सर्व ज्ञात आणि अज्ञात पितरांना सदगती मिळावी यासाठी विष्णूसहस्रनामाचे पठण करीत आहे .तरीही विष्णू भगवानांनी त्यांना सदगती मिळवून द्यावी.
जेणेकरून त्यांचे शुभाशीर्वाद आम्हाला मिळतील. आमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्यांनी आम्ही त्यांचाच एक अंश आहोत असे समजून मोठ्या मनाने आम्हाला माफ करावे.
स्तोत्र एक उपयोग अनेक...
श्री विष्णू सहस्त्रनामावली पठण इतर गोष्टींसाठी सुद्धा करतात जसे की, व्यावसायिक उत्कर्ष , आपसी सु - संबंध , आर्थिक विकास , शत्रू भाव नष्ट होणे, मानसिक समाधान इत्यादी पण पितरांना सद्गती प्राप्त होण्यासाठी याचा विशेष उपयोग होतो हे निश्चित.
श्रीविष्णूसहस्रनामस्तोत्र ..रहस्य व इतिहास
शतकानुशतके , पिढ्यान् पिढ्या भारतीय सुसंस्कृत घरांमध्ये ज्या महत्त्वाच्या स्तोत्रांचा नित्यपाठ होतो, त्यातील एक कल्याणकारी स्तोत्र म्हणज श्रीविष्णूसहस्रनामस्तोत्र याची संक्षिप्त माहिती पाहू -
प्रसंग असा आहे की , महाभारत युद्ध समाप्त झाल्यावर धर्मराज युधिष्ठिरास राज्याभिषेक झाला. धर्मराज्याची स्थापना झाली. यानंतर शरपंजरी पडलेल्या पितामह भीष्मांनी निजधामास जाण्याचे ठरविले. त्या वेळी त्यांच्या इच्छेनुसार पांडव व भगवान श्रीकृष्ण भीष्मांसन्मुख उपस्थित होतात. तेव्हा युधिष्ठिर भीष्मांना या जगात एकच देव कोण ? एकच परम आश्रय कोण ? कोणत्या देवाची स्तुती केल्यास कल्याण होईल ? कोणाचा जप केल्यास संसारबंधातून मुक्ती मिळेल ? असे प्रश्न विचारले. यावर भीष्मांनी दिलेले उत्तर व श्रीकृष्णांची केलेली स्तुती म्हणजेच विष्णूसहस्रनाम स्तोत्र होय. हे स्तोत्र गातच भिष्म निजधामास गेले.
आद्य शंकराचार्यांनी तर महाभारत ही गाय , गीता हे तिचे दुध व विष्णू सहस्त्रनाम म्हणजे तूप असे म्हणून गौरव केला आहे . या दिव्य स्तोत्राच्या नित्य पठणामुळे पारमार्थिक , ऐहिक कल्याण होईल असे फलश्रुतीत म्हटले आहे. साधका भोवती अदृश्य संरक्षक कवच निर्माण होऊन संकटातून रक्षण होईल. याचा एक दृष्टांत म्हणजे दत्त संप्रदायातील एक सत्पुरूष म्हणजे टेंबे स्वामी उर्फ वासुदेवानंद सरस्वती यांच्या जीवनातील एक प्रसंग. त्यांच्यावर एका मांत्रिकाने अघोरी शक्तीचा प्रयोग केला. ती शक्ती जेव्हा स्वामींजवळ आली तेव्हा ती शक्ती त्या मूर्ख मांत्रिकावरच उलटली व त्याला त्रास होउ लागला. पुढे तो मांत्रिक स्वामींना शरण गेला. स्वामींनीही त्याला क्षमा केली आणि दुःख मुक्त केले. मांत्रिकाने याबाबत विचारले असता स्वामींनी सांगितले की, माझा विष्णूसहस्रनामाचा नित्यनेम आहे. त्यामुळे कोणतीही वाईट शक्ती त्यांचे काहीही वाईट करू शकत नाही. म्हणूनच तुम्ही कोणत्याही संप्रदायाचे असाल , कोणत्याही देवतेचे उपासक असाल तरी ( शेवटी अंतिम परमेश्वरी तत्त्व एकच आहे ) दररोज विष्णूसहस्रनाम म्हणत चला. प्रापंचिक समस्याहि कमी होण्यास मदत होईल. संकटात ठाम उभे राहण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल.